You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदी SCO बैठकीसाठी ज्या शहरात गेले, तिथं तैमूरला दफन करण्यात आलं आहे
शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) मध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानमधील समरकंद शहरात पोहचले आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफही तिथं उपस्थित आहेत. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात स्वतंत्र बैठक होणार की नाही, याबाबत अद्याप निश्चित अशी माहिती नाहीये.
एप्रिल 2020 मध्ये LAC वर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी आणि जिनपिंग एका परिषदेत आमनेसामने असतील.
पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शवकत मिर्झियोयेव यांच्यात स्वतंत्र बैठक होणार आहे. याविषयी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दुजोरा दिलाय. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणाऱ्या स्वतंत्र भेटीबाबत अद्याप काही निश्चित झालेलं नाहीये.
शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन किंवा SCO ची स्थापना 2001 मध्ये 6 देशांनी मिळून केली होती. त्यानंतर चीन आणि रशियाशिवाय मध्य आशियातील कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान हे 4 देश या ऑर्गनायझेशनचे सदस्य होते.
या संघटनेचा 2017 मध्ये पहिल्यांदा विस्तार करण्यात आला आणि त्यात भारत आणि पाकिस्तानचा समावेश करण्यात आला. आता इराणही SCO चा सदस्य होणार आहे.
शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनची शिखर परिषद यापूर्वी तीन वेळा उझबेकिस्तानमध्ये झाली आहे. पण या तिन्ही परिषदा राजधानीचं शहर ताश्कंदमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. यावर्षी मात्र पहिल्यांदाच उझबेकिस्तानमध्ये मधील समरकंद येथे SCOची शिखर परिषद पार पडत आहे.
समरकंद हे ऐतिहासिक शहर आहे. SCO शिखर परिषदेच्या निमित्तानं समरकंदबद्दलचा बीबीसीचा हा विशेष लेख.
समरकंद खास का आहे?
समरकंद हा इतिहासाच्या पानांचा एक महत्त्वाचा भाग आहे. रक्तरंजित योद्धा म्हणून प्रसिद्ध झालेला तैमूर किंवा तैमूरलंग याचा जन्म समरकंदमध्येच झाला होता.
इतिहासातील महान योद्ध्यांचा विचार केला तर चंगेझ खान आणि अलेक्झांडर द ग्रेट यांची नावं आठवतात. पण तुम्हाला मध्य आशियाई आणि मुस्लिम देशांबद्दल थोडीफार माहिती असेल तर ही यादी तैमूरलंगशिवाय पूर्ण होणार नाही.
तैमूरलंगचा जन्म 1336 मध्ये समरकंद येथे झाला. हा भाग आता उझबेकिस्तान म्हणून प्रसिद्ध आहे.
तैमूरलंग हा रक्तरंजित योद्धा म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. 14व्या शतकात त्यानं अनेक युद्ध जिंकले, अनेक देश काबीज केले. तैमूरलंगला आपल्या शत्रूंची मुंडके कापून ती गोळा करण्याचा शौक होता, असं म्हटलं जातं.
'तैमूरलंग: द स्वॉर्ड ऑफ इस्लाम, कॉन्करर ऑफ द वर्ल्ड'चे लेखक जस्टिन मारोज्जी यांच्या मते, तो काळ असा होता की युद्ध फक्त ताकदीवर लढलं जायचं. बंदुका आणि बॉम्ब घेऊन नाही. अशात तैमुरलंगचं असणं अनेकांसाठी आश्चर्यकारक होऊ शकतं.
तैमूरलंग हा तर मामुली चोर?
अलेक्झांडरप्रमाणे तैमूरलंगचा जन्म राजघराण्यात झाला नव्हता, तर तो एका सामान्य कुटुंबात झाला होता. मध्य आशियातील मैदानं आणि पर्वतांमधून मेंढ्या चोरणारा क्षुद्र चोर असं त्याच्याबद्दल सांगितलं जातं.
चंगेझखानाप्रमाणे तैमूरलंगकडेही सैन्य नव्हतं. पण त्याने सामान्य लोकांच्या मदतीनं एक मोठी फौज तयार केली.
1402 मध्ये जेव्हा तैमूरलंगनं सुलतान बायाझिद प्रथम याच्याविरुद्ध युद्धभूमीवर पाऊल ठेवलं तेव्हा त्याच्याकडे प्रचंड सैन्य होतं. ज्यात आर्मेनियापासून अफगाणिस्तानपर्यंत आणि समरकंदपासून सर्बियापर्यंतचे सैनिक होते.
तैमूरलंगने आपल्या आयुष्यातील बऱ्याच अडचणींवर मात केली पण सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो अपंग होता. तुमचा विश्वास बसणार नाही, पण वस्तुस्थिती अशीच आहे की त्याच्या शरीराची उजवी बाजू सामान्यपणे काम करू शकत नव्हती.
अपघातात अपंग
जन्मताच त्याचं नाव तैमूर ठेवण्यात आलं. तैमूर म्हणजे लोह. नंतर लोक गंमतीने त्याला फारशी भाषेत तैमूर-ए-लंग (लंगडा तैमूर) म्हणू लागले.
तरुणपणात त्याच्या शरीराच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला या नावानं हाक मारण्यास सुरुवात झाली. यानंतर मग या नावाचा अपभ्रंश होत ते तैमूरलंग झालं.
