You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लखीमपूर खिरी : दलित कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींची बलात्कार करून हत्या - ग्राऊंड रिपोर्ट
- Author, प्रशांत पांडे
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"माझ्या मुलींना का मारलं? माझ्या मुली कुठं आहेत?"
जीवाच्या आकांताने हे प्रश्न सातत्यानं विचारत टाहो फोडणाऱ्या आईचं मन तिच्या मुलींची हत्या झालीय हे स्वीकारायला तयार नाहीय. आजूबाजूला उपस्थित असलेले नातेवाईक तिला धीर देत होते. हे चित्र आहे उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमधील.
"त्यांनी माझ्या मुलींना मारायला नको होतं", "माझ्या मुलींना जीवे मारलं," "सगळ्यांना फाशी झालीच पाहिजे," "पोलीसही या कटात सामील आहेत" असं म्हणत हत्या झालेल्या दलित मुलींची आई धाय मोकलून रडत होती.
गुरुवारचा संपूर्ण दिवस हे कुटुंब दुःखाच्या छायेत होतं. रडून रडून आईची केविलवाणी अवस्था झाली होती. तिकडे पोस्टमॉर्टम लवकरात लवकर व्हावं म्हणून वडील पळापळ करत होते.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या मुलींवर बलात्कार झाल्याचं आणि त्यानंतर गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
लखीमपूर खिरी प्रकरण : ठळक मुद्दे
- दलित कुटुंबातील या दोन्ही मुली सख्ख्या बहिणी होत्या.
- मुलींचे वय अनुक्रमे 17 आणि 15 वर्षे होतं.
- दोघींचे मृतदेह बुधवारी झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले.
- पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्कार आणि त्यानंतर गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
- याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार..
कुटुंबीयांच्या उपस्थितीत तीन डॉक्टरांच्या समितीने मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. याची व्हिडिओग्राफी करण्यात आली. शवविच्छेदन गृहासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर मुलींचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावात आणण्यात आले. मात्र अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय तयार नव्हते.
स्थानिक प्रशासन आणि मुलींच्या कुटुंबीयांमध्ये एक लेखी करार झाला. हा करार होईपर्यंत कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.
एसडीएम राजेश कुमार सिंह आणि लखीमपूर खेरीचे एएसपी अरुण कुमार सिंह यांनी पीडितेच्या वडिलांना लेखी आश्वासन दिलंय.
या आश्वासनानुसार, दोन्ही मुलींच्या नावे बँकेत प्रत्येकी आठ लाख असे एकूण सोळा लाख रुपये ट्रान्सफर करण्याचं मान्य करण्यात आलंय. हे पैसे उद्या म्हणजेच 16 सप्टेंबर, शुक्रवारपर्यंत जमा होतील असं आश्वासन मुलीच्या वडिलांना देण्यात आलंय.
याव्यतिरिक्त राणी लक्ष्मीबाई योजनेतून मदत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक घर, कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी आणि इतर आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकारला पत्र लिहिण्यात येईल. याशिवाय आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल.
या सर्व घडामोडी घडून गेल्यावर स्थानिक एसडीएमने मृत मुलींच्या कुटुंबीयांशी बंद खोलीत चर्चा केली. तदनंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.
मृत मुलींच्या घरातील वातावरण..
गुरुवारी जोराचा पाऊस सुरू होता. मृत मुलींच्या लोहिया आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घराबाहेर गर्दी जमली होती. दूरचे नातेवाईक, पोलीस, मीडियाचे लोक भर पावसात उभे होते.
लखीमपूर जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 61 किलोमीटर अंतरावर या मुलींच गाव आहे. गावात रडणं, विव्हळणं तर सुरू होतंच पण लोकांची कुजबूजही सुरू होती. मध्येच गाडीचा सायरन वाजयचा आणि वातावरणात एक प्रकारचा तणाव यायचा.
गावाच्या उत्तरेला एक भलं मोठं ऊसाचं शेत आहे. या शेताजवळच त्या मुलींच घर आहे. याच शेतातील एका झाडाला मुलींचे मृतदेह लटकवण्यात आले होते.
