वाघाच्या जबड्यातून आपल्या बाळाला सोडवणारी आधुनिक हिरकणी

    • Author, सलमान रावी
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

आपल्या तान्ह्या बाळासाठी कठीण किल्ला उतरुन जाणाऱ्या हिरकणीची कथा आपल्या सर्वांना माहीत आहे.

तिच्या या शौर्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिचा गौरव केला होता आणि ती ज्या बुरुजावरून खाली उतरली तो व्यवस्थितरीत्या बांधून त्याला हिरकणी बुरूज नाव देण्यात आले होते, अशी ती कथा आहे.

ही तर झाली हिरकणीची कथा पण आपल्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी थेट वाघालाच भिडणाऱ्या आधुनिक हिरकणीची सध्या चर्चा सुरू आहे.

आपल्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी या महिलेनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि 15 महिन्यांच्या बाळाला तिने वाघाच्या जबड्यातून बाहेर काढले.

वाघाच्या या हल्ल्यात आई आणि बाळाला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांनाही जबलपूरच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना रविवारची आहे. मध्य प्रदेशच्या बांधवगड टायगर रिझर्व्हजवळ असलेल्या रोहनिया गावात अर्चना आपल्या बाळाला घेऊन शेतात काम करत होत्या. तितक्यात तिथे बाजूलाच असलेल्या घनदाट झाडीतून एक महाकाय वाघ आला आणि त्याने लहान बाळाला आपल्या जबड्यात पकडले.

काही क्षण तर अर्चना यांना कळलंच नाही की काय झालं, त्यांनी डोळ्याचं पातं लवतं न लवतं आपली सर्व शक्ती एकवटली आणि आपल्या बाळाची सुटका करण्यासाठी प्राणांची बाजी लावली. वाघाने त्यांच्यावर देखील हल्ला केला.

या झटापटीचा आवाज गावातील लोकांनी ऐकला आणि ते काठ्या घेऊन आले. तोपर्यंत अर्चना यांनी आपल्या बाळाला वाघाच्या जबड्यातून सोडवून घेतले होते. तरी देखील वाघ आक्रमक होता, तो तिथे असलेल्या लोकांवर हल्ला करण्याची तयारी करत असतानाच लोकांनी त्याला काठ्यांनी हुसकावून लावले.

या घटनेनंतर 1500 वर्ग किलोमीटर परिसरात पसरलेल्या बांधवगड टायगर रिझर्व्हच्या आजूबाजूंच्या गावात दहशतीचे वातावरण आहे.

गेल्या काही दिवसांपासून जंगलात वाघ मावनी वस्तीमध्ये येताना दिसत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तो कधी गावात सकाळी येतो तर कधी रात्री.

उमरियाचे वैद्यकीय अधिकारी मिस्थी रूहेला यांनी बीबीसीला सांगितले की लहान मुलांच्या शरीरावर खोल जखमा नाहीत परंतु अर्चना यांच्या जखमी गंभीर स्वरूपाच्या आहेत.

मिस्थी रुहेला यांनी सांगितले की, जंगली श्वापदांचा हल्ला झाल्यावर आम्ही अॅंटी रेबिज इंजेक्शन देतो. आम्ही दोघांनाही ते दिले आहे. आम्ही दोघांनी ते दिले आहे. अर्चना यांच्या पाठीवरील जखमा खोल आहेत. वाघाचा पंजा त्यांच्या पाठीवर पडला. या हल्ल्यामुळे अर्चना यांच्या फुफ्फुसांपर्यंत संसर्ग पसरला आहे.

याच रुग्णालयात दुसरे एक डॉक्टर सैफ यांनी सांगितले की त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या त्यामुळे त्यांना आम्ही जबलपूरच्या रुग्णालयात पाठवले आहे. ते या ठिकाणाहून 165 किमी आहे.

जबलपूर येथे त्यांना आयसीयूत ठेवण्यात आले आहे.

वाघाला पुन्हा जंगलात आणण्याचे आव्हान

मानपूर उप-वन मंडल अधिकारी आर. थिरुकुरल यांनी पत्रकारांना सांगितले की सध्या त्यांच्या समोर सर्वांत मोठं आव्हान आहे ते म्हणजे हा वाघ जंगलातून भटकून गावांगावांत फिरत आहे त्याला पुन्हा जंगलात आणणे.

ते सांगतात, की त्यासाठी आम्ही अनेक उपाय केले. हत्तीदेखील लावले आहेत. वनविभागाची पूर्ण फौज ढोल वाजवत जातात. जर गरज पडली तर पोलीस देखील सोबत आहेत. ते शस्त्रसज्ज आहेत. वाघाला बेशुद्ध करण्याची डार्ट गन देखील आमच्याकडे आहे. जर वाघ सापडला तर आम्ही त्याला डार्ट गनने बेशुद्ध करू. या कामासाठी ड्रोनची मदत देखील घेतली जात आहे.

उमरियाचे जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी वनविभागाशी चर्चा केली आहे. त्यांनी सांगितले की टायग रिझर्व्हच्या बाहेर वाघ पडू नये यासाठी अधिक चांगली व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी गावकऱ्यांशी देखील यावर चर्चा केली आहे.

बांधवगड टायगर रिझर्व्हच्या आजूबाजूच्या गावातील लोकांना केवळ वाघापासूनच धोका आहे असं नाही या भागात 46 जंगली हत्तींचे कळप देखील फिरतो. 2018 मध्ये हा कळप स्थलांतरित होत या ठिकाणी पोहचला.

वाइल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार या भागात सुरुवातीपासून हत्तींचे वास्तव्य नव्हते पण आता गावकरी सांगत आहेत की हत्तीचा कळप या भागात फिरतो आणि ते त्यांच्या पीकाचे नुकसान करतात.

हेच कारण आहे की मानव आणि प्राण्यांमधील संघर्ष अधिक तीव्र होत आहे. सामाजिक संघटना आणि वनविभागाने यावर उपाय म्हणून रॅपिड अॅक्शन प्लान देखील बनवला आहे. यामुळे गावकरी जागृत राहू शकतील असं त्यांनी याबाबत सांगितले आहे. या कामासाठी 10 गावांची निवड करण्यात आली आहे.

त्यापैकी एक मानपूर देखील आहे.

तरी देखील गावकऱ्यांना ही चिंता सतावते की जंगली श्वापदं आली तर काय होईल?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

गावकरी सांगतात की ते रोज रात्री पहारा देतात. जर एखादे जंगली श्वापद आले आणि त्याच्या हल्ल्याची भीती वाटली तर आम्ही सर्वांना सूचना देतो असे त्यांनी सांगितले.