You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत करंडकच दिला नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
कोरोनानंतर दोन वर्षांनी भरलेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत कोणालाच विजेतेपद न दिल्याने कलाक्षेत्रात प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक कलावंतांनी यावर भरभरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
परीक्षकांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात आलं तर काहींचा संताप झाला. त्यामुळे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. मात्र परीक्षकांनी असा निर्णय का जाहीर केला आणि या विषयावर निर्माण झालेल्या प्रतिक्रियांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
महाराष्ट्र कलोपासक ही संस्था गेल्या 58 वर्षांपासून ही एकांकिकांची स्पर्धा भरवते. या संस्थेचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र अप्पासाहेब वझे यांच्या निधनानंतर या स्पर्धेला पुरुषोत्तम करंडक असं नाव देण्यात आलं.
पुरुषोत्तम करंडक या नाट्यस्पर्धेला पुण्यात आणि एकूणच नाट्यसृष्टीत अत्यंत मानाचं स्थान आहे. या स्पर्धेतून मराठी नाट्यसृष्टीत आणि चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार जन्माला आले.
आजही ते या स्पर्धेचे आभार मानतात, त्याच्या आठवणीत रमतात. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरुषोत्तम मध्ये भाग घेणं प्रतिष्ठेचं वाटतं. पुण्यात दरवर्षी होणाऱ्या सांस्कृतिक उत्सवांमध्ये पुरुषोत्तमचं नाव अग्रभागी असतं. त्यामुळे या निर्णयाचा बभ्रा झाला.
परीक्षकांनी काय निर्णय दिला?
कोरोनाच्या साथीनंतर दोन वर्षांनी भरलेल्या या स्पर्धेचे परीक्षक म्हणून परेश मोकाशी, हिमांशू स्मार्त, आणि पौर्णिमा मनोहर यांनी काम पाहिलं.
सांघिक पारितोषिकांमध्ये पात्र एकांकिका नाही त्यामुळे करंडक दिला नाही मात्र बक्षिसाची 5001 रुपये इतकी रक्कम पुणे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्या कलिमगन या एकांकिकेस दिलं.
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका कोणतीही नाही असं जाहीर करण्यात आलं आहे. वैयक्तिक अभिनय या वर्गवारीत करंडक देण्याच्या पात्रतेचा एकही कलाकार आढळलेला नाही, असं परीक्षकांचं म्हणणं आहे.
त्यामुळे करंडक न देता फक्त रोख पारितोषिक देण्यात आलं आहे. इतर सर्व पारितोषिकं मात्र देण्यात आली आहेत. त्यामुळे करंडक देण्यास नकार दिला मात्र रोख पारितोषिकं दिली. परीक्षकांच्या या अजबगजब निर्णयावर प्रतिक्रिया आल्या.
प्रतिक्रियांचा पूर
नाट्य आणि सिने दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतो, "पुरुषोत्तम करंडकामुळे मला नाटकाची आवड निर्माण झाली. या स्पर्धेने जे प्रोत्साहन दिलं ते आजही पुरून उरतं. त्याचा यावर्षी असा निकाल लागला याने फार वाईट वाटलं. हे चूक-बरोबर हा वाद घालून आता काही साध्य होणार नाही, पण नुसतं गप्प राहून पण चालणार नाही.
पुरुषोत्तम 2022 मध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी मी एक नाट्य कार्यशाळा घ्यायचं ठरवलं आहे. ऑक्टोबरमध्ये असेल. याचे तपशील देईनच, पण ही कार्यशाळा मोफत असेल," असं तो म्हणतो.
बीबीसी मराठीशी बोलताना तो म्हणाला, "मी गेल्या तीन चार वर्षांपासून या स्पर्धेशी फारसा जोडला गेलेलो नाही. यावर्षीच्याही पाहिलेल्या नाहीत. जेव्हा नाटकांचा विषय येतो तेव्हा एक तक्रारीचा सूर असा असतो की लोकांना नाटक म्हणून नाटक करायचं नाही तर सीरियलमध्ये काम करण्याआधीचा टप्पा म्हणून पाहिलं जातं.
