You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदींना विरोध करणार नाही, त्यांना सुधारणार - कपिल सिब्बल
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -
1. मोदींना विरोध करणार नाही, त्यांना सुधारणार - कपिल सिब्बल
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणार नाही, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न मी करणार आहे," असं वक्तव्य राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी केलं आहे.
देशातील अन्यायाविरोधात लढण्यासाठी खासदार कपिल सिब्बल यांनी इन्साफ मंचाची स्थापना केली असून त्यामध्ये नागरिक आणि वकील एकत्रित काम करणार असल्याचं सांगितलं.
सध्या देशात नागरिकांच्या हक्कांच्या विरोधात काम करणारं सरकार सत्तेत असल्याचा आरोप करत अन्यायाविरोधात लढण्यासाठी 'इन्साफ' या नव्या व्यासपीठाची स्थापना केल्याचं सिब्बल यांनी सांगितलं.
गैरभाजप मुख्यमंत्र्यांनी आणि नेत्यांनी या उपक्रमात सामील होण्याचं आवाहन त्यांनी केलं.
येत्या 11 मार्च रोजी दिल्लीतील जंतरमंतर या ठिकाणी आपण एक बैठक बोलवली असून त्यामध्ये भारतासाठी एक नवीन दृष्टीकोन मांडणार आहे, असं ते म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली.
2. 'तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तरी पोराला मंत्री करायला नको होतं'
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गेल्या 8-9 महिन्यांपासून ठाकरे गटातील नेते त्यांच्यावर जोरदार निशाणा साधताना दिसत आहेत.
दरम्यान, ठाकरे गटात असलेल्या एका खासदाराने एका भाषणात उद्धव ठाकरे यांनाच घरचा आहेर दिला आहे.
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, पण तुम्ही तुमच्या मुलाला मंत्रिपद द्यायला नको होतं, असं मत परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी व्यक्त केलं.
ते पुढे म्हणाले, "तुम्ही खुर्ची अडवल्याने यांना (बंडखोरांना) वाटलं की उद्या बाप गेल्यावर पोरगं माझ्या बोकांडी बसेल. त्यापेक्षा वेगळी चूल मांडली तर काय बिघडलं, याच भूमिकेतून ही गद्दारी झाली," असं खासदार जाधव म्हणाले.
शिवाय, "उद्धव ठाकरे यांनी मधल्या काळात पक्षसंघटनेकडे लक्ष द्यायला हवं होतं. ते देऊ शकले नाहीत, म्हणून आमच्यावर हा प्रसंग ओढवला आहे," असंही जाधव यांनी म्हटलं आहे. ही बातमी लोकमतने दिली.
3. राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा - उदयनराजे
काहींचा स्वभाव विकृत असतो. परंतु, या विकृतीची वाढ होते, तेव्हा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातं. तुमचा उरला-सुरला पक्ष वाढवण्याचं काम जरूर करा, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच तुमचा पक्ष उभा आहे, त्यामुळे राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा, असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
सातारा येथील दौऱ्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला खासदार उदयनराजे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
उदयनराजे म्हणाले, "संजय राऊत यांना मी महत्त्व देत नाही. अशा प्रवृत्ती व्यक्तीकेंद्रित आहेत. परंतु, त्यांनी मोजून-मापून वक्तव्य केलं पाहिजे. लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग व्हावा, ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली. त्याच संकल्पनेवर भारत सर्वात मोठा लोकशाही देश बनला आहे." ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
4. वाशिम जिल्ह्याचं नाव वस्तगुलम करण्याची मागणी
राज्यातील उस्मानाबाद आणि औरंगाबाद शहराचे धाराशिव, संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर आता वाशीम शहराचे नाव बदलून वत्सगुल्म करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली असून सोशल मीडियावर देखील प्रचार, प्रसार होत आहे.
जवळच निजामशाही असल्यामुळे उर्दूमिश्रित शब्दांचा प्रभाव या ही परगण्यात झाला. त्यामुळे वत्स या शब्दाचा वच्छ आणि गुल्म शब्दाचा उम असा अपभ्रंश झाला. त्यापासून वच्छोम, वाच्छिम आणि वाशीम असा शब्द तयार झाला. वाशीमचे नाव वत्सगुल्म करावे, ही मागणी जुनीच आहे.
1999-2000च्या दरम्यान या मागणीने जोर धरला होता. अनेक वर्ष शहरात वत्सगुल्म (वाशीम) असे दुहेरी नाव वापरा असे फलक झळकत होते.
विद्यमान शासनाची अनुकूलता लक्षात घेवून वत्सगुल्म नामांतर जनजागरण मंच वत्सगुल्मच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. ही बातमी लोकसत्ताने दिली.
5. एसटी महामंडळाच्या निमआराम श्रेणीत हिरकणी बसला नवा अवतार
एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 'हिरकणी' बस राज्यभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे निम आरामदायी श्रेणीच्या या बसेसची नव्याने रूपात आता बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळातील अकरा हजार गाड्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या इलेक्ट्रीक गाड्यांबरोबरच पारंपारिक डीझेल इंधनाच्या गाड्यांची देखील गरज आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने दोनशे हिरकणी बसेसचा आपल्या ताफ्यात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी महामंडळातील हिरकणी ब्रॅंड पुन्हा नव्या आधुनिक रूपात येणार आहे. पुश बॅक आसनाच्या नव्या 200 हिरकणी बसेसची बांधणी एसटी महामंडळाच्या कारखान्यात होत असून प्रवाशांच्या सोयीसाठी हिरकणी बसेस महत्वाच्या ठरणार आहेत. एसटी महामंडळाने 200 'हिरकणी' बसेसचा आपल्या ताफ्यात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसगाड्यांमध्येही प्रवाशांसाठी 'पुश बॅक' आसनांची देखील सोय असणार आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)