अवयव प्रत्यारोपण : दोन्ही हातात गमावल्यावर जेव्हा त्याला एका मुलीने आपला खराखुरा 'हात' दिला आणि...

राहुल अहिरवारचं गेल्यावर्षी हात प्रत्यारोपण झालं

फोटो स्रोत, Shardul Kadam

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

अपघातात दोन्ही हात गमावलेल्या राहुलवर मुंबईत हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊन एक वर्ष लोटलंय. दोन्ही हात नसल्यामुळे दुसऱ्यांवर अवलंबून असलेला राहुल, आता स्वावलंबी जीवन जगतो आहे. स्वतःच्या हाताने जेवू शकतो, लिहू शकतो आणि कॉम्प्युटरवर कामही करू शकतो.

केईएम रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर उपचारासाठी 10 महिने राहिल्यानंतर राहुल आता बाहेर हिंडू-फिरू शकतो. मुंबईतील हात प्रत्यारोपणाची ही दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया आहे.

नव्या हाताने जगण्याची नवी उमेद घेऊन राहुल काही दिवसात गावी जायची तयारी करतो आहे, पुढचं शिक्षण घेण्यासाठी सज्ज होतोय. पण, राहुलसाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.

'हा माझा हात आहे....'

त्यादिवशी धो-धो पाऊस कोसळत होता. मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या लॉबीमध्ये रुग्णांची गर्दी होती. लाल टी-शर्ट, जीन्सचं जॅकेट, खांद्यावर बॅग आणि चिंब भिजलेला 22 वर्षांचा मुलगा ऑक्युपेशनल थेरपी विभागात आला.

डॉ. वैजयंती यांनी हाक मारली. 'राहुल कैसे हो?' आणि तिथेच हात प्रत्यारोपण झालेल्या राहुलसोबत माझी ओळख झाली. राहुलवर ऑगस्ट 2021 मध्ये केईएम रुग्णालयात हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती.

एका अपघातात दोन्ही हात गमावलेल्या राहुलचा उजवा हात मनगटाच्या थोड्या वरपासून प्रत्यारोपित करण्यात आलाय. नवीन हात आणि राहुलच्या मूळ हाताचा रंग वेगळा असल्याचं लगेच दिसून येतं. महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सप्लांट करण्यात आलेला हात हा मुलीचा आहे.

राहुलला दररोज दोन तास ऑक्युपेशनल थेरपी घ्यावी लागते

फोटो स्रोत, Shardul Kadam

राहुल रोज दोन तास ऑक्युपेशनल थेरेपी घेतो. "दैनंदिन जीवनातील कामं त्याने स्वत: करावीत यासाठी त्याला थेरपी दिली जाते. जेणेकरून हातात हळूहळू ताकद येईल," ऑक्युपेशनल थेरेपिस्ट डॉ. वैजयंती जैन सांगतात राहुल प्रत्यारोपित हाताने छोट्या-छोट्या गोष्टी उचलून ठेवत होता.

राहुल अत्यंत मितभाषी आणि लाजरा आहे. आपला प्रत्यारोपण झालेला हात आनंदानं दाखवत राहुल म्हणाला, "सर्जरीनंतर लोक म्हणायचे, हात दुसऱ्याचा आहे. पण हा माझा हात आहे. कधीच दुसऱ्याचा आहे असं वाटलं नाही. हातात संवेदना आल्यापासून हा माझाच हात असल्याचं वाटतंय."

राहुल चिंब भिजला होता. छत्री किंवा रेनकोट का वापरत नाही, भिजत का फिरतोस मी विचारलं. प्रत्यारोपण झालेला उजवा हात दाखवत राहुल म्हणाला, "छत्री हातात पकडली की पडते." अजून छत्री पकडण्याची ताकद नाहीये. सकाळी घरून निघताना पाऊस नव्हता त्यामुळे रेनकोट आणला नाही."

'त्यांनी हात दिलाय... हाताने काही चांगलं केलं नाही तर व्यर्थ जाई'

राहुलला मिळालेला नवीन हात ब्रेन डेड म्हणजे मेंदू मृत झालेल्या एका मुलीच्या आई-वडिलांनी दान केलाय. ही मुलगी कोण होती, तिचे आई-वडील कोण आहेत, राहुलला काहीच माहिती नाही.

