गावावर कोट्यवधी मुंग्यांचा हल्ला, गावकरी पलायनाच्या तयारीत

मुंग्या
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

मुंग्या कुणाला चावत नाहीत? आपल्या सर्वांनाच मुंग्या कधी ना कधी चावल्या आहेत. कदाचित अजूनही चावत असतील.

मुंगी चावलेल्या जागेचा काही वेळासाठी दाह होतो. नंतर काही वेळाने मुंगीने चावल्याचं विसरून आपण आपल्या कामाला लागतो.

पण, मुंग्यांनी एखाद्या गावावरच हल्ला केला आणि या हल्ल्यात 10 गावकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली, असं तुम्हाला सांगितलं तर?

ही गोष्ट एखाद्या काल्पनिक चित्रपटाच्या कथानकाला शोभेल, असं वाटत असलं तरी हे प्रत्यक्षात घडलं आहे.

लाल मुंग्यांनी एका संपूर्ण गावावरच हल्ला चढवल्याचा प्रकार आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यात समोर आला आहे.

मुंग्यांच्या हल्ल्यामुळे श्रीकाकुलमच्या एसाकालपेट्टा गावचे नागरीक प्रचंड धास्तावले असून गाव सोडण्याची तयारीही त्यांनी सुरू केल्याचं दिसून येतं.

मुंग्यांना कंटाळून एसाकालपेट्टाच्या नागरिकांनी थेट आंध्र प्रदेशच्या विधानसभा अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम यांना एक पत्र लिहिलं. आपल्याला या मुंग्यांच्या तावडीतून सोडवा, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून गावकऱ्यांनी केली.

विशेष म्हणजे, आंध्र प्रदेशचे तम्मिनेनी सीताराम हे एसाकालपेट्टा गावच्या सरपंच वाणी यांचे पती आहेत.

इसाकालपेट्टा

सीताराम यांना लिहिलेल्या पत्रात गावकऱ्यांनी म्हटलं, "आम्हाला वाचवा. मुंग्यांनी आपल्या संपूर्ण गावावरच हल्ला चढवला. मुंग्या चावल्याने आमच्या गावातील दहा जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. हा प्रकार असाच सुरू राहिला तर आम्हाला गाव सोडून जावं लागेल."

याशिवाय, गावकऱ्यांनी श्रीकाकुलमच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही यासंदर्भात निवेदन दिलं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.

मुंग्या अशा प्रकारे भयानक हल्ला करू शकतात का, त्यांनी इसाकालपेट्टा गावावर हल्ला का चढवला, असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थिती झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर बीबीसी न्यूजने येथील गावकरी, सरकारी अधिकारी, डॉक्टर, आणि जीवशास्त्रज्ञांशी चर्चा केली.

इसाकालपेट्टाचे रहिवासी ईश्वरा राव म्हणतात, "आम्ही मुंग्यांच्या चाव्यानंतर रुग्णालयांत दाखल होत आहोत. हे पाहून लोक आपल्याला हसत असतील."

राव पुढे म्हणतात, "गेल्या दोन आठवड्यांपासून गावात हा प्रकार सुरू झाला आहे. सहसा गावांमध्ये कुत्रे, माकडे किंवा इतर प्राणी लोकांवर हल्ले करतात. मात्र इथे मुंग्या आमच्यावर हल्ले करत आहेत. त्यामुळे या मुंग्यांपासून आम्हाला वाचवा, अशी विनंती आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना केली आहे."

"रुग्णालयात दाखल झालेल्या 10 जणांपैकी दोघांना डायबेटिस आहे. त्यांच्यावर उपचार अजूनही सुरू आहे. मुंग्या चावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागत आहे, यावर कुणालाच विश्वास नाही. सगळे जण त्यांची मस्करी करत आहे. मुंग्या चावल्यानंतर कुणी रुग्णालयात जातं का, असा प्रश्न आम्हाला विचारला जात आहे. पण आमचं दुःख कुणी समजून घेत नाही," ईश्वरा राव म्हणतात.

मुंग्या

या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं.

इसाकालपेट्टा गावात चार महिन्यांपूर्वी मुंग्यांचा त्रास सुरू झाला होता. पण या समस्येने आता मोठं स्वरुप धारण केलं आहे. गावात ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने मुंग्यांचं अधिराज्य दिसून येतं.

येथील रहिवासी वनजा बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "तुम्ही घराबाहेर पडला की सगळीकडे तुम्हाला मुंग्याच मुंग्या दिसतात. चहा,कॉफी काहीही प्या, त्यात मुंग्या पडलेल्या असतात. जेवणाला मुंग्या लागलेल्या असतात. लोकांच्या शरीरावर मुंग्यांच्या चाव्याने ठिकठिकाणी डाग पडले आहेत."

इसाकालपेट्टामध्ये मुंग्या का वाढल्या?