पण तैमूरलंगच्या प्रवासात त्याचं शारीरिक अपंगत्व अडथळा निर्माण करू शकलं नाही. खरं तर तो काळ असा होता जेव्हा राजकीय सत्ता मिळवण्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीही आवश्यक होती.
तैमूरलंग केवळ एका हातानं तलवार पकडत असल्याचं सांगितलं जाते. अशा परिस्थितीत तैमूरलंगनं तलवारबाजी, घोडेस्वारी आणि तिरंदाजीसाठी स्वतःला योग्य कसं बनवलं, हा प्रश्नच आहे.
तैमूरलंग गंभीर जखमी झाल्यानंतर अपंग झाला, याचे सबळ पुरावे आहेत. पण, त्याच्यासोबत नेमका काय अपघात झाला होता, याबाबत मात्र अनिश्चितता आहे.
हा अपघात 1363 च्या सुमारास झाला असावा असा एक अंदाज आहे. तैमूरलंग तेव्हा दक्षिण-पश्चिम अफगाणिस्तानातील मृत्यूचे वाळवंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुर्शानमधील खाणींमध्ये मोलमजुरी करत होता.
आणखी एक स्रोत इब्न अरब शाह या 15व्या शतकातील सीरियन इतिहासकाराच्या मते, तैमूरलंग मेंढ्या चोरत होता, तेव्हा मेंढपाळानं त्याला पाहिलं आणि बाणानं जखमी केलं. मेंढपाळाचा एक बाण तैमूरच्या खांद्यावर लागला आणि दुसरा बाण नितंबावर लागला.
या सीरियन इतिहासकारानं असंही लिहिलंय की, "पूर्णत: जखमी झाल्यामुळ तैमूरलंगचं दारिद्र्य वाढलं. त्याचा दुष्टपणा आणि क्रोधही वाढला."
1404 मध्ये स्पॅनिश राजदूत क्लॅविजोने समरकंदला भेट दिली. सिस्तानच्या घोडदळाचा सामना करताना तैमूरलंग जखमी झाल्याचं त्यांनी लिहिलं आहे.
त्यांच्या मते, "शत्रूंनी तैमूरलंगला घोड्यावरून खाली पाडलं आणि त्याच्या उजव्या पायावर जखम केली. त्यामुळे तो आयुष्यभर लंगडत राहिला. नंतर त्याच्या उजव्या हातालाही दुखापत झाली. त्यानं हाताची दोन बोटेही गमावली."
सोव्हिएत पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकानं मिखाईल गेरिसिमोव्ह यांच्या नेतृत्वाखालील 1941 मध्ये समरकंदमधील तैमूरलंगच्या थडग्याचं उत्खनन केलं होतं. तैमूरलंग लंगडा होता पण त्याचं शरीर 5 फूट 7 इंच एवढं भारदस्त होतं, असं त्यांनी शोधून काढलं.
त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे त्याचा उजवा पाय डाव्या पायापेक्षा लहान झाला होता. याच कारणामुळे त्याचं नाव 'लंगडा' तैमूर असं पडलं.
अपंगत्व अडथळा ठरलं नाही
तैमूरलंगला चालताना उजवा पाय ओढावा लागत होता. याशिवाय त्याचा डावा खांदा उजव्या खांद्यापेक्षा खूप उंच होता. नंतर त्याच्या उजव्या हाताला आणि कोपऱ्यालाही दुखापत झाली होती.
टर्की, बगदाद आणि सीरियाच्या राज्यकर्त्यांसह 14 व्या शतकातील तैमूरलंगच्या शत्रूंनी त्याची चेष्टा केली. पण, युद्धात तैमूरलंगचा पराभव करणं हे त्याची चेष्टा करण्याइतकं सोपं नव्हतं.
तैमूरलंगचे कठोर टीकाकार असलेल्या अरबशाह यांनीही कबूल केलंय की, तैमूरलंगमध्ये ताकद होती आणि त्याला पाहून इतरांच्या मनात भीती निर्माण व्हायची.
कधीच पराभव झाला नाही
18व्या शतकातील इतिहासकार एडवर्ड गिब्बन यांनीही तैमूरलंगचं कौतुक केलं आहे. गिब्बन यांच्या मते, तैमूरलंगची लष्करी क्षमता कधीच मान्य करण्यात आली नाही.
गिब्बन यांनी लिहिलंय की, "ज्या देशांमध्ये त्यानं विजय मिळवला, तिथेही तैमूरलंगच्या जन्माबद्दल, त्याच्या चारित्र्याबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि अगदी नावाबद्दलही खोट्या कथा पसरवल्या गेल्या."
गिब्बन पुढे लिहितात, "पण प्रत्यक्षात तो एक योद्धा होता. एका शेतकऱ्यापासून ते आशियाच्या सिंहासनावर पोहचलेला व्यक्ती असा त्याचा प्रवास होता. अपंगत्वानं त्याच्या वृत्तीवर आणि भावनेवर परिणाम झाला नाही. त्यानं आपल्या कमकुवतपणावरही मात केली होती."
1405 मध्ये तैमूरलंग मरण पावला तेव्हा तो चीनचा राजा मिंग याच्याविरुद्धच्या युद्धासाठी जात होता. तोपर्यंत तैमूरलंग 35 वर्षं रणांगणावर विजय मिळवत राहिला.
आपल्या शारीरिक दुर्बलतेवर मात करून विश्वविजेता बनण्याचं असं दुसरं उदाहरण जगात दिसत नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)