पण, या मुलीच्या आई-वडिलांना त्याला काय दिलंय याची जाणीव त्याला आहे. तो पुढे म्हणाला, "माझ्याकडे काहीच नव्हतं. त्यांच्यामुळेच मला हात मिळाला. या हाताने चांगलं केलं नाही, तर हात मिळणं व्यर्थ जाईल. हात नव्हते तेव्हादेखील जगत होतो. आता हात मिळाला आहे. काहीतरी केलं पाहिजे."

ऑक्युपेशनल थेरपी विभागात राहुल विविध साधनांच्या मदतीने सराव करत होता. रोजचा हा सराव त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

'डोळे उघडले आणि हाताची नखं दिसली...'

राहुलचा उजवा हात प्रत्यारोपण होऊन आता वर्ष लोटलंय. गेल्यावर्षी 11 ऑगस्टला त्याच्यावर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर राहुल तब्बल 10 महिने उपचारासाठी केईएम रुग्णालयातच दाखल होता.

दोन महिन्यांपूर्वीच त्याला घरी जायची परवानगी मिळाली आहे. आता तो हिंडू-फिरू शकतो. राहुलची शस्त्रक्रिया जवळपास 13 तास सुरू होती.

तो दिवस आठवताना राहुल सांगतो, "शस्त्रक्रियेनंतर मी पहिल्यांदा डोळे उघडले. मला फक्त बोटाची नखं दिसली. मला हात मिळाला होता. तो माझा हात होता," राहुल सांगत होता. बॅंडेज कधी काढणार, रक्तपुरवठा कधी सुरू होईल. हाताची जखम कधी भरणार? असे अनेक प्रश्न मनात घर करून होते.

प्रत्यारोप झालेल्या हाताने राहुल आता लिहू शकतो

फोटो स्रोत, Shardul Kadam

रुग्णालयात दाखल असताना तो डॉक्टरांना सतत विचारायचा, मी किती वजन उचलू शकेन? कोणत्या गोष्टी करणं शक्य आहे? किती हालचाल होईल? हातात किती शक्ती येईल? डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिवस सरत गेले आणि हळूहळू राहुलच्या नवीन हातात संवेदना येऊ लागली.

"मला खूप आनंद झाला होता. पण, एकाच हाताचं प्रत्यारोपण झालं होतं. थोडं दु:ख झालं. पण, दोन्ही हात नव्हते त्यापेक्षा एकतरी मिळाला होता, याचं समाधान होतं," राहुल पुढे म्हणाला.

मी पहिल्यांदा चमचा हातात धरला....

हात प्रत्यारोपणानंतरचा प्रवास सांगताना राहुलच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. आता परावलंबी जीवन तो जगणार नव्हता याचा आत्मविश्वास डोळ्यात दिसून येत होता.

राहुलने पहिल्यांदा हातात चमचा धरला

फोटो स्रोत, Rahul Ahirwar

राहुल सांगत होता, "हातात संवेदना आली. हालचाल होऊ लागली. मी पहिल्यांदाच हातात चमचा पकडून जेवण केलं. त्या दिवशी मी किती आनंदात होतो याचं वर्णन करता येणार नाही. मला आत्मविश्वास आलाय. आता मी काहीतरी करू शकतो."

राहुल आता स्वतःच्या हाताने जेवू शकतो, लिहू शकतो. मी या गोष्टी करू शकतो तर इतरही करू शकतो याचा आत्मविश्वास त्याला आला आहे.

"मी या हाताने जड सामान उचलू शकत नाही. वजनाचं काम करू शकत नाही. त्यामुळे पुन्हा अभ्यासाकडे वळलो. माझी इच्छा आहे यूपीएससी पास व्हायची," राहुल सांगत होता.

