You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Ind vs Ban: थरारक लढतीत भारताचा बांगलादेशवर विजय
पावसाने व्यत्यय आणलेल्या अटीतटीच्या लढतीत भारताने बांगलादेशवर 5 रन्सनी विजय मिळवला. शेवटच्या ओव्हरमध्ये बांगलादेशला 20 रन्सची आवश्यकता होती. अर्शदीप सिंगने टिच्चून मारा करत बांगलादेशला रोखलं.
या विजयामुळे भारताचा सेमी फायनलचा प्रवेश पक्का मानला जात आहे. भारतीय संघाने पाकिस्तान, नेदरलँड्स आणि आज बांगलादेशला नमवल्यामुळे भारताचे 4 मॅचमध्ये मिळून 6 गुण झाले आहेत. गुणतालिकेत दुसऱ्या गटात भारतीय संघ अव्वल स्थानी आहे.
भारताने दिलेल्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने लिट्टन दासच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर चांगली सुरुवात केली आहे. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा बांगलादेशच्या 7 ओव्हर्समध्ये बिनबाद 66 रन्स झाल्या होत्या. लिट्टन दास नाबाद 59 तर नजमुल होसेन मंटो 7 रन्सवर खेळत होते.
लिट्टनने प्रत्येक भारतीय बॉलर्सचा समाचार घेत खणखणीत सुरुवात केली. यानंतर पावसाचं आगमन झालं. पावसाचा जोर वाढल्यामुळे जवळपास तासभराचा वेळ गेला. मॅच थांबली तेव्हा बांगलादेशला 13 ओव्हर्समध्ये 119 रन्सची आवश्यकता होती.
पावसामुळे वेळ वाया गेल्याने मॅच 16 ओव्हर्सची करण्यात आली. बांगलादेशसमोर 151 रन्सचं सुधारित लक्ष्य ठेवण्यात आलं. यामुळे बांगलादेशला 54 बॉलमध्ये 85 रन्सचं नवीन लक्ष्य मिळालं. पावसामुळे लय बिघडलेल्या लिट्टन दासला लोकेश राहुलच्या अफलातून थ्रोने रनआऊट केलं. लिट्टनने 27 बॉलमध्ये 60 धावांची खेळी केली. यामध्ये 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. लिट्टन आऊट झाला आणि बांगलादेशची लयच हरपली.
रनरेटचं दडपण वाढत चालल्याने बांगलादेशचे बॅट्समन मोठे फटके मारू लागले. नजमुल शंटोला मोहम्मद शमीला आऊट केलं. अतिफ होसेनला अर्शदीपने माघारी धाडलं. अर्शदीपच्या बॉलिंगवर अनुभवी शकीब उल हसनचा कॅच बदली खेळाडू दीपक हुड्डाने पकडला आणि भारतीय संघाने सुटकेचा निश्वास टाकला. पावसामुळे मैदान निसरडं बनलेलं असताना दीपकने समयसूचकतेने कॅच टिपला.
हार्दिक पंड्याने धोकादायक यासिर अलीला आऊट करत बांगलादेशला आणखी एक धक्का दिला. त्याच ओव्हरमध्ये मोसादेकलाही आऊट करत हार्दिकने बांगलादेशला अडचणीत टाकलं.
शेवटच्या ओव्हरमध्ये बांगलादेशला 20 रन्सची आवश्यकता होती. पहिल्या बॉलवर एकच रन निघाली. दुसऱ्या बॉलवर नुरूल हसनने उत्तुंग सिक्स खेचला. तिसऱ्या बॉलवर नुरुलला एकही रन घेता आली नाही. चौथ्या बॉलवर नुरुलने दोन रन्स घेतल्या. पाचव्या बॉलवर नुरुलने फोर लगावत भारतीय चाहत्यांचा तणाव वाढवला. शेवटच्या बॉलवर बांगलादेशला जिंकण्यासाठी 7 तर सुपर ओव्हरसाठी टाय करण्याकरता सिक्सर हवा होता. अर्शदीपच्या बॉलवर नुरुलला एकच रन घेता आली आणि भारतीय चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
दरम्यान भारताने दिलेल्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने लिट्टन दासच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर चांगली सुरुवात केली आहे. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा बांगलादेशच्या 7 ओव्हर्समध्ये बिनबाद 66 रन्स झाल्या आहेत.
