You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्ल्ड कप 2019: पाकिस्तानची घरवापसी पक्की; न्यूझीलंडला सेमी फायनलचं तिकीट
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तान जाणार का? हा यक्षप्रश्न यंदाच्या वर्ल्ड कपपुरता तरी संपुष्टात आला आहे. न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये खेळणारा चौथा संघ ठरला आहे.
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात पाकिस्तानला बांगलादेशवर 316 धावांनी मात करणं आवश्यक होतं. मात्र तसं घडलं नाही. पाकिस्तानने इमाम उल हकच्या शतकाच्या बळावर 315 धावांची मजल मारली.
गणितीय समीकरणांनुसार यानंतर पाकिस्तानला सेमी फायनल गाठण्यासाठी बांगलादेशला 7 धावांत गुंडाळणं आवश्यक होतं. मोहम्मद आमीरच्या गोलंदाजीवर तमीम इक्बालने एकेरी धाव घेतली आणि बांगलादेशचा धावफलक बिनबाद 8 असा झाला. तत्क्षणी पाकिस्तानच्या सेमी फायनलच्या आशा पूर्णपणे मावळल्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये स्थान पक्कं केल्यानंतर अन्य दोन स्थानांसाठी इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान हे संघ शर्यतीत होते.
इंग्लंडने भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांना नमवत तब्बल 27 वर्षांनंतर वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठली.
त्यामुळे इंग्लंड सेमी फायनलमध्ये खेळणारा तिसरा संघ ठरला. मात्र इंग्लंडविरुद्ध पराभूत झाल्यामुळे सेमी फायनलमध्ये खेळणारा चौथा संघ कोणता याविषयी उत्सुकता होती.
न्यूझीलंडचे 9 सामन्यांनंतर 11 गुण झाले होते. त्यांचा नेट रनरेट चांगला होता. पण पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या लढतीत 316 धावांनी विक्रमी विजय मिळवल्यास पाकिस्तानला सेमी फायनल गाठण्याची संधी होती.
पाकिस्तानला विजयासाठी चमत्कार आवश्यक होता. पाकिस्तानला विजयासाठी हव्या असणाऱ्या अशक्य आकडेवारीवरून सोशल मीडियावर मीम्स शेअर होऊ लागले होते.
आम्ही पाचशे धावा करण्याचा प्रयत्न करू. तेवढंच आमच्या हातात आहे असं पाकिस्ताचा कर्णधार सर्फराझ अहमदने मॅचच्या पूर्वसंध्येला सांगितलं होतं.
सातत्यपूर्ण असातत्यासाठी प्रसिद्ध पाकिस्तानचा संघ चमत्कार घडवू शकतो याचा प्रत्यय चाहत्यांना आहे. त्यामुळे पाकिस्तान-बांगलादेश मॅच या दोन संघांच्या चाहत्यांच्या बरोबरीने न्यूझीलंड चाहत्यांसाठी कळीची होती.
पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंग घेतली तेव्हा आज पुढे काय होणार असा प्रश्न अनेकांच्या मनात आला.
फखर झमन झटपट बाद झाल्यानंतर बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी दुसऱ्या विकेटसाठी 157 धावांची मॅरेथॉन भागीदारी केली.
शतकापासून चार धावा दूर असताना बाबर आऊट आला. बाबर बाद झाल्यानंतर इमामने सामन्याची सूत्रं हाती घेतली. त्याने आपलं शतक साजरं केलं. मात्र शतकानंतर लगेचच तो हिटविकेट झाला. त्याने 7 चौकारांसह 100 धावांची खेळी केली. हे दोघं आऊट होताच बांगलादेशच्या बॉलर्सनी धावगतीला वेसण घातली. पाकिस्तानचा स्कोअर एकाक्षणी 31.5 ओव्हरमध्ये 1 बाद 180 असा सुस्थितीत होता. मात्र त्यानंतर त्यांची घसरण झाली. पाकिस्तानला 315 धावांची मजल मारता आली.
यानंतर बांगलादेशला 7 धावांत ऑलआऊट करणं एवढंच पाकिस्तानच्या हाती होतं. हास्यास्पद अशी ही गोष्ट अर्थातच घडणं शक्य नव्हतं. बांगलादेशने सात धावांचा टप्पा पार केला आणि पाकिस्तानच्या सेमी फायनल गाठण्याच्या आशा धुळीस मिळाल्या.
1992 आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये राऊंड रॉबिन फॉरमॅट पद्धतीने मॅचेस खेळवण्यात येत आहेत. यामध्ये प्रत्येक संघ अन्य संघाशी एक मॅच खेळतो. कोणतेही छोटे गट नसतात. 1992 मध्ये पाकिस्तानची जशी वाटचाल झाली होती तशीच वाटचाल सर्फराझच्या संघाने यंदा केली होती.
त्यामुळे सर्फराझ पाकिस्तानचं नशीब पालटवणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड अशा मोठ्या संघांना नमवलं. मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या दारुण पराभवामुळे त्यांच्या रनरेटवर परिणाम झाला.
पाकिस्तानचा सेमी फायनलचा मार्ग खुंटला असल्याने ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ सेमी फायनलमध्ये खेळतील हे पक्कं झालं. शनिवारी होणाऱ्या साखळीतील शेवटच्या मॅचनंतर सेमी फायनलमध्ये कोणता संघ कोणाशी खेळणार हे पक्कं होईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)