You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फ्रान्समध्ये पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात लोक रस्त्यावर; 1 ठार 200 जखमी
इंधनांच्या वाढत्या किमती विरोधात फ्रान्समध्ये आंदोलन सुरू असून यात 1 महिलेचा बळी गेला असून 200वर जखमी झाले आहेत. फ्रान्समध्ये सर्वसाधारणपणे वाहनांत इंधन म्हणून डिझेलचा वापर होतो. गेल्या वर्षभरात डिझेलच्या किमती 23 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढून कमी झाल्या असल्या तरी मॅक्रॉन सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील हायड्रोकार्बनच्या करात 7.6 सेंट आणि 3.9 सेंट अनुक्रमे वाढ केली आहे. तर 1 जानेवारीपासून डिझेलवरील करात 6.5 आणि पेट्रोलवरील करात 2.6 सेंट इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या किमती अधिक वाढणार आहेत.
पॅरिसमध्ये आंदोलकांनी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडी फोडून आंदोलकांना पांगवले.
चमकदार पिवळ्या रंगाचे जॅकेट परिधान करून आंदोलक या आंदोलनात भाग घेत आहेत. आंदोलकांनी घेरल्याने घाबरलेल्या एका कार चालकाने वेगाने कार दामटल्याने झालेल्या अपघातामध्ये एका महिला आंदोलकाचा बळी गेला आहे.
सरकार सर्वसामान्यांना विसरत असल्याची टीका आंदोलकांनी केली आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या आंदोलकांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण गेल्या आठवड्यात ते म्हणाले होते की त्यांना जनता आणि नेते यांच्यात एकमत घडवता आलेलं नाही. तर जागतिक पातळीवर तेलाचे दर वाढत असल्याने हे दरवाढ झाली असून अपारंपरिक ऊर्जासाधांनांत गुंतवणूक करण्यासाठी करवाढ आवश्यक असल्याचं मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. तर बुधवारी गरीब कुटुंबांना इंधनासाठी सबसिडीची घोषणा करण्यात आली आहे. ही सबसिडी सध्या 36 लाख कुटुंबांना मिळते. ती आता 56 लाख कुटुंबांना देण्यात येणार आहे. विरोधी पक्षाने सरकारने पुढील करवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.
फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या आंदोलनात 2 लाख 80 हजार लोकांनी भाग घेतला आहे. आंदोलक रस्ते अडवत आहेत. हे आंदोलन शांतते सुरू असलं तरी आंदोलक रस्ते रोखल्यानंतर मार्ग काढताने वाहन चालकांकडून अपघात होऊन 227 लोक जखमी झाले असून 7 गंभीर आहेत.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)