You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॅलिफोर्निया गोळीबारात 10 जणांचा मृत्यू, अमेरिकेत वारंवार गोळीबार का होतात?
अमेरिकेत उत्तर कॅलिफोर्नियात दोन ठिकाणी झालेल्या गोळीबारात एकूण सात लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या प्रसारमाध्यांनी दिलेल्या बातमीनुसार हाफ मून बे शहरात या घटना झाल्या आहेत.
सॅन मेटेओ काऊंटी येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
दोन दिवसांआधीच दक्षिण कॅलिफोर्नियात लॉस एंजलिस मध्ये झालेल्या एका गोळीबारात 11 लोकांचा मृत्यू झाला होता.
हाफ मून बे सॅन फ्रान्सिस्को पासून 50 किमी दूर आहे. पोलिसांनी ही घटना झाल्यानंतर 67 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
ही संशयित कार शेरिफ विभागाच्या सब स्टेशनच्या पार्किंग मध्ये सापडली. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या मते गोळीबार करण्यासाठी वापरलेली बंदूक याच कारमधून जप्त करण्यात आली आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसपासून 12 किमी दूर असलेल्या मॉंटेरी पार्कजवळ गोळीबार झाला होता. चिनी नव वर्षानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमानिमित्त अनेक जण या ठिकाणी जमा झाले होते.
पोलिसांनी अद्याप जखमींची आकडेवारी सांगितली नाही.
या गोळीबाराचा उद्देश अद्याप माहीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मोंटरी पार्क या ठिकाणी बहुतांश लोक हे आशिआई समुदायाचे आहेत.
हल्लेखोराला अद्याप अटक झालेली नाही. तो एक पुरुष असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पण अमेरिकेत आता अशा अंदाधुंद गोळीबाराच्या सातत्याने ऐकू येतात. देशात सहज उपलब्ध होणाऱ्या बंदुकींविरोधात कायदा आणावा, म्हणून वेळोवेळी मागणीही उठत असते. मात्र या घटना काही कमी होताना दिसत नाहीत.
असं का, हे आपण पाच मुद्द्यांमध्ये समजून घेऊया.
1.अमेरिकेत किती प्रकारच्या बंदुका मिळतात?
लष्करी पद्धतीची हत्यारं अशाप्रकारच्या गोळीबाराच्या घटनांसाठी कारणीभूत ठरतात, असं म्हटलं जातं. अमेरिकेत सध्या चलनात असलेल्या शस्त्रास्त्रांपैकी सर्वाधिक 64 टक्के हँडगन्स आहेत. त्याखालोखाल 4 टक्के रायफल्स, 2 टक्के शॉटगन्स आणि अन्य 2 टक्के असे बंदुकांचे प्रकार आहेत.
याव्यतिरिक्त उर्वरित 28 टक्के शस्त्रांची माहितीच नसल्याचं आकडेवारी सांगते.
2. बंदुकांची किंमत किती?
गोळीबारासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुकीची किंमत 1,500 अमेरिकन डॉलर्स इतकी असते. हँडगन्स 200 अमेरिकन डॉलर्स मिळू शकतात. अमेरिकेत हे काही फारसं महाग नाही.
3. जगभरात बंदुका आहेत कुठे?
अनेक देशांमध्ये लष्करवगळता सर्वसामान्य माणसांकडे किती शस्त्रं आहेत, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र अमेरिकेत 39 कोटी शस्त्रं सर्वसामान्य जनतेकडे आहेत.
सर्वाधिक शस्त्र बाळगणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका आघाडीवर आहे. 1982 नंतर अमेरिकेत जाहीरपणे अंदाधुंद गोळीबार करण्याच्या 110 घटना घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी 2017मध्ये लास व्हेगास इथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 58 लोकांचा मृत्यू झाला होता.
4. बंदुका बाळगण्याला पाठिंबा कुणाचा?
नॅशनल रायफल असोसिएशन ही संघटना कोणत्याही स्वरूपाच्या बंदुका बाळगण्यावरील नियमनाविरोधात आहे. बंदुका बाळगल्याने नागरिकांना अधिक सुरक्षित वाटू शकतं, असं या संघटनेचा दावा आहे.
अमेरिकेतील राज्यकर्त्यांच्या जवळची म्हणून या संघटनेचं नाव घेतलं जातं. अमेरिकेतील दर पाचपैकी एक बंदुकधारी व्यक्ती या संघटनेचा सदस्य आहे.
बंदुकांच्या धोरणासंदर्भात लॉबिंगकरता या संघटनेनं 5 दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम दोन वर्षांपूर्वी खर्च केली आहे.
5. वैयक्तिक हक्कांचा मुद्दा?
15 डिसेंबर 1791 मध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेत केलेल्या सुधारणेनुसार बंदुकीच्या मालकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला होता. 1871 मध्ये विल्यम सी. चर्च यांनी शास्त्रोक्त पद्धतीने बंदुकीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी द नॅशनस रायफल असोसिएशनची स्थापना झाली होती.
बंदुका बाळगण्यासंदर्भात वेळोवेळी संसदेत चर्चाही झाली. 26 जून 2008मध्ये अमेरिकेच्या बंदूक बाळगण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)