कानपूरमध्ये भीषण अपघात, ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्यानं 26 जणांचा मृत्यू #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. कानपूरमध्ये भीषण अपघात, ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्यानं 26 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये भीषण अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला असून यात 14 महिलांचा समावेश आहे. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने हा अपघात झाला आहे.

बीबीसी हिंदीनं ही बातमी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण उन्नाव येथील चंद्रिका देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर माघारी परतत असताना कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर परिसरात ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे पाठीमागे असलेली ट्रॉली पलटी झाली आणि सर्वजण त्याखाली दबले गेले.

अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

या अपघातानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांना 2 लाखांची तर, जखमींना 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केली आहे.

2. सरकारी कार्यालयांमध्ये 'हॅलो'ऐवजी 'वंदे मातरम'

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात 'हॅलो' नव्हे 'वंदे मातरम' या अभियानाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना सरकारी कार्यालयात त्यांचे सहकारी, कार्यालयात येणारे अभ्यागत यांच्याशी दूरध्वनी अथवा मोबाइल आदींवर किंवा बैठकीत संवाद साधताना 'हॅलो' या अंगवळणी पडलेल्या शब्दाऐवजी 'वंदेमातरम' असे संबोधन करावे लागणार आहे.

'वंदेमातरम बोलण्याची सक्ती नसेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

शासकीय कार्यालयात दूरध्वनी अथवा परस्परभेटीत संवाद साधताना कोणत्या शब्दाने अभिवादन करायचं याबाबत स्पष्टता नाही. पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करताना 'हॅलो' हा कोणताही विशिष्ट अर्थ नसलेला आणि संभाषणकर्त्यांमध्ये कोणतीही आपुलकी न जागवणारा केवळ एक अभिवादन करणारा शब्द आहे, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.

3. शरद पवारांनी कितीही दौरे केले तरी फरक पडणार नाही - शहाजीबापू पाटील

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कुठेही फिरले तरी त्यांचा आकडा 50 आमदारांच्या वर जात नाही. एवढ्यातच त्यांचा खेळ सुरू आहे. एकदा 50 आकडा ओलांडला तोही स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नामुळे, असा टोला आज सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे.

एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

ते म्हणाले, "शरद पवार यांनी वेगळी काँग्रेस काढली, त्यानंतर राष्ट्रवादीतून इतक्या निवडणूक लढवल्या, पण त्यांना पन्नाशी ओलांडता आलेली नाही. ज्यावेळी 55 ते 60 आमदार आले ते आर. आर. आबा यांचे क्रेडिट होते.

आता कितीही दौरे करा, महाराष्ट्रातील जनता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभी असल्याने किमान पुढची पंधरा वर्षे तरी सुप्रियाताईंनी हे विसरून जावे."

4. मुंबईत संत्र्याच्या ट्रकमध्ये 1476 कोटींचं ड्रग्ज

मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबईच्या वाशी येथून एक ट्रक पकडला आहे. हा ट्रक आयात होणाऱ्या संत्र्यांची वाहतूक करतो. या ट्रकला पकडल्यानंतर त्यात तब्बल 1476 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले आहेत.

डीआरआयने संबंधित ट्रक पकडल्यानंतर त्या ट्रकमध्ये नेमंक काय आहे याची झडती घेण्यास सुरुवात केली. ट्रकचालक आणि त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीने ट्रकमध्ये संत्री असल्याची माहिती दिली. पण अधिकाऱ्यांना संशय आला होता.

त्यामुळे त्यांनी ट्रकची झडती घेतली. यावेळी ट्रकमध्ये 198 हाय प्युरीटी क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन (बर्फ) आणि 1476 कोटी रुपयांचे 9 किलो हाय प्युरीटी कोकेन आढळले. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

5.इंदूर सलग सहाव्यांदा सर्वात स्वच्छ शहर

गांधी जयंतीच्या निमित्ताने 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022' घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात इंदूरला सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून बाजी मारली आहे. तर सुरत आणि नवी मुंबईने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.

हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिलीय.

एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या गंगा नदीच्या काठावरील शहरांमध्ये बिजनौरने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नाशिकच्या देवळालीने कॉन्टेन्मेंटमध्ये पहिली बाजी मारली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)