याविषयी जाणून घेण्यासाठी बीबीसीने काकतिया युनिव्हर्सिटी येथील प्रा. मामिदाला इस्थारी यांच्याशी चर्चा केली.

त्यांच्या मते, मुंग्यांनी अशा प्रकारे हल्ला करण्याचा प्रकार दुर्मिळ असाच आहे. पण मुंग्यांच्या प्रजातीत लाल मुंग्या या सर्वाधिक हल्लेखोर स्वभावाच्या असतात. कदाचित गावाच्या आजूबाजूला असलेली वारूळं उद्ध्वस्त झाली असतील, त्यामुळे मुंग्यांनी गावात प्रवेश केलेला असू शकतो.

भौगोलिक स्थान

इसाकालपेट्टा हे गाव नागवली नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. या परिसरात अनेक झाडीझुडपे आहेत. काकातिया युनिव्हर्सिटीसुद्धा असाच हिरवळीने भरलेला परिसर आहे. इथेही लाल मुंग्या मोठ्या संख्येने आढळतात, असं प्रा. इस्थारी यांनी म्हटलं.

मुंग्या

एका गावकऱ्याने सांगितलं, "या लाल मुंग्या आम्हाला खरंच चावत आहेत किंवा नाही, हेसुद्धा कळत नाही. त्या अंगावर चढताच त्याठिकाणी जळजळ होऊ लागते. त्याठिकाणी खाजवण्याचा प्रयत्न केला तर तिथे जखम होते."

"गावात मातीच्या वीटभट्ट्याही मोठ्या संख्येने आहेत. आजूबाजूच्या परिसरातून माती आणली जाते. त्यामुळे मातीसोबत मुंग्याही वाहून येतात. इथे त्यांची वाढ झपाट्याने होऊ लागली आहे.

मुंग्यांच्या चाव्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या एका गावकऱ्याशीही बीबीसीने चर्चा केली.

ते म्हणतात, "गेल्या एका आठवड्यापासून आम्ही रुग्णालयात दाखल आहोत. आमच्या विनंतीनंतर जिल्हा प्रशासनाने गावात आरोग्य शिबीर सुरू केले आहेत. आमच्या तक्रारीनंतर पंचायती राज विभागाने गावाला भेट दिली. त्यांनी परिसरात किटकनाशकांची फवारणीही केली जात आहे."

मुंग्यांचा प्रादुर्भाव होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे इकासालपेट्टा गावचं भौगोलिक स्थान.

मुंग्या

नागवली नदीच्या किनाऱ्यावर गाव वसलेलं असल्यामुळे परिसरात झाडांची प्रचंड वाढ होते. हे वातावरण मुंग्यांना पोषक आहे. यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असं जिल्हा पंचायत अधिकारी रवी कुमार यांनी म्हटलं.

चार महिन्यांपासून या मुंग्या बाजूच्या टेकडीवर दिसत होत्या. आता त्या गावात आल्या आहेत. त्यांची वाढ वेगाने होत असून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला त्या चावा घेतात. जुनाट आजारांनी ग्रासलेल्या लोकांना त्याचा त्रास होतो. पण इतरांसाठी हे फारसं गंभीर नाही, असं तोगाराम प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. श्रवंती यांनी सांगितलं.

जनावरांनाही मुंग्यांचा त्रास

स्थानिक रहिवासी या मुंग्यांना जंगली मुंग्या संबोधत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांची संख्या प्रचंड वाढत असल्याचं रहिवासी आनंद राव यांनी सांगितलं.

असंच सुरू राहिलं, तर गाव रिकामं करण्याची वेळ येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

केवळ माणसंच नव्हे तर प्राण्यांनाही मुंग्यांचा प्रचंड त्रास होत आहे. प्राण्यांच्या चाऱ्यामध्ये या मुंग्या आढळून येतात. यामुळे जनावरांनीचारा खाणंही कमी केल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रति माणसी दहा लाख मुंग्या

इसाकालपेट्टाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं आंध्र युनिव्हर्सिटीच्या प्राणीशास्त्र विषयाच्या प्रा. सी. मजनूलता यांनी सांगितलं.

ते म्हणतात, "जगभरात मुंग्यांच्या 22 हजार प्रजाती आढळून येतात. सगळ्या मुंग्यांची एकत्रित संख्या काढली तर प्रति माणसी दहा लाख मुंग्या जगात आहेत. मुंग्यांची कोणतीही प्रजात मानवी जीवास धोकादायक नाही, असं आजवरच्या संशोधनांमध्ये आढळून आलं आहे, असं प्रा. मजनूलता म्हणाल्या.

त्यांच्या मते, "मुंग्यांची इतकी वाढ होण्यामागचं कारण स्पष्ट आहे. या गावचं भौगोलिक स्थानच मुंग्यांच्या वाढीसाठी पोषक असल्याने इथे त्या वेगाने वाढत आहेत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)