You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युद्धात एकही सैनिक न गमावता शेरशाह सुरी मुघलांना हरवून बनला बादशाह
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
भारतात असेही काही सम्राट होऊन गेलेत ज्यांची इतिहासाने म्हणावी तशी दखल घेतलेली नाही. आता शेरशाह सुरीचंच उदाहरण घ्या ना. मुघल बादशाह हुमायूनला युद्धात पराभूत करून सुरी साम्राज्य स्थापन करणारा हा शेरशाह लोकप्रिय शासकांपैकी एक होता.
पण त्याचं राज्य अवघे पाच वर्षे टिकलं, आणि पुढच्या दहा वर्षात तर त्याचा वंशही संपला. शेरशाह विस्मरणात जाण्याचं हे एक कारण असावं.
शेरशाहचं चरित्र लिहिणारे कालिकरंजन कानुंगो लिहितात, "शेरशाहाचा राज्यकाळ भलेही पाच वर्षांचा असेल पण तो चतुर, क्षमतापूर्ण, कठोर परिश्रम करणारा, न्यायी, प्रामाणिक, हिंदू-मुस्लीम सौहार्द जपणारा, शिस्तप्रिय, कठोर असा बादशाह होता. म्हणजे शिस्त आणि रणनीती आखण्यात तो अकबरापेक्षा सरस होता."
शेरशाह सुरीचं मूळ नाव फरीद होतं. त्याने मुघल सैन्यातही सेवा बजावली होती. 1528 मध्ये चंदेरीच्या मोहिमेत तो बाबरसोबत लढला होता. बाबरच्या सैन्यात असतानाच त्याला भारताच्या सिंहासनाची स्वप्नं पडू लागली होती.
यासंबंधीचा एक किस्सा अब्बास सरवानी लिखित 'तारीख-ए-शेरशाही' पुस्तकात सापडतो. "एकदा शेरशाह बाबरसोबत जेवत होता. त्याच्या खाण्याची पद्धत पाहून बाबर आपल्या खास खलिफाकडे वळला आणि म्हणाला, याची मिजास तर बघ. याच्या नशिबात सुलतानपदी बसणं लिहिलंय असं मला वाटतंय. याच्यापासून सावध रहा, आणि शक्य असेल तर याला ताब्यात घ्या."
यावर खलिफा बादशाहाला म्हणतो की, "तुम्ही जो विचार करताय ते करण्याची क्षमता शेरशाह मध्ये नाहीये."
यानंतर शेरशाह बिहारचा सरदार जलाल खान याच्या दरबारात उपनेता म्हणून काम करू लागला.
मुघल सम्राट हुमायूनशी युद्ध..
बाबरच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाचा हुमायूनचा बंगाल प्रांतावर डोळा होता, पण शेरशाह सुरी आडवा आला कारण तो भाग शेरशाहच्या ताब्यात होता. हुमायूनने त्याच्याशी लढायचं ठरवलं.
सुप्रसिद्ध इतिहासकार फरहत नसरीन त्यांच्या 'इफ हिस्ट्री हॅज टॉट अस एनीथिंग' या पुस्तकात लिहितात, "शेरशाहच्या ताब्यात संपूर्ण बंगाल आणि बिहार प्रांत होता. साहजिकच त्याची महत्त्वकांक्षा वाढली. त्यामुळे तो मुघल सम्राट हुमायूनसाठी मोठा धोका बनला होता. युद्ध कौशल्याचा विचार करायला गेलं तर शेरशाह हुमायूनपेक्षा कैक पटीने सरस होता."
1537 मध्ये युद्ध सुरू झालं. या दोघांच्या फौजा चौसा इथं आमनेसामने आल्या. पण युद्ध सुरू व्हायच्या आधी हुमायूने शेरशाहकडे आपला दूत पाठवला. अब्दुल कादिर बदायुनी आपल्या 'तखब-उत- त्वारीख़' लिहितात, "हुमायूनचा दूत मोहम्मद अझीझ अफगाण छावणीत पोहोचला तेव्हा शेरशाह भर उन्हात झाडावर कुऱ्हाडीने घाव घालत असल्याचं त्याने पाहिलं. जमिनीवर बसूनच त्याने हुमायूनचा संदेश ऐकला."