"जेणेकरून दिग्दर्शकांना आपलं काम दिसावं. वीस वर्षांपूर्वी मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा नाटकांच्या आवडीपायी आम्ही नाटक करायचो. तेव्हा कार्यशाळा व्हायच्या. आमचे सीनिअर मंडळी त्या घेत असत. त्यामुळे नाटकाची गोडी निर्माण झाली," निपुण सांगतो.
ही कार्यशाळा घेण्याबद्दलच्या भूमिकेबद्दल बोलताना तो म्हणाला, "माझी कार्यशाळा घेण्याचा इतकाच उद्देश आहे की या निमित्ताने नाटकाची पुन्हा ओळख करून देता येईल का? नेमकी आताची पिढी काय विचार करते? त्यांच्यासमोर काय आव्हानं आहेत? मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. त्यातून काही सकारात्मक झालं तर ठीक नाहीतर हा काळच असा आहे असं म्हणून सोडून द्यायचं."
निपुणच्या या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्याचं अभिनेता सुव्रत जोशीने घोषित केलं. फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, "पुरुषोत्तममध्ये यावर्षी परीक्षकांनी दिलेल्या निर्णयाने मोठा उहापोह चालू आहे. एकेकाळी मीदेखील जीव ओतून या स्पर्धेत सहभागी झालो आहे. त्यात कधी मोठं यश तर कधी सपशेल अपयश घेऊन बाहेर पडलो आहे. त्या नात्याने आणि त्यानंतर असलेल्या माझ्या मोजक्या अनुभवाच्या जोरावर मला जे वाटले ते इथे व्यक्त करत आहे.
स्वानुभवावरून सांगायचे तर पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत जेव्हा काही एक यश प्राप्त झाले तेव्हा जग जिंकले असा भाव त्यावेळी तयार झाला आणि नाटक सपशेल फसले तेव्हा सगळे काही संपले असेही काही काळापुरते वाटून गेले. आता जाऊन वाटते हे दोन्हीही अगदी तात्कालिक आणि प्रासंगिक होते.
आज त्या दोन्हीकडे बघून काहीसे छान वाटते आणि काहीसे हसू येते. त्याहूनही महत्त्वाचे जी दोन नाटके "स्पर्धेच्या दृष्टीने टाकाऊ" होती त्याच नाटकांनी जास्त शिकवले असे आज लक्षात येते. त्यातील पहिले नाटक अंतिम फेरीत जाऊनही काहीही बक्षीस जिंकू शकले नाही तेव्हा परीक्षकांना दोष न देता आम्ही तेव्हाचे परीक्षक अतुल पेठेंनी यांची भेट घेण्याचे ठरवले. त्यांनी देखील आम्हाला लगेच वेळ दिली आणि अत्यंत चांगल्या पध्दतीने आमच्या नाटकाचे विवेचन केले. तो अनुभव डोळे उघडणारा होता."
सध्याच्या वादावर तो बोलताना म्हणाला, "माझा मित्र निपुण धर्माधिकारी याने विनाशुल्क कार्यशाळा घेण्याचे योजिले आहे. त्यात मी आनंदाने सहभागी होईन. मी राष्ट्रीय नाट्य विद्यालय आणि नंतर आदील हुसेन यांच्याबरोबर केलेल्या कामात जे वेचले आहे ते आनंदाने वाटून देईन. या. मजा करू. नवीन काहीतरी शोधू."
दिग्दर्शक विजू माने यांनी परीक्षकांच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणतात, "मी ही स्पर्धा पाहिलेली नाही त्यामुळे एकांकिकांच्या दर्जाबद्दल मी बोलू शकत नाही, परंतु या वृत्तीचा मला कायम राग येतो. एखाद्या धावण्याच्या स्पर्धेत धावणारे पाच जण असतील तर त्यात सगळ्यात पुढे असेल तो पहिला येणं हे सामान्य स्पर्धेतले लॉजिक इथे का लावलं जात नाही?
"मुळात अमुक एक दर्जा असलेल्या एकांकिका हव्या आहेत असं जर परीक्षकांना वाटत असेल, तर त्यांनी प्राथमिक फेरीतच दर्जेदार एकांकिका नाहीत म्हणून स्पर्धा होणार नाही, असं जाहीर करून टाकावं. म्हणजे दिवस-रात्र प्रयत्न करणाऱ्यांचा विनाकारण हिरमोड होणार नाही."