गावात राहणारे राजू सांगतात, "साडे चार वाजल्यापासून मुलींचा शोध घेणं सुरू होतं. मुली सापडत नाहीत म्हटल्यावर गावातल्या 15 ते 20 जणांनी शोधाशोध सुरू केली. त्याच उसाच्या फडात खैराच एक झाडं होतं. त्या झाडाच्या फांदीला या दोघी बहिणींचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला"
मुलींच्या आईने जी तक्रार दिली होती, त्याआधारे निघासन पोलिसांनी खून, बेकायदेशीरपणे घरात घुसणे आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखल केले.
आईने आपल्या तक्रारीत म्हटलंय की, "दुचाकीवर आलेल्या तीन तरुणांनी माझ्या दोन्ही मुलींना जबरदस्तीने दुचाकीवर बसवलं आणि पळवून नेलं."
आईने दिलेल्या या तक्रारीची दखल आयजी लक्ष्मी सिंह यांनी घेतली. त्या स्वतः लखीमपूर इथं आल्या आणि तपासाची सूत्र हाती घेतली, त्यांनी घटनास्थळी भेट दिली.
घटना घडल्यानंतर 24 तासांच्या आत पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत लखीमपूर खेरीचे एसपी संजीव सुमन म्हणाले की, "हे आरोपी शेजारच्याच लालपुर गावातले असून गावातल्याच एका मुलाने त्यांना या कुकृत्यात मदत केली होती."
पोलिसांच्या थियरीवर प्रश्नचिन्ह..
या दोन्ही मुलींचे आईवडील मजूर म्हणून काम करतात. वडिलांकडे शेतजमीन नाहीये. उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यादव सत्तेवर असताना लोहिया आवास योजनेतून या मुलींच्या कुटुंबाला दोन खोल्यांचं पक्कं घर बांधून मिळालं.
या गावची लोकसंख्या दोन हजाराच्या आसपास असून दलित लोकसंख्या 500 हून जास्त आहे. गावात बहुतांश कुटुंबांकडे कसायला शेतजमिनी नाहीत, त्यामुळे मजूरवर्ग जास्त आहे.
या मुलींना दोन भाऊ आहेत. ते दोघेही दिल्लीत एक फॅक्टरीमध्ये मजुरीवर काम करतात. या सगळ्यात एक मोठी बहीणही आहे. तिचं लग्न जवळच्याच एका गावात लावून दिलंय. ही घटना घडली तेव्हा हे दोघेही भाऊ दिल्लीत होते. वडील रोजंदारीवर गेले होते. आई आणि मुली घरी होत्या.
मुलींच्या आईने सांगितल्याप्रमाणे, काही मुलं बाईकवरून आली आणि त्यांनी जबरदस्तीने मुलींना बाईकवर बसवून नेलं.
काही वेळातच शोधाशोध सुरू झाली. लालपूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी एक ऊसाच शेत होतं. या शेतातल्या एका झाडाच्या फांदीला या दोन्ही बहिणींचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि तपासाची चक्र फिरली.
लखीमपूर खिरी पोलिसांनी लालपूर गावातून पाच तर मुलींच्या गावातून एकाला अटक केली.
एसपी संजीव सुमन म्हणाले की, "जुनैद आणि त्याच्या इतर मित्रांबरोबर मुलींची ओळख झाली होती. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. आरोपींनी मुलींना फूस लावून पळवून नेलं. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार केला, गळा दाबून त्यांची हत्या केली आणि मृतदेह झाडाला लटकवले. आरोपींनी त्यांच्या अन्य साथीदारांनाही बोलावलं. प्राथमिक चौकशीअंती या गोष्टी समोर आल्या आहेत. आरोपींचे कपडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत."
या मुलींचे दोन्ही भाऊ रातोरात दिल्लीहून गावाला यायला निघाले. सकाळी 9 वाजता ते दोघे गावात पोहोचले. त्यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांचं म्हणणं आहे की, "त्या दोघीही त्यांच्या मनाने गेल्या असं पोलीस सांगतायत. जर त्या मनाने गेल्या होत्या तर त्यांना मारलं का? आम्हाला काहीच समजायला मार्ग नाही."