अझीझने दोघांमध्ये सुला करण्याचा प्रयत्न केला. यात असं ठरलं की, बंगाल आणि बिहार हे प्रांत शेरशाहकडेच राहतील मात्र त्यावर अधिपत्य मुघलांच असेल. पण 17 मे 1540 मध्ये कन्नौजजवळ हुमायून आणि शेरशाह सूरी यांच्या फौजा पुन्हा आमनेसामने आल्या.
हुमायूनची भली मोठी फौज बघता शेरशाहचं सैन्य तुलनेने लहान होतं. हुमायूनकडे 40000 हून जास्तीचं सैन्य होतं. तेच शेरशाहच्या सैन्यात एकूण 15,000 सैनिक होते. पण युद्ध सुरू होण्यापूर्वीच हुमायूनच्या सैन्याने त्याची साथ सोडली आणि युद्धात एकही सैनिक न गमावता शेरशाहने युद्ध जिंकलं.
हुमायूनला भारताबाहेर हाकलून लावलं..
हुमायून राहिलेल्या सैन्यासह आपला जीव मुठीत घेऊन पळू लागला. तेव्हा शेरशाहने राजपूत सरदार ब्रह्मादित्य गौड यास सैन्याची मोठी तुकडी घेऊन हुमायूनच्या मागावर पाठवलं.
अब्बास सरवानी पुढे लिहितात, "गौड हुमायूनशी लढायला गेला नव्हता. तर त्याचा फक्त पाठलाग करा असा आदेश शेरशाहने दिला होता. हुमायून उरलेल्या सैन्यासह कसाबसा आग्र्याला येऊन पोहोचला. आग्र्याला पोहोचल्यावर त्याने आपल्या खजिन्यातून काही रक्कम घेतली आणि त्याची बेगम दिलदार सोबत मेवातमार्गे लाहोरला रवाना झाला."
"पुढं काही काही दिवस गेल्यावर शेरशाह आग्र्यात येऊन धडकला. शेरशाहच्या आधी त्याचा सरदार ब्रह्मादित्य गौड आग्र्यात आला होता. त्यानं तिथल्या प्रजेवर अत्याचार केले होते. ते पाहून शेरशाहने त्याला चांगलंच सुनावलं होतं. त्यानंतर ब्रह्मादित्य आणि ख्वास खान या दोघांनाही हुमायूनच्या मागे पाठवलं."
हुमायूनचा पाठलाग करण्यामागे त्याला पकडणं हा उद्देश मुळीच नव्हता. तर त्याच्या पाठीमागे लागून त्याला भारताबाहेर हाकलण्याची शेरशाहची योजना होती. हुमायून कसा तरी लाहोर गाठण्यात यशस्वी झाला. तिथं त्यानं तीन महिने मुक्काम ठोकला कारण शेरशाहचे सैनिक पावसामुळे पुढे येऊ शकले नव्हते.
हुमायूनचा ताफा दोन गटात विभागला..
ऑक्टोबर 1540 मध्ये तिसऱ्या आठवड्यात शेरशाहच्या सैन्याने सुलतानपूर नदी ओलांडली. मिर्झा मोहम्मद हैदर दुघलत त्यांच्या 'तारीख-ए-रशिदी' पुस्तकात लिहितात की, "शेरशाह लाहोरच्या दिशेने येतोय अशी बातमी समजताच हुमायून तिथून पण पळून गेला. त्याच्या सोबत जो लवाजमा होता त्यांनी आपली घरदार सोडून आहे त्या अवस्थेत पळ काढला."
हुमायूनने आपलं सामान तिथंच सोडलं आणि जेवढा पैसा अडका नेता येईल तेवढा सोबत नेला. तो आधी काश्मीरला जाणार होता पण त्याच्यासोबतचा कोणताच साथीदार तिकडे जायला तयार होईना.
हुमायून आणि त्याचा भाऊ कामरान यांच्यात वाद वाढला आणि खुशबजवळ ते एकमेकांना भिडले. इथूनच हुमायूनचा ताफा दोन गटात विभागला. हुमायून सोबत काही सैनिक आणि त्यांच्या बायका होत्या. त्यांनी भारताची सीमा ओलांडताच ख़्वास खाननेही झेलम नदीच्या पश्चिमेकडून त्याचा पाठलाग करणं सोडून दिलं.
शेरशाहने रस्ते बनवले, विश्रामगृह उभारली..
