फ्रान्समध्ये इंधन दरवाढीचा प्रश्न पुन्हा पेटला: पॅरिसमध्ये तीव्र निदर्शनं, 110 जखमी

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

फ्रान्समध्ये इंधन दरवाढीच्या प्रश्नाने चांगलाच पेट घेतला असून, काल राजधानी पॅरिसमध्ये आंदोलकांनी निदर्शनं केली. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात कमीत कमी 110 लोक जखमी झाले तर 260 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, सुन्न करणारे स्टन ग्रेनेड टाकले आणि पाण्याचा तीव्र मारा केला.

फ्रान्समध्ये डिझेलच्या किंमती गेल्या 12 महिन्यात 23 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जागतिक पातळीवर तेलाच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. मात्र फ्रान्समध्ये किमती वाढूनसुद्धा त्या कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

त्यामुळे लोकांचा सरकारवर रोष आहे.

पॅरिसमध्ये शनिवारी झालेल्या निदर्शनांचे पडसाद अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस एरिसमध्ये सुरू असलेल्या G-20 परिषदेतही उमटले. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पॅरिसमध्ये झालेली निदर्शनं अनुचित असल्याचं सांगितलं आहे.

इंधन दरवाढीविरोधात याआधी 17 नोव्हेंबरला देशव्यापी निदर्शनं झाली होती. त्यात किमान तीन लाख लोक रस्त्यावर उतरली होती.

गेल्या आठवड्यात पॅरिसमध्ये आंदोलकांनी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा चँप्स एल्यिस या ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये ठिणगी पडली होती आणि त्यात 19 लोक जखमी झाले होते. यात चार पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता.

त्यानंतर सोशल मीडियावर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनच्या आर्थिक धोरणांवर टीका वाढत गेली आणि निदर्शनांची तीव्रता वाढत गेली.

आंदोलकांच्या रोषाचं कारण काय?

फ्रान्समध्ये डिझेलच्या दरात गेल्या वर्षभरात 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या साधारण दर 1.51 युरो प्रतिलीटर म्हणजे अंदाजे 121 भारतीय रुपये एवढा असून, हा दरातला उच्चांक यापूर्वी 2000च्या आसपास होता.

जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढल्या, त्यानंतर कमीसुद्धा झाल्या. मात्र मॅक्रॉन सरकारने यावर्षी डिजेलवरील हायड्रोकार्बन टॅक्स प्रतिलिटर 7.6 सेंट्सने (100 सेंट्स = 1 युरो) वाढवला आहे. तसंच पेट्रोलवर ही वाढ प्रतिलीटर 3.9सेंट्सनी झाली आहे.

पण या सगळ्या प्रकरणात खरी ठिणगी तेव्हा पडली जेव्हा सरकारने सध्या असलेल्या दरांवर आणखी 6.5 सेंट्स प्रतिलीटर (डिजेल) कर आणि 2.9 सेंट्स प्रतिलीटर (पेट्रोल) कर लादण्याची घोषणा केली.

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी इंधनवाढीसाठी जागतिक पातळीवरील तेलाच्या किमतींना दोषी ठरवले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांशी निगडित प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी खनिज तेलांवर जास्त कर लावावा लागेल, असं मॅक्रॉन म्हणाले आहेत.

आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असून या आंदोलनाला Yellow Vest असं नाव देण्यात आलं आहे. साधारण 2,80,000 आंदोलकांनी या निदर्शनांमध्ये भाग घेतला असून 2000 विविध जागांवर गेल्या शनिवारपासून आंदोलन सुरू आहे.

Yellow Vest म्हणजे काय?

एखादी कार कुठे खराब झाली तर ड्रायव्हरने भडक पिवळ्या रंगाचं बनियनसदृश जॅकेट घालून ती दुरुस्त करणं फ्रान्समध्ये बंधनकारक आहे. कार खराब झाल्यावर रस्त्याच्या बाजूला एक रिफ्लेक्टर त्रिकोण ठेवावा लागतोच, पण त्याबरोबर हे पिवळं जॅकेटसुद्धा घालावं लागतं, अन्यथा दंड भरावा लागू शकतो.

हेच पिवळं जॅकेट किंवा वेस्ट या आंदोलनाचं प्रतीक बनलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)