आधी दुसऱ्यांदा पूर येण्याच्या भीतीनं बचावकार्य थांबवलं, आता चीनकडून पुन्हा बचावकार्य सुरू

फोटो स्रोत, Getty Images
चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तिबेटच्या बाजूला असलेला नैसर्गिक तलाव पूर्णपणे भरला होता आणि त्यातील पाणी हळूहळू बाहेर पडत होतं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी परिसरातील बचावकार्य थांबवलं होतं आणि परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात होतं.
मात्र, आता तलावातून पाणी बाहेर पडणं थांबलं असून कर्मचारी पुन्हा बचावकार्य सुरू करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती चीनच्या सरकारी माध्यमांनी दिली.
शिन्हुआ या वृत्तसंस्थेनं असंही सांगितलं आहे की, येत्या काही तासांत परिस्थितीचा अधिक चांगल्या प्रकारे अंदाज घेण्यासाठी तलावाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत.
नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर असलेल्या ग्यिरोंग पोर्टच्या वरच्या बाजूला वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीवर अधिकारी सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
26 ऑगस्टला तिबेट-नेपाळ सीमेवर आलेल्या पुरानंतर नदीच्या प्रवाहात ढिगारा साचला आणि एक नैसर्गिक बंधारा तयार झाला. यानंतर तिथे वेगाने पाणी जमा होत एक तलाव तयार झाला.

फोटो स्रोत, CCTV
तलावामुळे वाढलेल्या धोक्यामुळे आता मदत आणि बचाव पथकांसमोर दुहेरी आव्हान उभं राहिलं आहे. एकीकडे बेपत्ता लोकांचा शोध घ्यायचा आहे, तर दुसरीकडे संभाव्य नव्या पुरापासून लोकांना सुरक्षित ठेवायचं आहे.
याआधी हा तलाव फुटल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं होतं.
यानुसार, नेपाळ पोलिसांनी या संदर्भातला इशारा देताना म्हटलं होतं, "तिबेटच्या बाजूला असलेला तलाव पुन्हा फुटल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बचाव आणि मदतकार्यात सहभागी असलेले सर्व सुरक्षा कर्मचारी, बचाव पथकं तसंच नागरिकांनी सतर्क राहावं आणि तातडीने सुरक्षित ठिकाणी जावं."

बीबीसीच्या दक्षिण आशिया प्रतिनिधी अझादेह मोशिरी यांनी सांगितलं, "आम्ही त्रिशूली नदीच्या वरच्या बाजूला असलेल्या एका भागात पोहोचलो आहोत. इथे लोक सुरक्षित राहण्यासाठी एकत्र जमले असून धोका टळण्याची वाट पाहत आहेत. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्याचे व्यवस्थापकही आमच्यासोबत आहेत. लष्कराने हे हॉटेल रिकामं करायला सांगितलं होतं.
दरम्यान, त्रिशूलीमधल्या लष्कराच्या छावणीत दर काही मिनिटांनी हेलिकॉप्टर उतरतात. या हेलिकॉप्टरमधून बचावलेल्या लोकांना आणलं जात आहे. त्यापैकी काही जण जखमी आहेत.
या छावणीच्याच बाहेर अनेक लोक आपल्या कुटुंबातल्या सदस्यांची काही माहिती मिळते का याची वाट पाहत उभे दिसतात.
मृतांचा आकडा 547 वर
नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 26 ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 547 वर पोहोचली आहे.
दरम्यान, काठमांडूमधील चीनच्या दूतावासाने म्हटलं आहे की, बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध आणि बचावकार्य सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. तसेच, भूस्खलनामुळे तयार झालेलं सरोवर फुटण्याचा धोका असल्याचाही इशारा देण्यात आला आहे.
यापूर्वी नेपाळच्या नॅशनल डिजास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटी (NDRRMA) ने सांगितलं होतं की, चीनच्या बाजूला असलेल्या सरोवराचा नैसर्गिक बांध फुटल्याची कोणतीही अधिकृत माहिती त्यांना मिळालेली नाही.
नेपाळमधील या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून बचाव आणि शोधमोहीम अद्याप सुरू आहे.
नेपाळच्या लष्कराने सांगितलं आहे की, पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागांतून त्यांनी 900 जणांची सुटका केली आहे. सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये रसुवा आणि नुवाकोटचा समावेश आहे.
सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 92 भारतीयांसह 119 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
सागामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील 37 पर्यटक सुखरूप
कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील 37 जण अडकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर सर्वजण 28 ऑगस्टला सकाळी 6 वाजता सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत.