संपूर्ण भारतात शेरशाहची ओळख प्रजाहितदक्ष बादशाह अशी होती. त्याने रस्ते बांधले, रस्त्या रस्त्यावर विश्रामगृहं उभारली. रस्त्याने चालताना लोकांचा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावली. त्याने चार प्रमुख मार्गांची निर्मिती केली.
त्यात सर्वांत मोठा 1500 किलोमीटरचा मार्ग ढाक्याजवळील सोनारगाव पासून सुरू होऊन सिंधू नदीपर्यंत संपतो. आज हा रस्ता जीटी रोड नावाने ओळखला जातो.
याशिवाय त्याने आग्रा ते आग्रा ते जोधपूर आणि लाहोर ते मुलतान असे रस्तेही बांधले. रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूसाठी त्याने प्रत्येक दोन कोसांवर विश्रामगृह उभारली. संदेशाची ने आण करण्यासाठी त्या ठिकाणी दोन घोडे सुद्धा ठेवले होते. शेरशाहच्या प्रशासनाचं यश त्याने बांधलेल्या रस्त्यांवरून आणि विश्रामगृहांवरून दिसतं.
त्याच्या कार्यकाळात अनेक प्रशासकीय बदल झाले. जसं की, अनेकदा अधिकार्यांच्या बदल्या केल्या जात, जेणेकरून सैनिक गतिशील राहतील. शेरशाहने निर्माण केलेली विश्रामगृह कधी त्याच्या अधिकाऱ्यांसाठी तर कधी त्याच्या स्वतःसाठी उपयोगी पडत. प्रत्येक विश्रामगृहात बादशाहासाठी खास खोली राखीव ठेवली जायची.
शेरशाहच्या छोट्या कारकिर्दीतही त्याने स्थापत्यशास्त्राला प्रोत्साहन दिलं. त्याने दिल्लीत पुराना किल्ला बांधला. दिल्ली हे सहावं शहर म्हणून वसवण्याची त्याची इच्छा होती. 1542 मध्ये पुराना किल्ल्याच्या आत किला-ए-कुहना मशिदीची निर्मिती केली. पण शेरशाहची समाधीच वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानली जाते.
प्रजेची काळजी घेणारा बादशाहा..
शेख रिजोउल्लाह मुश्ताकी त्यांच्या 'वकियत-ए-मुश्ताकी' या पुस्तकात लिहितात, "शेरशाह जनतेसाठी पित्यासमान होता. असामाजिक घटकांप्रती तो अत्यंत कठोर व्हायचा. पण दीनदुबळे, शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांविषयी तो अतिशय कनवाळू होता. 500 तोळे सोनं विकून जी रक्कम येते तेवढी रक्कम रोजच्या रोज भुकेलेल्या लोकांना अन्न देण्यासाठी खर्च केली जायची."
"शेरशाहने एक नियम बनवला होता त्यानुसार बादशाहा ज्या ठिकाणी थांबायचा तिथल्या प्रत्येक एका व्यक्तीला जेवण मिळायचं. त्याचप्रमाणे शाही मुदपाकखान्यात जो कोणी येईल तो उपाशी जाता कामा नये असे आदेश देण्यात आले होते. शाही मुदपाकखान्यातून रोज हजारो लोक जेवून जायचे."
रिझो उल्लाह मुश्ताकी पुढे लिहितात की, "शेरशाहने कधीही जुलूम केले नाहीत की कधी त्याचं समर्थन केलं नाही. अर्धी रात्र उलटली की त्याचे सैनिक त्याला झोपेतून उठवायचे. त्यानंतरचे चार तास म्हणजेच पहाटेची नमाज अदा करण्याच्या वेळेपर्यंत तो आपल्या देशाची हालहवा अधिकाऱ्यांकडून ऐकायचा. कोणत्याही कारणाव्यतिरिक्त रक्त सांडण त्याला मान्य नव्हतं."
शेरशाहच्या प्रशासनाचा कारभार अत्यंत चोख होता. जिथं कुठं गुन्हे घडतील तिथल्या लोकांना नुकसानग्रस्त लोकांना अधिकाऱ्यांकडून नुकसान भरपाई मिळायची. अब्बास खान सरवानी लिहितात, "गावप्रमुख असलेल्या मुकादमाकडे आर्थिक बाबींपेक्षाही जास्त जबाबदाऱ्या होत्या. जसं की गावात एखादा गुन्हा घडला तर त्याला जबाबदार धरलं जायचं. लूटमार किंवा प्रवाशांच्या हत्या झाल्यास दोषींना पकडण्याची जबाबदारी मुकादमांवर होती."