"एकांकिका करणाऱ्या मुलांना उगाच 'नाडण्याची करणी' करणारे असे परीक्षक मी एकांकिका करत असतानाही होते. तेव्हा सुद्धा माझं हेच मत होतं. ज्या लोकांमध्ये स्पर्धा आहे त्या लोकांमधला जो उत्तम आहे त्याला पहिला क्रमांक द्या. तुम्ही तरी तुमच्या शाळेत 100 पैकी 100 मार्क कधी मिळवले होते का? पण म्हणून एखाद्या वर्गात 65 मार्क मिळवणारा मुलगा सर्वोच्च मार्क मिळवणारा असेल तर त्याला पहिला क्रमांक द्यायचा नाही ह्याला काय अर्थ आहे. मला तेव्हाही असं वाटायचं की आधी परीक्षकांची नावं जाहीर करा. मग आम्ही तशी एकांकिका सादर करू. दिवस काही फार बदललेले नाहीत," ते म्हणाले.
मात्र परीक्षकांच्या या निर्णयामागे आयोजक आणि स्पर्धक यांचं काहीतरी साटंलोटं असल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार आणि माध्यकर्मी डॉ. समीरण वाळवेकर करतात.
महाराष्ट्र टाइम्स मध्ये लिहिलेल्या लेखात ते म्हणतात, "कलोपासकचे सर्वेसर्वा स्वर्गीय राजाभाऊ नातू यांच्याकडूनच अनेक वर्षांपूर्वी ऐकायला मिळालेला किस्सा. एका वर्षी या स्पर्धेच्या परीक्षण समितीला पुरुषोत्तम करंडक देण्यासाठी कोणतीच एकांकिका योग्य वाटली नाही.
"राजांभाऊंनी परीक्षण समितीचे हे मत कलोपासकातील आपल्या जवळच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना सांगितल्यावर रंगकर्मी मधू जोशी यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला, आणि परीक्षण समितीच्या कार्यक्षेत्रातील चौकट स्पष्ट केली. उपलब्ध संघांपैकी सर्वोत्तम संघाला करंडक देण्याचा बहुतांश कलोपासकांचा आग्रह होता. तो राजाभाऊंनी मोठ्या मनाने मान्य केला, आणि परीक्षण समितीच्या गळी उतरवला, आणि त्या मतभेदांनंतरही पुरुषोत्तम करंडक आहेत त्या संघांपैकी सर्वोत्तम असलेल्या संघाला दिला गेला."
"कोणतेही नियम बदलण्याचे अधिकार संयोजक संस्थेकडे राखीव जरूर असतात व स्पर्धक संघावर बंधनकारक असतातच. पण प्रथम पारितोषिक आणि पुरुषोत्तम करंडक हे एकमेकांशी निगडितच असतात, असायला हवेत. सर्वोत्तम ठरलेल्या संघाला तो करंडक देण्याचा संकेत मोडून कसा चालेल? त्याचे निकष वेगळे आहेतच कोठे?
तसे ते लावायचे असतील तर ठरवून आधी जाहीर करावे लागतील. पहिले पारितोषिक द्यायचे, पण दर्जा करंडकाचा नव्हता असे जाहीर करायचे, आणि तो द्यायचाच नाही हे कोणत्या तर्कात बसते? करंडकाच्या दर्जाचे असे वेगळे कोणतेही निकष नाहीत व नसावेत.
करंडक नसेल तर पहिले पारितोषिकहि नसावे. जे आहेत त्या सर्व संघांमधील गुणात्मक सर्वोत्तम संघाला पुरुषोत्तम,आणि सर्वोत्तम अभिनेत्याला, दिग्दर्शकाला ते ते करंडकच दिले नाहीत, तर तरुणाईच्या ऐनवेळी होणाऱ्या स्वप्नभंगांचे काय? त्यांची सारी धडपड, अट्टाहास कशासाठी करंडकांसाठीच तर असतो! रोख रकमेच्या पारितोषिकाचा त्यांच्या लेखी काय महत्त्व? पुरुषोत्तम करंडक ही त्यांच्यासाठी आयुष्यभर मिरवण्याची गोष्ट असते, ठेवा असतो. या पेक्षा अधिक जास्त रोख पारितोषिके असलेल्या इतर अनेक स्पर्धा आहेतच की!" असे ते म्हणतात.
