You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'गाडीत दारू आहे', बनावट पोलिसांची आयडिया; काही मिनिटांतच लुटले दीड टन दागिने
- Author, भार्गव परीख
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
अमित कहर हे गेल्या आठ वर्षांपासून राजकोटच्या न्यूज एअर सर्व्हिस या कुरिअर कंपनीत ड्रायव्हरचं काम करत आहेत. 17 फेब्रुवारीला संध्याकाळी ते आणि त्यांचा एक सहकारी त्रिवेणी राबेता राजकोटहून अहमदाबादकडे निघाले.
त्यांच्याकडे काही कुरिअरचे पार्सल होते जे अहमदाबाद विमानतळावर पोहोचवायचे होते. पण त्यांना वेळेत अहमदाबादला पोहोचताच आलं नाही. त्यांच्या कंपनीचं आणि कंपनीमार्फत कुरिअर माल पाठवणाऱ्या व्यापाऱ्यांचं एकूण 3 कोटी 93 लाख 61 हजार 318 रुपयांचं नुकसान झालं.
काही चोरट्यांनी अमित आणि क्लिनर त्रिवेणी यांची एसयुव्ही राजकोट- अहमदाबाद महामार्गावरील सायलाजवळील मॉडर्न हायस्कूलजवळ अडवली.
आणि एसयूव्हीमधून 992 किलो चांदी आणि 704 किलो वजनाची इमिटेशन ज्वेलरी लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
बीबीसी गुजरातीशी बोलताना अमित कहर यांनी सांगितलं की, "अचानक काही लोक आले आणि आमच्या गाडीला तिन्ही बाजूंनी घेरण्यात आलं. आमच्या गाडीतून दारूची वाहतूक होत असल्याचं सांगून आम्हाला मारहाण करण्यात आली आणि नंतर आमच्या डोळ्यावर पट्टी बांधली. मी जेव्हा डोळ्यावरची पट्टी काढली तेव्हा मला माझ्यासोबत असलेला क्लिनर कुठेच दिसत नव्हता."
त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली
- राजकोटच्या न्यूज एअर सर्व्हिस कुरिअर कंपनीचे ड्रायव्हर अमित कहर 17 फेब्रुवारीला सुमारे चार कोटी रुपये किमतीचे सामान घेऊन अहमदाबाद विमानतळाकडे निघाले होते.
- सुरेंद्रनगरमधील सायलाजवळ त्यांची एसयूव्ही अडवण्यात आली.
- समोरून एक सहा फूट उंचीचा धिप्पाड माणूस आला आणि त्याने अमित कहर यांना पोलीस असले असल्याची बतावणी केली. लोखंडी पाईपने त्यांच्या डोक्यात वार केले.
- पुढे अमित कहर यांचे हात- डोळे बांधून त्यांना गाडीतून खाली फेकून देण्यात आलं. चोरट्यांनी गाडीतील कोट्यवधींचा ऐवज लुटला होता.
कुरिअर कंपनीच्या व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या बोलेरोमध्ये एकूण 704 किलो वजनाचे 30 इमिटेशन दागिन्यांचे जोड होते. आणि 993 किलो चांदीचे 64 पार्सल होते.
यातल्या इमिटेशन ज्वेलरीची किंमत पाच लाख 12 हजार 996 रुपये तर चांदीच्या पार्सलची किंमत 3 कोटी 88 लाख 43 हजार 351 रुपये असल्याचे पोलीस तक्रारीत सांगण्यात आलंय. या चोरट्यांनी ड्रायव्हर आणि क्लिनरचे फोन आणि बोलेरो गाडी देखील लंपास केली.
ज्या महामार्गावर चोरी झाली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. शिवाय चोरट्यांचे फोन लोकेशन शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
काही बोलण्यापूर्वीच डोक्यात लोखंडी पाईप मारला...
या घटनेविषयी अमित कहर सांगतात, "रात्रीचे साडेअकरा वाजले असतील, पाठीमागून येणाऱ्या एका कारने आम्हाला ओव्हरटेक करून आम्हाला अडवलं. आम्हाला काही कळायच्या आतच दुसरी कार आमच्या शेजारी आली. आणि तिसरी गाडी अगदी मागोमाग थांबली."
कारमधून एक सहा फुटाचा माणूस उतरला आणि अमितला म्हणाला, "तुमच्या गाडीतून दारूची तस्करी सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. ही गाडी जप्त करून तुम्हाला पोलिस स्टेशन मध्ये न्यावं लागेल."
अमित पुढे सांगतात, "पण मी पुढे काही बोलायच्या आतच त्याने माझ्या डोक्यात लोखंडी पाईप मारला आणि आम्हा दोघांना गाडीतून उतरवून त्यांच्या गाडीत बसवलं."
गाडीत बसवल्यानंतर दोघांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली, हातपाय बांधले.
या प्रवासादरम्यान त्यांना मारहाण झाल्याचा आरोप अमित कहर यांनी केला आहे.