शेतकऱ्यांची विशेष काळजी
शेरशाहच्या दयाळूपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. अब्बास सरवानी लिहितात, "शेरशाहची गणना सर्वांत दयाळू बादशाहांमध्ये केली जाईल. असं सांगितलं जातं की, हुमायूनच्या पराभवानंतर शेरशाह आग्र्याला पोहोचला तेव्हा अनेक मुघल राण्या आणि स्त्रिया बाहेर आल्या आणि त्यांनी त्यांच्यासमोर माना झुकवल्या त्यावेळेस शेरशाहच्या डोळ्यात अश्रू आले होते."
"मोहिमांवर जाताना बऱ्याचदा सैन्य शेतात घुसल्यामुळे पीकांचं नुकसान व्हायचं. असं घडू नये यासाठी तो प्रयत्नशील असायचा. पण काही कारणाने असं घडलंच तर त्यासाठी त्याचे अमीर पाठवून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यायचा."
धार्मिक सौहार्दावर भर..
त्याची सैनिकांशी सुद्धा वागण्याची पद्धत चांगली होती. त्यामुळेचं त्याचे सैनिक त्याच्यासाठी काहीही करायला तयार असायचे. सुप्रसिद्ध इतिहासकार एचजी कीन त्यांच्या 'मेमॉएर्स ऑफ द रेसेस ऑफ द नॉर्थ वेस्ट फ्रंटियर' या पुस्तकात लिहितात, "तो असा पहिला मुस्लिम बादशाहा होता ज्याने आपल्या प्रजेच्या भल्यासाठी प्रार्थना केली."
"आपल्या छोट्याशा कारकिर्दीत त्याने लोकांमध्ये धार्मिक सलोखा टिकून राहावा यासाठी प्रयत्न केले. शेरशाहच्या राजवटीत हिंदूंना महत्त्वाची पदं देण्यात आली. ब्रह्मजीत गौड हा त्याचा आवडता सेनापती होता. याच ब्रह्मजीत गौडने चौसा आणि बिलग्रामच्या युद्धानंतर हुमायूनचा पाठलाग केला होता. आपलं सरकार प्रजेमध्ये लोकप्रिय असलं पाहिजे असा विचार करणारा शेरशाह एकमेव बादशाहा होता. त्यानंतर आलेल्या कोणत्याही सरकारने किंबहुना इंग्रजांनीही हे शहाणपण काही दाखवलं नाही."
शेरशाहचं सरकार त्याच्याभोवती केंद्रित होतं..
शेरशाहचं सरकार मुळात व्यक्तिकेंद्रित सरकार होतं. अब्बास सरवानी लिहितात, "राज्याच्या आर्थिक बाबी असो वा राजकीय शेरशाह यात जातीने लक्ष घालायचा. रोज काय करणार आहे आणि काय केलंय याविषयीचा तपशील प्रत्येक मंत्र्याला द्यावा लागायचा. शेरशाहचे मंत्री त्याचे सचिव म्हणून काम करायचे पण राज्याची सर्व सूत्र मात्र शेरशाहच्या हातातचं होती."
"शेरशाहचं लष्करावरही संपूर्ण नियंत्रण होतं. त्याचे सैनिक त्यांच्या कमांडिंग ऑफिसर ऐवजी त्यांच्या बादशाहाच्या आदेशांच पालन करायचे. कोणत्या सैनिकाला किती पगार द्यायचा हे सुद्धा बादशाहाचं ठरवायचा. शक्यतो सर्व सैनिकांना त्यांच्या योग्यतेच्या आधारावर आणि क्षमतेनुसार पगार दिला जायचा."
कलिंजर किल्ल्याच्या वेढ्यात शेरशाह अर्ध्याहून अधिक भाजला
शेरशाहने 1544 मध्ये कलिंजर किल्ल्याला वेढा घातला. बऱ्याच इतिहासकारांच्या मते, शेरशाह आग्र्याला न जाता कछवाड्यातून थेट कालिंजरला गेला.
'सलातीन-ए-अफगाण'चे लेखक अहमद यादगर लिहितात, "शेरशहाने कलिंजरला भेट देण्यामागचं कारण होतं बीर सिंग बुंदेला. त्याला दरबारात हजर राहण्याचे आदेश शेरशाहने दिले होते. मात्र तो पळून गेला आणि त्याने कलिंजरच्या राजाकडे शरण मागितली. शेरशाह कलिंजरला गेला असता तिथल्या राजाने बीर सिंगला सोपवण्यास नकार दिला."