लिट्टन दास नाबाद 59 तर नजमुल होसेन मंटो 7 रन्सवर खेळत आहेत. लिट्टने प्रत्येक भारतीय बॉलर्सचा समाचार घेत खणखणीत सुरुवात केली. डकवर्थ लुईस प्रणालीनुसार तूर्तास बांगलादेशचा संघ आघाडीवर आहे.
के.एल.राहुल आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय संघाने वर्ल्डकपमधल्या बांगलादेशविरुद्धच्या लढतीत पावणेदोनशेचा टप्पा ओलांडला. विराट कोहली आणि के.एल.राहुल यांची अर्धशतकं भारतीय इनिंग्जचं वैशिष्ट्य ठरलं.
गांधीजयंतीदिनी लोकेश राहुलने गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतकी खेळी साकारली होती. दुखापतीतून सावरलेल्या राहुलचं ते पुनरागमन होतं.
ऑस्ट्रेलियात गेल्यापासून राहुलची बॅट तळपली नाही. पाकिस्तान, नेदरलँड्स तसंच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठी खेळी करता न आल्याने राहुलला संघातून वगळावं अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.
राहुलऐवजी ऋषभ पंतला समाविष्ट करावं अशी मागणीही होऊ लागली. पण बांगलादेशविरुद्धच्या लढतीपूर्वी कोच राहुल द्रविड यांनी राहुलला ठाम पाठिंबा दिला. राहुल अंतिम अकरात असेल यावर राहुल यांनी शिक्कामोर्तब केलं.
संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत राहुलने बांगलादेशविरुद्ध अर्धशतकी खेळी साकारली. बांगलादेशने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरणात आणि आव्हानात्मक खेळपट्टीवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा झटपट आऊट झाला पण राहुलने खेळपट्टीचा अंदाज घेत आगेकूच केली.
राहुल-विराट जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 67 रन्सची भागीदारी केली. मोठे फटके आणि एकेरीदुहेरी धावांची सुरेख सांगड घालणाऱ्या राहुलने खेळपट्टीचा अंदाज आल्यावर मोठे फटके खेळायला सुरुवात केली.
स्पर्धेत झंझावाती फॉर्ममध्ये असणाऱ्या सूर्यकुमारने या मॅचमध्येही बॅटचा दणका दाखवला. त्याने 16 बॉलमध्ये 4 फोरसह 30 धावांची वेगवान खेळी केली.
खेळपट्टीवर स्थिरावलेला सूर्यकुमार धोकादायक ठरणार असं वाटत असतानाच शकीबने त्याला आऊट केलं. हसन महमूदच्या बॉलिंगवर बॉलला टपली मारण्याचा हार्दिक पंड्याचा प्रयत्न यासिर अलीच्या हातात जाऊन विसावला. त्याला 5 रन्स करता आल्या.
विराटने 37 बॉलमध्येच अर्धशतक पूर्ण केलं. दिनेश कार्तिक चोरटी रन घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाला तर हसन महमूदच्या फसव्या बॉलवर अक्षर पटेल फसला. रवीचंद्रन अश्विनने 6 बॉलमध्ये 13 रन्स करत कोहलीला चांगली साथ दिली.
कोहली खेळीदरम्यान आयसीसी ट्वेन्टी20 वर्ल्कप स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरला. याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनेच्या नावावर होता.
कोहलीने संपूर्ण 20 ओव्हर्स खेळत 44 बॉलमध्ये नाबाद 64 रन्सची खेळी केली. दुसऱ्या बाजूने सातत्याने सहकारी आऊट होत असतानाही कोहलीने नेहमीच्या हातोटीने खेळ करत बांगलादेशच्या बॉलर्सना निरुत्तर केलं.
23 ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीच्या अफलातून खेळीच्या बळावर भारताने संस्मरणीय विजय साकारला. यानंतर भारतीय संघाने नेदरलँड्सचे आव्हान परतावून लावले.
पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर आफ्रिकेच्या भेदक बॉलिंगसमोर भारतीय बॅट्समननी शरणागती पत्करली. डेव्हिड मिलर आणि एडन मारक्रम यांनी दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)