पाकिस्तानः बलुचिस्तान प्रांतातील ग्वादरमधल्या पंचतारांकित हॉटेलवर हल्ला

फोटो स्रोत, PEARL CONTINENTAL HOTEL
बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर शहरात पर्ल कॉन्टिनेन्टल या पंचतारांकित हॉटेलवर अज्ञात बंदूकधारी व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तीन बंदूकधारी व्यक्तींनी केलेल्या या हल्ल्यात एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे.
फुटीरतावादी संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं (BLA) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. चीन आणि परदेशी गुंतवणूकदारांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला केल्याचंही BLAनं म्हटलं आहे.
या संघटनेशी संबंधित असलेल्या एका ट्विटर अकाउंटवरून चीन आणि पाकिस्तानवर यापुढेही हल्ले करण्याची धमकी देण्यात आलीये.
हॉटेलच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार रमजान आणि सुट्ट्या असल्यामुळे लोकही कमी होते आणि कर्मचारीही फारसे नव्हते. उर्वरित लोकांना बाहेर काढत हॉटेल रिकामं करण्यात आल्याचं वृत्तही देण्यात आलं आहे. मात्र हल्ला झाला तेव्हा हॉटेलमध्ये नेमके किती लोक होते, याची माहिती मिळालेली नाहीये.
केव्हा झाला हल्ला?
स्थानिक वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी हॉटेलवर हल्ला करण्यात आला. सुरक्षा कर्मचाऱ्यानं हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच हल्लेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या गोळीबारात संबंधित सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील एका टेकडीवर हे हॉटेल आहे आणि त्याच्या समोरच ग्वादर बंदर आहे.
पोलीस, फ्रंटिअर कोअर आणि अन्य सुरक्षा यंत्रणा हॉटेलमध्ये कार्यरत असल्याची माहिती बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर जियाउल्लाह यांनी बीबीसीला दिली.

फोटो स्रोत, Getty Images
हल्ल्याच्या वेळी हॉटेलमध्ये कोणताही परदेशी नागरिक उपस्थित नसल्याची माहितीही मीर जियाउल्लाह यांनी दिली.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या माजिद ब्रिगेडनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
ग्वादरमध्ये गेल्या महिन्यातच कट्टरपंथीयांनी 11 सुरक्षारक्षकांसह 14 जणांची हत्या केली होती.
या भागात अनेक कट्टरपंथी संघटना कार्यरत आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानी तालिबान, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि सुन्नी मुस्लिम कट्टरपंथी समूह लष्कर-ए-झांग्वीचा समावेश आहे.
ग्वादर, चीन आणि पाकिस्तान दरम्यानच्या 'इकॉनॉमिक कॉरिडॉर'चं मुख्य केंद्र आहे. इथं चीनचे अनेक इंजीनिअर्स तसंच इतर कर्मचारीही मोठ्या संख्येनं आहेत.
ग्वादरची पश्चिम सीमा इराणला लागून आहे.
काय आहे बलुचिस्तानमधली परिस्थिती?

फोटो स्रोत, Getty Images
बलुचिस्तान पाकिस्तानचा सर्वांत गरीब आणि अविकसित प्रांत आहे. इथं गेल्या अनेक वर्षांपासून फुटीरतावादी कारवाया सुरू आहेत.
बलुचिस्तान प्रांताच्या सीमा इराण आणि अफगाणिस्तानला लागून आहेत. अनेक ठिकाणी या सीमांवरील सुरक्षेत त्रुटी असून दोन्हीकडील नागरिक सहजपणे ये-जा करतात.
इथली अर्थव्यवस्था ही मुख्यतः नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहे. नैसर्गिक वायू हा बलुचिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार आहे. 'बेल्ट अँड रोड' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत चीननं बलुचिस्तान प्रांतांत प्रचंड गुंतवणूक केली आहे. इथं पायभूत सोयीसुविधांचा विकास चीनकडून केला जात आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























