वर्ल्ड कप 2019 : 'गब्बर शेर' शिखर धवनने केली ऑस्ट्रेलियाची शिकार

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

प्रत्येक बॅट्समन धावा करतो. शतकंही झळकावतो. मात्र या धावा आणि शतकं कुणाविरुद्ध आणि कुठे झाल्या आहेत याला प्रचंड महत्त्व आहे.

पिळदार मिशा, टॅटू, शड्डू ठोकून केलं जाणारं सेलिब्रेशन, चेहऱ्यावर सदैव तरळणारं हास्य या बाह्य गुणवैशिष्ट्यांमुळे अनेकदा शिखर धवनचं क्रिकेट झाकोळलं जातं. पण रविवारी शिखर धवनने वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत शतकासह आपलं नैपुण्य सिद्ध केलं.

शिखरला मोठी आव्हानं खुणावतात. आयसीसी स्पर्धा म्हणजे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी. वर्ल्ड कप म्हणजे क्रिकेटमधील सर्वोच्च स्पर्धा तर चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा. सर्वोच्च स्पर्धेत अर्थातच अव्वल संघ खेळणार हे ओघाने आलंच.

सर्वोच्च स्पर्धेत प्रत्येक सामना नॉकआऊट धर्तीचा असतो. एखादी चूक आणि सगळं मुसळ केरात जाऊ शकतं. शिखर धवन आयसीसी स्पर्धांचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याची सरासरी 77 आहे. लिंबूटिंबू संघांविरुद्ध वादळी खेळी करण्यापेक्षा जगातील मातब्बर संघाविरुद्ध दमदार खेळी करणं शिखरला पसंत आहे.

शिखरची वनडे सरासरी आहे 44.91 पण आयसीसी स्पर्धांमध्ये त्याची सरासरी आहे 77.88 म्हणजे शिखरची कामगिरी जवळपास दुपटीने उंचावते. परीक्षेची काठिण्य पातळी तीव्र होते तशी विद्यार्थ्यांची कामगिरी खालावते. शिखरचं वेगळेपण यात आहे. शिखरचं टोपणनाव गब्बर आहे. या गब्बरनेच ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या सावजाची शिताफीने शिकार केली.

टीम इंडियाने शिखर धवनच्या शतकाच्या बळावर 352 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने 316 धावा केल्या आणि टीम इंडियाने 36 धावांनी विजय साकारला.

चोरटी धाव घेताना फिंच रनआऊट झाला. त्याने 36 धावा केल्या. वॉर्नरला फिरकीपटू चहलनं बाद केलं. त्याने 84 चेंडूत 56 धावांची खेळी केली. वॉर्नर-फिंच जोडीने 61 धावांची सलामी दिली. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फिंच बाद झाला.

स्टीव्हन स्मिथला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. वॉर्नर-स्मिथ जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रनरेट झपाट्याने वाढत होता. चौकार-षटकार मिळत नसल्याने वॉर्नरवरचं दडपण वाढलं होतं. युझवेंद्र चहलला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न भुवनेश्वर कुमारच्या हातात जाऊन विसावला. वॉर्नरने त्याच्या लौकिकाला साजेशा वेगाने खेळता आलं नाही.

उस्मान ख्वाजाने 39 चेंडूत 42 धावा करत स्टीव्हन स्मिथला चांगली साथ दिली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. जसप्रीत बुमराहने ख्वाजाचा अडसर दूर केला.

भुवनेश्वर कुमारने एकाच ओव्हरमध्ये स्टीव्हन स्मिथ आणि मार्कस स्टोनिअस यांना बाद केलं. स्मिथने 5 चौकार आणि एका षटकारासह 69 धावा केल्या. स्टोनिअसला भोपळाही फोडता आला नाही. मॅक्सवेलने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र चहलच्या गोलंदाजीवर बदली खेळाडू रवींद्र जडेजाने त्याचा अफलातून झेल टिपला. मॅक्सवेलने 14 चेंडूत 28 धावांची खेळी केली. अॅलेक्स कॅरेने नाबाद 55 धावांची खेळी केली.

भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी शिखर धवनची शतकी खेळी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत 352 धावांचा डोंगर उभारला. धवनने 117 तर रोहितने 57 आणि विराट कोहलीने 82 धावांची खेळी केली.

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी 16 ओव्हर्समध्ये 80 धावा करत सावध सुरुवात केली. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांचा भेदक मारा खेळून काढत या जोडीने अपेक्षित सुरुवात केली आहे. मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने रोहित-धवन जोडीने मजबूत पायाभरणी केली आहे. नॅथन कोल्टिअर नील आणि अॅडम झंपा यांच्या गोलंदाजीवर प्रहार करत रोहित-धवन जोडीने धावफलक हलता ठेवला.

दुसऱ्याच ओव्हरमध्ये रोहित शर्माचा कॅच नॅथन कोल्टिअर नीलने सोडला. पॅट कमिन्सच्या उसळत्या चेंडूंनी धवनला सतवलं. मात्र त्याने चिकाटीने खेळ करत वाटचाल केली.

सलामीवीर शिखर धवनने शतक पूर्ण केलं. मार्कस स्टोनिसच्या गोलंदाजीवर एक धाव खेचत शिखरने शतकाला गवसणी घातली. शिखरच्या कारकीर्दीतलं हे सतरावं शतक आहे. मिचेल स्टार्कने धवनला बाद केलं. त्याने 16 चौकारांसह 117 धावांची खेळी केली. शिखरचं आयसीसी स्पर्धेतलं हे सहावं शतक आहे.

टीम इंडियाने 35व्या शतकात दोनशे धावांची वेस ओलांडली. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केलं. लोकेश राहुल, केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यापुढे हार्दिक पंड्याला बढती देण्यात आली. नॅथन कोल्टिअर नीलच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर विकेटकीपर अॅलेक्स कॅरेने हार्दिकचा कॅच सोडला. या जीवदानाचा फायदा उठवत हार्दिकने 27 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 48 धावांची वेगवान खेळी केली. धोनीने 14 चेंडूत 27 धावांची खेळी केली.

कर्णधार कोहलीने 4 चौकार आणि 2 षटकारांसह 82 धावांची खेळी केली. धोनी बाद झाल्याने आलेल्या राहुलने 3 चेंडूत 11 धावा केल्या.

दरम्यान भारतातील अनेक बँकांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी आरोप असलेले उद्योजक विजय मल्या यांची उपस्थिती अनेकांना चकित करणारी होती.

मी मॅच बघण्यासाठी आलो आहे असं त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना सांगितलं.

विजय यांचे चिरंजीव सिद्धार्थ मल्या यांनी फेसबुकवर वडिलांसोबत ओव्हल मैदानातील फोटो टाकला आहे.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवत वर्ल्ड कप अभियानाची सुरुवात केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजला हरवत दमदार सुरुवात केली आहे.

खेळपट्टी चांगली आहे. कोरडी आणि घट्ट स्वरुपाची खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर आधीही मॅचेस झाल्या आहेत. जशी मॅच पुढे सरकेल तशी खेळपट्टी संथ होत जाईल. निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. त्यामुळे टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणं श्रेयस्कर असं विराट कोहलीने म्हटलं होतं.

ओव्हल मैदानाला भारतीय चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)