You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर कोरियाने केली अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी
अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या बॅलेस्टिक मिसाइलची उत्तर कोरिने चाचणी केली आहे. उत्तर कोरियाच्या अधिकृत वाहिनीने याबाबत माहिती दिली आहे.
मे महिन्यापासून उत्तर कोरियाच्या विविध चाचण्या सुरू होत्या. त्यापैकी ही एक आहे. या वर्षात उत्तर कोरियाने अशा क्षेपणास्त्रांच्या एकूण 11 चाचण्या घेतल्या आहेत.
हे क्षेपणास्त्र वेगळ्या प्रकारचं असल्याचा उत्तर कोरियाचा दावा आहे. पाणबुडीतून हे क्षेपणास्त्र नेता येऊ शकतं तसेच पाणबुडीतूनच याचा मारा करता येऊ शकतो.
याचाच अर्थ असा की उत्तर कोरिया आपल्या समुद्री हद्दीपर्यंत हे क्षेपणास्त्र पाणबुडीतून नेऊन आपल्या प्रदेशाबाहेर हल्ला करू शकतं. हे मध्यम पल्ल्याचं मिसाइल आहे.
अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर पुन्हा बोलणी सुरू होतील असं उत्तर कोरियाने सांगितलं होतं पण त्यांनी ही चाचणी घेतली. यावर अमेरिकेची काय प्रतिक्रिया येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेमकं काय झालं?
उत्तर कोरियाच्या ईशान्येकडील वॉनसान या किनारपट्टीलगतच्या शहराजवळच्या समुद्रातून बुधवारी सकाळी 7 वाजल्यानंतर हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं.
पकगकसाँग 3 नावाच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आल्याचं उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनी म्हटलं आहे. 'परकीयांकडून असलेला धोका रोखण्यासाठी आणि स्वसंरक्षणासाठी' या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आल्याचंही या वृत्तसंस्थेने म्हटलंय.
शिवाय यामुळे शेजारी देशांच्या सुरक्षेला धोका पोहोचणार नसल्याचंही उत्तर कोरियाने सांगितलं.
पण यापूर्वी करण्यात आलेल्या शस्त्र चाचण्यांप्रमाणे किम जाँग-उन या चाचणीला हजर असल्याचा फोटो यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
या वर्षभरात याआधी 10 क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली असून ही सर्व क्षेपणास्त्रं लहान टप्प्यांची होती.
'पाणबुडीतून डागता येणं' का महत्त्वाचं?
हे क्षेपणास्त्र थेट डागण्याऐवजी एखाद्या कोनातून वा अंशातून लाँच करण्यात आलं तर ते 1900 किलोमीटर अंतराचा पल्ला गाठू शकेल. म्हणजे यामुळे संपूर्ण दक्षिण कोरिया आणि जपान हे देश उत्तर कोरियाच्या हल्ल्याच्या टप्प्यात येणार आहेत.
पण हेच क्षेपणास्त्र जर पाणबुडीतून डागण्यात आलं तर शत्रूला त्याचा सुगावा लागणं कठीण आहे. म्हणूनच यामुळे कोणालाही थांगपत्ता न लागता उत्तर कोरियाला आपल्या लक्ष्याच्या अधिक जवळ पोहोचणं शक्य होईल.
उत्तर कोरियाकडे सध्या असणाऱ्या रोमिओ पाणबुड्या या 1990च्या दशकात तयार करण्यात आलेल्या असून यांचा पल्ला सुमारे 7000 किलोमीटर्सचा असल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटलंय.
म्हणजे इतक्या अंतरात एकतर्फी हवाई प्रवास सहज शक्य आहे.
पण उत्तर कोरियाच्या पाणबुड्या या डिझेलवर चालणाऱ्या असल्याने त्यांचा खूप आवाज होतो आणि त्यांचा शत्रूला पटकन सुगावाही लागू शकतो.
अमेरिकेसोबतच्या चर्चेवर काय परिणाम?
उत्तर कोरिया आणि अमेरिकेदरम्यान पुढच्या आठवड्यात आण्विक चर्चा होणार असल्याचं या क्षेपणास्त्र चाचणीपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं.