राहुल अभ्यासाकडे पुन्हा वळण्यासोबत मुंबईत MH-CIT शिकतोय. परळमधील महापुरूष बालदीप मंडळ या समाजसेवी संस्थेने त्याला मोफत शिकण्यासाठी मदत केली आहे. त्याचे संचालक विकास वराडकर म्हणाले, राहुल MH-CIT करतोय. आम्ही त्याला सर्व प्रकारची मदत करतोय.

'दोन्ही हात गेले... वाटलं आयुष्य संपलं'

राहुल अहिरवार मूळचा मध्यप्रदेशचा आहे. पण त्याचे आई-वडील आणि कुटुंबीय हरियाणामध्ये काम करतात. दोन वर्षांपूर्वी तो 12वी झाल्यानंतर आपल्या कुटुंबीयांकडे हरियाणात गेला होता.

त्या दिवसाची आठवण करताना राहुल थोडा भावूक होतो. "सुट्टीचे दिवस होते. कुटुंबाला भेटावं म्हणून हरियाणात गेलो. सुट्टी होती रिकामं का बसावं, म्हणून काम सुरू केलं. कंपनीत 10-15 दिवस झाले असतील. काम करताना दोन्ही हात मशीनखाली आले."

ऐन उमेदीत राहुल परावलंबी झाला होता. याचा त्याच्या मानसिक अवस्थेवर मोठा परिणाम झाला. तो म्हणाला, "दीड वर्ष बिना हाताचा जगलो. वाटलं आयुष्य संपलं. घरचे जेवू-खाऊ घालायचे. कुटुंबाने खूप पाठिंबा दिला. त्यांच्या जोरावर मी पुन्हा उभा राहिलो." पण, हे दिवस त्याच्यासाठी अजिबात सोपे नव्हते.

हात प्रत्यारोपानंतर राहुल कॉम्प्युटरवर काम करताना राहुल

फोटो स्रोत, Shardul Kadam

माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता, राहुल सांगत होता. "घरी जेव्हा एकटा असताना 24 तास नजर दोन्ही हातावर असायची. तेव्हा वाटायचं दोन्ही हात गेले आता आयुष्य संपलं... खूप डिप्रेशनमध्ये जायचो. आयुष्य संपवण्याचे विचार मनात येत होते."

राहुलला हात प्रत्यारोपणाबाबत इंटरनेटवर माहिती मिळाली. पण ही शस्त्रक्रिया भारतात होते हे त्याला माहीत नव्हतं. त्याने भारतातील हात प्रत्यारोप करणाऱ्या रुग्णालयांची माहिती काढली.

तो पुढे सांगत होता, मी केरळला गेलो. ज्या व्यक्तीचे हात ट्रान्सप्लांट झालेत त्यांना भेटलो. त्यांचेही दोन्ही हात गेले होते. त्यांचे हात पाहून माझ्या आशा पल्लवीत झाल्या. प्रत्यारोपण यशस्वी होऊ शकतं असं मनात एक छान फिलींग आलं.

पण, खासगी रुग्णालयात खूप जास्त खर्च होता. तो परवडणारा नव्हता. त्यामुळे सरकारी रुग्णालयांची माहिती काढणं सुरू केलं.

'...आणि मी केईएममध्ये पोहोचलो'

इंटरनेटवर राहुलला केईएम रुग्णालयाची माहिती मिळाली. सरकारी रुग्णालय असल्याने फेब्रुवारी 2021 ला त्याने थेट मुंबई गाठली. त्याच्यासोबत भाऊ, वहिनी आणि त्यांची दोन लहान मुलं देखील मुंबईत आले. राहुल सध्या चेंबूरमध्ये भाड्याने राहातो.

राहुलने हात प्रत्यारोपणासाठी केईएमध्ये रजिस्टर केलं. पण 5-6 महिने डोनर मिळाला नाही. राहुल सांगत होता, दिवस उलटून चालले होते. मुंबईत रहाण्यासाठी पैसे नव्हते. काम नव्हतं. मनात विचार येत होता. हात मिळणार का? कधी मिळणार? मी काही करू शकतो?

एके दिवशी अचानक रात्री केईएम रुग्णालयातून त्याला फोन आला. "मनात चलबिचल सुरू होती. मी विचारलं डोनर मिळाला. डॉक्टर हो म्हणाले. मनात एक आशा निर्माण झाली. आता सर्वकाही ठीक होईल."

