शशी थरुर की मल्लिकार्जुन खरगे? काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, ANI
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट यांचा घेतलेला आढावा
1.काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान
आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले जाणार आहे. मतदानासाठी देशभरातील 40 केंद्रांवर 68 बूथ स्थापन करण्यात आले आहेत.
राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
9800 मतदार शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यापैकी एकाची निवड करतील. या निवडणुकीत भारत जोडो यात्रेच्या शिबिरात एक बूथ तयार करण्यात आला असून तेथे राहुल गांधी आणि सुमारे 40 मतदार मतदान करणार आहेत. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
पक्षाच्या मुख्यालयात 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल आणि निकाल घोषित केले जातील. काँग्रेस अध्यक्षपदासाठी तब्बल 22 वर्षांनंतर निवडणूक होत असून तब्बल 24 वर्षांनंतर पक्षाची धुरा गांधी घराण्याबाहेर जाणार आहे.
मतदारांनी मतदानपत्रिकेवरील उमेदवाराच्या नावापुढे मतदान करताना एक क्रमांक टाकावा, असे आधी ठरले होते. मात्र, या मतदानपत्रिकेवरील अनुक्रमानुसार पहिल्या क्रमांकावर मल्लिकार्जुन खर्गे व दुसऱ्या क्रमांकावर शशी थरूर यांचे नाव आहे. जर पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे क्रमांक टाकून मतदान केल्यास गोंधळात भर पडेल व दोन क्रमांकावरील थरूर यांना फटका बसू शकतो, अशी शक्यता थरूर गटाने व्यक्त केली होती.
काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांच्या नावापुढे पसंतीची खूण करावी, असे आवाहन काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने केले आहे. पक्षाध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांच्या गटाने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी हा निर्णय जाहीर केला.
2. अंधेरीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी प्रताप सरनाईक यांचीही मागणी
अंधेरी पूर्वची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्र दिलं आहे. राज ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. 'झी24 तास'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
भाजपच्या नेत्यांशी चर्चा करुन लटके यांना बिनविरोध निवडून देण्याची विनंती सरनाईक यांनी या पत्रातून केली आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आणि ऋतुजा लटके (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात मुकाबला आहे.
3.अन्याय होत असेल तर खडसेंनी कोर्टात जावे- गुलाबराव पाटील
"कोणताही गुन्हा खोटा दाखल होत नसतो, पोलीस चौकशी करूनच गुन्हा दाखल करतात, जे होत आहे ते पाहावे, अन्याय होत असेल तर आपल्यासाठी कोर्ट आहे", या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उत्तर दिले आहे. जळगावात एका भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते, कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, GULABRAO PATIL / FACEBOOK
खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याच षडयंत्र केलं जात असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला होता.
शिंदे गटाकडून धमक्या दिला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे समर्थकांनी जळगावातील एका मेळाव्यात केला आहे. यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे मत व्यक्त केलं. "कोणी धमकी दिली हे जाहीर करावं वाऱ्याला लाथा मारू नये. माझा धंदा हा लोकांची कामे करण्याचा आहे धमकी देण्याचा नव्हे, जे काम करत नाही ते अशाच पद्धतीने उलट्या गोष्टी करतात त्यामुळे त्यांनी काम करावं, लोकांमध्ये विनाकारण गैरसमज पसरवू नये", असं उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे समर्थकांना दिले आहे.
4.मंत्र्यांच्या दाताच्या ऑपरेशनदरम्यान बत्तीगुल
औरंगाबादमध्ये शिंदे गटाचे मंत्री आणि रोजगार हमी योजनेचे मंत्री संदीपान भुमरेंच्या दाताचं ऑपरेशन झाले. मात्र, ऑपरेशन सुरु असतानाच अचानक वीजपुरवठा खंडित झाला. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून भुमरे यांचे ऑपरेशन केले. मात्र, हॉस्पिटलमध्ये जनरेटरच नसल्याचा प्रकार भुमरे यांच्या निदर्शनास आला. यानंतर भुमरे यांनी फोनाफोनी करत आपला संताप व्यक्त केला. 'टीव्ही9मराठी'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, SANDIPAN BHUMARE/ FACEBOOK
मंत्र्यांची शस्त्रक्रिया असल्याने अनेक डॉक्टर उपस्थित होते मात्र वीजपुरवठा खंडित झाल्याने गोंधळ उडाला. मोबाईल टॉर्च वापरुन ऑपरेशन पार पाडलं. ऑपरेशननंतर रुग्णालयात जनरेटर कसा नाही म्हणून भुमरेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितलं की जनरेटरची मागणी मागच्या पाच वर्षांपासून केली आहे. मात्र, त्यावर आजतागायत निर्णय झालेला नाही.
भुमरेंनी रुग्णालयातूनच जनरेटरचा प्रस्ताव तातीडनं मंजुरीचे निर्देश दिले.
5.मध्य प्रदेशात एमबीबीएसचं शिक्षण हिंदीत
देशात पहिल्यांदाच मध्य प्रदेश सरकारने MBBSचं शिक्षण हिंदीत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भोपाळमध्ये प्रथम वर्षाच्या मेडिकलच्या हिंदी भाषेतील पुस्तकांचं प्रकाशन केलं. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"आजचा दिवस भारताच्या शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण, तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणात मातृभाषेला महत्त्व देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेश सरकारने यासंदर्भात पुढाकार घेऊन MBBSचं शिक्षण हिंदी भाषेत उपलब्ध करून दिलं आहे", असं गृहमंत्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "देशातील शिक्षण क्षेत्राच्या पुनर्रनचनेचा क्षण आहे. भाषेमुळे एकही मुलगा वंचित राहणार नाही. कोणत्याही व्यक्तीची विचार करण्याची प्रक्रिया मातृभाषेतून घडते. देशात आता वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि कायद्याचे शिक्षण हिंदीसह देशातील विविध राज्यांमध्ये मातृभाषेतून मिळू शकेल असं शहा म्हणाले".
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























