शिवाजी पार्कवर हल्ला करणाऱ्यांचे 'कोच' कोण, हेसुद्धा माहितीय - संदीप देशपांडे

Published

मला मारण्याचा प्रयत्न कुणी केला, हे मला माहीत आहे, पण जोपर्यंत पोलीस तपास होत नाही, तोपर्यंत याबाबत बोलणं योग्य राहणार नाही, असं वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं.

काल झालेल्या मारहाणीसंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देशपांडे बोलत होते.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

शिवाजी पार्कवर नेहमीप्रमाणे मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो. पाच नंबर गेटकडून मी पुढे जात होतो. अचानक मला मागून काही मार लागला. एखादा बॉल आहे का, पाहण्यासाठी मी मागे वळालो, तर एक जण स्टंपने माझ्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करत होता. तो वार मी उजव्या हाताने रोखला. तेवढ्यात एकाने माझ्या पायावर मारलं, मी खाली पडलो.

त्यांनी डोक्यावर मारण्याचे प्रयत्न केले. पण मी हाताने ते वार झेलले. तेवढ्यात आजूबाजूचे लोक धावत आले. त्यानंतर चौघेही पळून गेले.

आज दोन जणांना अटक केल्याची माहिती मला मिळाली, माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, असं देशपांडे यांनी म्हटलं.

घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करू नये, यासाठी ही मारहाण कुणी करत असल्यास त्यांना मी सांगू इच्छितो की या मारहाणीने मी घाबरणारा नाही.

माझ्यावरील हल्ल्यामागचा खरा सूत्रधार लवकरच समोर येईल, असंही देशपांडे यांनी म्हटलं.

शुक्रवारी झाला होता हल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर स्टंप आणि रॉडने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी (3 मार्च) पहाटे संदीप देशपांडे हे मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले असता 4 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला झाला.

देशपांडे यांच्यावर टोळक्याने संदीप देशपांडे यांच्यावर स्टम्प आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने हल्ला चढवला.

हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत देशपांडे यांच्या हात आणि पायाला दुखापत झाली. यानंतर त्यांना तत्काळ जवळच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन देशपांडे यांची विचारपूसदेखील केली.

हल्लेखोरांनी चेहऱ्याला मास्क लावले होते त्यामुळे ते ओळखू आले नाहीत अशी माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

जखमी संदीप देशपांडे यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून अधिक माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.

अद्याप, हल्लेखोरांची ओळख पटू शकली नसून पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली आहे.

संदीप देशपांडे आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी एकटेच शिवाजी पार्कला गेले.

त्यावेळी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर चार ते पाच लोक बसले होते. त्यांच्या तोंडावर मास्क होते. देशपांडे येताच या टोळक्याने संदीप देशपांडे यांच्यावर स्टम्प आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने हल्ला चढवला.

हा सगळा प्रकार पाहून आजुबाजूचे लोक संदीप देशपांडे यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)