'दूरवर रस्ता दिसत नव्हता'
अमित पुढे सांगतात, "अर्धा तास प्रवास केल्यानंतर गाडी थांबली आणि त्यांनी मला गाडीतून ढकलून दिलं. गाडी दूरवर गेली असल्याचा अंदाज आल्यावर मी माझ्या डोळ्यावर बांधलेली पट्टी सोडली. मला ज्या ठिकाणी फेकण्यात आलं तिथून दूरपर्यंत मला कोणता रस्ता दिसत नव्हता. मी माझे बांधलेले हातपाय सोडले आणि रस्ता शोधण्यासाठी निघालो."
बराच वेळ चालल्यावर हायवे दिसला. हायवेवर आल्यानंतर त्यांनी जाणाऱ्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला. शेवटी एक गाडी थांबली आणि त्यातल्या ड्रायव्हरने त्यांना मदत केली.
अमित त्यांना मिळालेल्या मदतीविषयी सांगतात की, "त्या गाडीच्या ड्रायव्हरने मला त्याचा फोन दिला. त्यावरून मी पिंटूभाईला फोन केला. गाडीच्या ड्रायव्हरने मला करणी गावच्या बस स्टँडवर सोडलं. दोन तासांत पिंटूभाई पोलिसांना घेऊन आले. नंतर आम्ही तक्रार दाखल केली."
सायला परिसरात गेल्या दोन वर्षात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
- यापूर्वी अरविंद कांतीलाल अंगडिया यांना सायला महामार्गावर अडवून 80-82 लाखांचा ऐवज लुटण्यात आलाय.
- मध्यंतरी 95 लाखांचा माल घेऊन जाणाऱ्या एका सुताराला समतपूर गावाजवळ लुटण्यात आलं होतं.
- पेट्रोल भरून चहा पिण्यासाठी थांबलेल्या अंगडिया यांच्या गाडीचं छत कापून तीन लाखांचा माल चोरून नेण्यात आला होता.
- बगथना गावाजवळ ट्रकची ताडपत्री फाडून 1.62 लाखांचा ऐवज लंपास केला.
- सायला हायवेवर असलेले चार एटीएम लुटण्याचा प्रयत्न झालाय.
'50 व्यापाऱ्यांकडे दीड टनापेक्षा जास्त दागिने होते '
कंपनीच्या कामकाजाविषयी बोलताना न्यूज एअर सर्व्हिसचे मॅनेजर बिंदू सिंग म्हणतात, "मागील नऊ वर्षांपासून आमची कंपनी एअरकार्गोच्या माध्यमातून भारतभर माल पाठवते आहे."
"आम्ही नेहमीच राजकोटहून अहमदाबाद विमानतळावर मालाची ने-आण करत असतो."
"यावेळी चोरी झालेल्या मालामध्ये इमिटेशन ज्वेलरीचे एकूण 704 किलोचे 30 पार्सल आणि 993 किलो चांदीचे 64 पार्सल होते."
हा माल नेमका कुठे पाठवला जात होता? या प्रश्नावर बिंदू सिंग म्हणाले, "चोरीला गेलेला सर्व माल हैदराबाद, कोईम्बतूर आणि पाटण्यातील 50 व्यापाऱ्यांचा होता."
"आम्हाला रात्री ड्रायव्हरचा फोन आला त्यामुळे आम्ही लगेचच घटनास्थळी पोहोचलो आणि पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावेळी त्रिवेणी कुठे आहे याची काहीच खबरबात नव्हती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो ही सापडला."
चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर सुरेंद्रनगर पोलिसांनी तपास सुरू केला. जिल्ह्याचे एसपी हरेश दुधात यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, राजकोट आणि मोरबी जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखाही या चोरट्यांच्या मागावर आहेत.
"मुंबई-आग्रा महामार्गावर याच पद्धतीनं अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. हे चोरटे एकमेकांशी गुजरातीमध्ये बोलत होते. त्यामुळे ते गुजरातचेच आहेत की गुजराती आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत याचा तपास सुरू आहे."
पोलिस तपासाबाबत बोलताना एसपी हरेश दुधात म्हणाले की, तीन जिल्ह्यांच्या स्थानिक गुन्हे शाखांनी एकूण 15 पथकं तयार केली आहेत. घटना घडल्याच्या 30 किलोमीटर परिघातील हॉटेल आणि टोल प्लाझाचे सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू आहे.
ते पुढे म्हणाले की, "ज्या पद्धतीने चोरी झाली आहे ते पाहता चोरट्यांनी कुरिअरच्या कार्यालयावर पाळत ठेवली असणार. त्यामुळे आम्ही कार्यालयाचे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहोत."
याशिवाय ड्रायव्हर आणि क्लिनरचे चोरीला गेलेले फोन आणि चोरीला गेलेल्या गाडीचं शेवटचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
याप्रकरणी एसपी दुधात यांनी सांगितलं की, या प्रकरणातील काही धागेदोरे पोलिसांच्या हाती आले असून लवकरच चोरट्यांना गजाआड करण्यात येईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)