त्यांनी हात जोडून सांगितलं की, "प्लिज! आम्हाला थोडं एकटं सोडा."
आरोपींचे कुटुंबीय काय म्हणतात?
या हत्येप्रकरणी लालपूर गावातील पाच जणांना अटक करण्यात आलीय. पीडित कुटुंबाच्या गावापासून हे गाव दोन किलोमीटर अंतरावर आहे.
मुख्य आरोपी असलेल्या जुनैदचे 65 वर्षीय आजोबा अंगावर घोंगडी ओढून शांत बसले होते.
ते सांगतात, "माझा नातू हैदराबादमध्ये ग्रिल बनवण्याचे काम करायचा. सहा महिन्यांपूर्वी तो तिकडे गेला होता पण मोहरम असल्यामुळे तो परत आला होता. काल गल्ला घेण्यासाठी तमोलीपुरवाला गेला होता. साधारण 4 वाजता तर परत आला. तो दिल्लीला जाणार होता म्हणून घरातून निघाला. पण रात्री 11 वाजता पोलीस आले आणि जुनैदच्या वडिलांना घेऊन गेले. जुनैदच्या वडिलांकरवी त्याला फोन लावला आणि परत बोलावून घेतलं. त्यानंतर आम्हाला हे प्रकरण समजलं."
मुख्य आरोपी असलेल्या जुनैदचे वडील पोलिसांच्या ताब्यात आहेत. तिकडे त्याचे आजोबा नातवाचं आधारकार्ड दाखवून सांगतायत की, "पोलिसांनी पोरांना या प्रकरणात मुद्दामहून अडकवलं आहे, हे सर्व अल्पवयीन आहेत."
मुख्य आरोपीच्या घरापासून थोड्याच अंतरावर इतर आरोपींची घरं आहेत. हे सर्व आरोपी मोलमजुरी करून गुजराण करतात. त्यांच्यातले काहीजण गुजरात, हैद्राबादमध्ये कामाला आहेत.
यातले दोन आरोपी सख्खे चुलत भाऊ आहेत. या दोघांच्या आजी डोळ्यातलं पाणी आपल्या पदराला पुसत सांगत होती की, "दोघे झोपले होते, पोलीस आले आणि त्यांना घेऊन गेले."
दुसऱ्या एका आरोपीची आई सांगत होती की, "माझा मुलगा काल गल्ला गोळा करायला गेला होता. तो लवकरच आला कारण त्याला ताप आला होता. माझा मुलगा असं काही करणाऱ्यातला नाही. पोलीस त्याला जाणीवपूर्वक अडकवत आहेत."
ही घटना घडल्यानंतर लालपूर गावात भयाण अशी शांतता पसरली आहे. पोलीस गाडीचा सायरन मध्येच या शांततेचा भंग करतो. गावाच्या दक्षिणेकडे राहणारे एक वयोवृद्ध व्यक्ती सांगतात, "पोलिसांच्या गाड्या आल्यावर आम्हाला हे प्रकरण माहीत पडलं, तोपर्यंत आम्हाला याचा थांगपत्ताच नव्हता."
जमील म्हणतात, "जे घडलं ते वाईट होतं. हे कसं घडलं माहीत नाही पण या प्रकरणामुळे दोन्ही गावचे संबंध नक्कीच बिघडतील. इथे सगळे मिळून मिसळून राहायचे, पण आता काहीपण घडू शकतं."
गावात राजकीय पक्षांची गर्दी..
या दोन्ही बहिणींच्या हत्येनंतर उत्तरप्रदेशचं राजकारण तापलंय. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्वीट करत योगी सरकारवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे काँग्रेसच्या प्रियांका गांधी आणि आम आदमी पक्षानेही यूपीमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलेत.
समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्या जुही सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ गावात पोहोचलं होतं. तर काँग्रेसच्या दोन आमदारांनी मृत मुलींच्या कुटुंबाची भेट घेतली.
या सगळ्यात स्थानिक प्रशासनाने मात्र तत्परता दाखवत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा निर्धार केलाय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)