या प्रश्नावर आम्ही आयोजकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
तज्ज्ञांचं मत
ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते मिलिंद शिंत्रे मात्र परीक्षक आणि आयोजक यांचं कोणतंही साटंलोटं नसल्याचं सांगितलं. त्यांच्या मते गेल्या 58 वर्षांपासून ही स्पर्धा सुरू आहे. त्यात आयोजक परीक्षकांच्या निर्णयात अगदी स्वल्पविरामाचाही बदल करत नाही.
गेल्या काही वर्षांपासून स्पर्धेतील एकांकिकांचा दर्जा प्रचंड घसरला आहे. तिथल्या स्पर्धकांवर टेलिव्हिजनचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांना योग्य मार्गदर्शक नाही. आयोजक जी कार्यशाळा घेतात त्यात स्पर्धक जात नाहीत. मुळात या स्पर्धेलाच मुलं हौसेखातर येतात. त्यामुळे त्यांना नाटकाचं गांभीर्य नसतं.
अशा परिस्थितीत एखाद्या कलाकाराला किंवा संघाला पारितोषिक मिळालं तर तेच सर्वोत्तम आहे असा संदेश जाण्याचा धोका असल्याचं शिंत्रे सांगतात. मग हीच मुलं पुढे अभिनेते- अभिनेत्री चित्रपटात येतात आणि मग मराठी चित्रपटांचा दर्जा घसरला याची चर्चा आपण करतो असं त्यांचं मत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला चाप लावण्यासाठी परीक्षकांनी असा निर्णय दिल्याचं ते सांगतात.
याच विषयावर सुव्रत जोशीने फेसबुक पोस्टमध्ये मत व्यक्त केलं आहे. "मी माझ्यापेक्षा नंतरच्या पिढीतील लोकांसोबत सतत काम करत असतो. माझा व्यासंग आणि अभ्यास म्हणून मी कार्यशाळा घेतदेखील असतो. त्यातून एक निरीक्षण मात्र इथे नोंदवावे वाटते. नव्या पिढीचे मातृभाषेशी असलेले नाते मात्र अतिशय कच्चे झाले आहे. त्याचबरोबर ते अनेक उत्तम सिनेमे आणि वेब शो पाहतात.
पण दुर्दैवाने तेच ते नाटकात करू पाहतात. या दोन्ही गोष्टींमुळे त्यांना नाटक या माध्यमाचे नीट आकलन झालेले नाही असे मात्र प्रकर्षाने जाणवते. एकाच वेळी अतुल पेठे सर ते प्रशांत दामले सर, प्राजक्त देशमुख ते आलोक राजवाडे असा प्रचंड वैविध्यपूर्ण नाट्य व्यवहार चालू असताना एकही मराठी नाटक न पाहिलेला प्रचंड मोठा तरुण वर्ग आज नाटकापासून अलिप्त आहे. पोटात मालिकेत जाण्याची स्वप्न ठेवून तो पायरी म्हणून नाटकाकडे बघतो.
हे चित्र समूळ बदल्याशिवाय ही घसरण थांबू शकेल असे वाटत नाही. तुम्ही नाटकं पाहून ती जरूर नाकारा. आणि कशी नाकारा तर नवे नाटक करून नाकारा. पण काय नाकारायचे आहे हे कळण्यासाठी किमान काय घडले होते आणि काय चालले आहे याची किमान जाण तर नको?"
या संपूर्ण प्रकणावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रीय कलोपासक संघाने एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. त्यात परीक्षक सर्व स्पर्धकांसमोर त्यांची भूमिका मांडणार आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतल्या या निर्णयामुळे एकूणच नाटक, त्याचा दर्जा, अभिनय या विषयावर चर्चेची नवी कवाडं खुली झाली आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)