रुग्णालयात जाताना मनात आलेले विचार सांगताना तो म्हणतो, "इतक्या वर्षानंतर हात मिळणार होता. माणसांसारखाच हात असणार होता. आपल्यासारखाच काम करणार होता. संवेदना ही असतील. पण सोबत थोडी भीती होती. कारण शस्त्रक्रिया खूप मोठी होती."

हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किती कठीण आहे?

ऑक्युपेशनल थेरपी सेशन संपल्यानंतर बोलता-बोलता राहुल केईएम रुग्णालयाच्या प्लॅस्टिक सर्जरी विभागप्रमुख डॉ. विनीता पुरी यांच्या केबिनकडे निघाला. डॉ. पुरी आणि त्यांच्या टीमने राहुलवर यशस्वी शस्त्रक्रिया केलीये. डॉ. पुरी राहुलच्या प्रोग्रेसवर कायम नजर ठेऊन असतात.

डॉ. पुरी यांनी राहुलची रुटीन तपासणी केली. बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणल्या, "आज राहुल पूर्णत: स्वावलंबी आहे. हातात पूर्ण संवेदना आली आहे. जी कामं तो करतो त्यामुळे हाताला काही इजा होण्याची भीती नाही. हाताला पकड चांगली आहे. स्नायू योग्य पद्धतीने काम करत आहेत."

राहुलने डॉ. पुरी यांना पेपरवर त्याच्या नव्या हाताने लिहून दाखवलं. चहा पिण्याचा मग हातात उचलून दाखवला. डॉ. पुरी म्हणाल्या, चांगली प्रगती आहे.

डॉ. विनीता पुरी यांच्यासोबत राहुल अहिरवार

फोटो स्रोत, Shardul Kadam

राहुलची शस्त्रक्रिया मुंबईतील दुसरी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. ही शस्त्रक्रिया खूप कठीण असते का? आम्ही डॉ. विनिता पुरी यांना विचारलं. त्या म्हणाल्या, "ही खूप कठीण शस्त्रक्रिया आहे. यात जोडण्यात येणाऱ्या नसा आणि रक्तवाहिन्या खूप पातळ असतात. या जोडल्यानंतर रक्तपुरवठा सुरळीत व्हायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे, संवेदना येण्यासाठी नसांची वाढ व्हावी लागते."

आता राहुलची करंगळी हळूहळू हलू लागली आहे. नसांची वाढ गेल्या दोन-तीन महिन्यापासून सुरू झालीये. ही वाढ होईपर्यंत त्याला हाताला आधार देण्यासाठी स्पिंट (एक प्रकारचं साधन) वापरावं लागेल.

तज्ज्ञ सांगतात, हात आणि इतर अवयव प्रत्यारोपणात फरक आहे. हात प्रत्यारोपण कॉम्पोझिट ट्रान्सप्लांट आहे. कारण, यात विविध टिश्यू असतात. त्वचा, हाडं, स्नायू, विविध प्रकारच्या नसा आणि टेन्डन्स असतात. तर, किडनी आणि लिव्हरला सॉलिड ऑर्गन प्रत्यारोपण म्हणतात.

डॉ. पुरी पुढे म्हणतात, हाताचा आकार मॅच होणं गरजेचं नसतं. आकार थोडा वेगळा असेल तरी काही फरक पडत नाही. रंगाचा फरक काही दिवस असतो. पण ज्यांचं याआधी ऑपरेशन झालंय त्यांचा रंगही आता मॅच होऊ लागलाय.

मुंबईत किती हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या?

मुंबईतील विभागीय ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटरच्या माहितीनुसार,

  • 2020 मध्ये मुंबईत दोन्ही हात प्रत्यारोप शस्त्रक्रिया झाल्या.
  • त्यानंतर 2021 मध्ये दोन्ही हात प्रत्यारोपणाच्या दोन आणि एक हात प्रत्यारोपणाची एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
  • 2022 मध्ये आत्तापर्यंत दोन हात प्रत्यारोपणाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्यात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)