उत्तर कोरियाने 'प्रक्षोभक गोष्टी करू नयेत' आणि आण्विक अस्त्रांचा वापर करण्यासाठी 'ठोस आणि नियमित बोलणी' करत राहावीत असं अमेरिकेने या क्षेपणास्त्र चाचणीनंतर म्हटलं.
फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग उन यांच्यामध्ये हनोई समिटमध्ये झालेली चर्चा कोणत्याही ठरावाशिवाय संपुष्टात आल्यानंतर अमेरिका आणि उत्तर कोरियातल्या वाटाघाटी थांबलेल्या आहेत.
पण या क्षेपणास्त्रांच्या चाचणीची वेळ आणि वाटाघाटीसाठीच्या चर्चा पुन्हा सुरू होण्याची घोषणा ही ठरवून करण्यात आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
"अण्वस्त्र पूर्णपणे काढून टाकावीत या मागणीपासून अमेरिकेला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत उत्तर कोरिया करत असल्याचं यावरून दिसतंय."
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार उत्तर कोरियावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र वापरण्याची बंदी घालण्यात आली आहे. आणि त्यांच्या आण्विक कार्यक्रमांमुळे अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियावर निर्बंध घातलेले आहेत.
उत्तर कोरियाच्या वस्त्रोद्योग आणि कोळसा निर्यातीवर 36 महिन्यांसाठी संयुक्त महासंघाने घातलेले निर्बंध हटवण्यासाठीचा प्रस्ताव या वाटाघाटींदरम्यान अमेरिका मांडणार असल्याचंही वृत्त आहे. याबदल्यात उत्तर कोरियाने याँगब्यॉन आण्विक प्रकल्प बंद करावा आणि युरेनियमवरची प्रक्रिया थांबवावी अशी अमेरिकेची मागणी आहे.
प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक बाब
(अंकित पांडा, उत्तर कोरियाविषयक विश्लेषक)
उत्तर कोरियाने पकगकसाँग - 3 हे पाणबुडीतून डागता येण्याजोग्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाने चाचणी घेणं हे ईशान्य आशिया भागातल्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या चर्चा या फक्त देखाव्यासाठी होत्या हे यातून स्पष्ट झालं.
हे क्षेपणास्त्र पाणबुडीवरून डागण्यासाठी तयार करण्यात आलं, पण चाचणी करताना पाणबुडीवरून करण्यात आली नाही. या चाचणीसाठी उत्तर कोरियाकडील बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं डागू शकणारी, सध्या कार्यरत असणारी एकमेव पाणबुडी वापरणं कदाचित उत्तर कोरियाच्या इंजिनियर्सना धोक्याचं वाटलं असावं. पण असं असलं तरी या क्षेपणास्त्राने अपेक्षित उद्दिष्ट गाठल्याचं दिसतंय.
जर हे पकगकसाँग - 3 क्षेपणास्त्र नेहमीच्या अंशात डागण्यात आलं असतं तर ते जपानच्या चारही मुख्य बेटांपर्यंत आणि जपानच्या बाजूच्या समुद्रातून जवळच्या दक्षिण कोरियातही पोहोचू शकलं असतं.
यामधून उत्तर कोरिया वापरत असलेली 'सॉलिड फ्युएल सिस्टीम' - घन स्वरूपातील इंधन वापरण्याची पद्धत समोर येते. द्रवरूपातील इंधन वापरणाऱ्या क्षेपणास्त्रांपेक्षा घन स्वरूपातलं इंधन वापरणाऱ्या क्षेपणास्त्रांचे काही फायदे असतात. ही क्षेपणास्त्रं अधिक परिणामकारक असतात आणि वापरण्यासाठी सोपी असतात. ही क्षेपणास्त्रं डागण्याच्या आधी त्यासाठी भरपूर इंधन भरावं लागत नाही किंवा मोठी तयारीही करावी लागत नाही.
क्षेपणास्त्रांच्या तंत्रज्ञानात उत्तर कोरिया करत असलेली प्रगती रोखण्यासाठी अमेरिकेने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज का आहे, हे देखील यातून स्पष्ट होतं.
(अंकित पांडा हे फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टचे सिनिअर फेलो असून येऊ घातलेल्या "किम जाँग उन अॅंड द बॉम्ब" या पुस्तकाचे लेखक आहेत.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)