कलिंजरचा किल्ला समुद्रसपाटीपासून 1230 फूट उंचीवर बांधलाय. शेरशाहने किल्ल्याला वेढा घालून सुरुंग आणि उंच मिनार बांधायला सुरुवात केली. सर्व तयारीनिशी त्याने 22 मे 1545 रोजी किल्ल्यावर हल्ला करायचं ठरवलं. हा हल्ला करण्यात शेरशाह सर्वांत पुढे होता.
अब्दुल कादिर बदायुनी लिहितात, "जेव्हा दरिया खानने बॉम्ब आणला तेव्हा शेरशाह उंच मचाणावरून खाली आला आणि जिथं बॉम्ब ठेवला होता तिथं उभा राहिला. बॉम्ब किल्ल्याच्या आत फेकण्याचे आदेश देण्यात आले. यातला एक बॉम्ब किल्ल्याच्या भिंतीला थडकून मागे आला आणि इतर बॉम्ब ठेवले होते त्याठिकाणीचं पडून फुटला. मोठा स्फोट झाला आणि सर्वत्र आग लागली. तिथं उभे असणारे शेख खलील, शेख निजाम यांच्यासह इतर अनेक सैनिक जखमी झाले. पण या आगीत शेरशाह अर्ध्याहून अधिक भाजला होता."
मरण्यापूर्वी किल्ला जिंकला..
त्याला त्या अवस्थेत छावणीच्या मध्यभागी नेण्यात आलं. तिथं राज दरबारातले सर्व प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. बादशाह जखमी होता तरी त्याच अवस्थेत त्याने आपल्या सेनापतीला जवळ बोलावून घेतलं आणि आदेश दिला की, किल्ल्यातले लोक जिवंत आहेत तोपर्यंत किल्ला ताब्यात घ्या. सेनापती इसा खान कामाला लागला. त्याने किल्ल्यावर चारी बाजूंनी हल्ला चढवला.
अब्बास सरवानी लिहितात, "शेरशाहचे सैनिक एखाद्या टोळधाडीप्रमाणे किल्ल्यात शिरले. जेव्हा जेव्हा शेरशाह शुद्धीवर यायचा तेव्हा तेव्हा घोषणा देऊन आपल्या सैनिकांना किल्ला काबीज करण्यासाठी प्रोत्साहित करायचा. जेव्हा कोणी त्याची विचारपूस करायला यायचं तेव्हा तो म्हणायचा, इथं वेळ घालवण्यापेक्षा लढाई करायला जा. तो मे महिना होता, वातावरणात गर्मी वाढत चालली होती."
शेरशाहच्या सैनिकांनी त्याच्या अंगाला चंदनाचा लेप लावला, गुलाब पाण्याचे फवारे मारले. पण उष्णता वाढतच होती, त्यामुळे शेरशाहच्या तब्येतीला आराम पडत नव्हता.
"दुपारच्या नमाजेवेळी शेरशाहच्या सैन्याने किल्ला ताब्यात घेतला. राजा किरत सिंगने त्याच्या काही समर्थकांसह स्वतःला एका घरात कोंडून घेतलं. मात्र शेरशाहच्या सैनिकांनी त्या घराला चारही बाजूंनी वेढलं"
अब्बास पुढे लिहितात, "किल्ला सर झाल्याची बातमी ऐकताच त्या त्रासातही शेरशाहच्या चेहऱ्यावर आनंद तरळला. पण थोड्याच वेळात शेरशाहच्या तोंडून शब्द फुटले, 'या ख़ुदा, मैं तेरा शुक्रगुज़ार हूँ कि तुमने मेरी इस ख्वाईश को पूरा किया.' आणि त्याने जीव सोडला.
शेरशाहच्या मृत्यूनंतर पाच दिवसांतच त्याचा दोन नंबरचा मुलगा जलाल खान कलिंजरला रवाना झाला. तिथंच त्याला बादशाहा म्हणून घोषित करण्यात आलं. शेरशाहच्या मृत्यूनंतर कलिंजरजवळील लालगढ इथं त्याचा दफनविधी झाला. नंतर सासाराम इथली कबर बांधून पूर्ण झाल्यानंतर त्याचं शव त्या कबरीत दफन करण्यात आलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)