फोटो स्रोत, CMO Maharashtra
ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील 37 जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान ते सागा येथे अडकले. त्यांचे काठमांडूहून परतीचे विमान 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता नियोजित असल्याने वेळेत काठमांडू गाठणे आवश्यक होते.
याबाबतत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्वरित भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक सहकार्य मिळवले.
महाराष्ट्रातील काही पर्यटक अजूनही बेपत्ता
ठाण्यातील समीर जोशी आणि त्यांच्या पत्नी अपर्णा जोशी हे दोघे बेपत्ता आहेत. पूर येण्याच्या आधी एक तास ते तिमुरे (नेपाळ) ग्यिरोंग सीमेवर होते.
नेपाळमधील पुरात सतीश विनायक पाटणकर आणि त्यांच्या पत्नी रेखा पाटणकर देखील बेपत्ता आहेत.
त्यांच्यासोबत शेवटचा संपर्क मंगळवारी (25 ऑगस्ट) रात्री झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं.
ठाणे, घंटाळी परिसरातील ते रहिवासी आहे.
त्यांचा एकूण 27 जणांचा ग्रुप होता.त्यापैकी एका व्यक्तीने 26 ऑगस्टला सकाळी साडे आठच्या सुमारास माहिती दिली की ते चायनीज इमिग्रेशन पॉईंटवर पोहोचले आहेत.
नवी मुंबईतील रहिवासी यशस भंड हे देखील नेपाळमध्ये बेपत्ता आहेत.
रिचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सशी संबंधित असलेले यशस हे 25 ऑगस्टच्या रात्री नेपाळमधील तिमुरे इथं होते. त्यांचा ग्रुप 26 ऑगस्टच्या सकाळी रसुवा इमिग्रेशन पॉईंटमार्गे नेपाळ-चीन सीमा ओलांडून केरुंग/ ग्यिरोंगच्या दिशेने प्रवास करणार होता.
यशस भंड यांच्याशी शेवटचा संपर्क 26 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 7.50 वाजता झाला होता.
नेपाळच्या पुरानंतर भारतात वाहून आले मृतदेह
नेपाळमधल्या पुराचा परिणाम भारताच्या काही भागांतही दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये गंडक (नारायणी) नदीत 4 मृतदेह, तर कुशीनगरमध्ये 3 मृतदेह सापडले आहेत.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये 5 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात हे मृतदेह नदीत वाहून गेले असावेत आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत भारताच्या दिशेने आले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

फोटो स्रोत, Gaurav Gulmohar
सशस्त्र सीमा दलाच्या बचाव पथकाला नदीवर नजर ठेवताना हे मृतदेह वाहून जात असल्याचं दिसलं.
पथकाने मोटरबोटीच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढले. ते महाराजगंज आणि कुशीनगर जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आले आहेत. अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही.
निचलौलचे उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ गुप्ता यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "गुरुवारी (27 ऑगस्ट) दुपारी गंडक नदीत 4 मृतदेह सापडले. त्यामध्ये 3 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हे मृतदेह अपस्ट्रीम म्हणजेच नेपाळच्या दिशेने वाहून आले असण्याची दाट शक्यता आहे."
त्यांनी म्हटलं, "अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही. आम्ही नेपाळ प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहोत. नदीकाठी एसडीआरएफ, आरआरटी आणि एसएसबीची पथकं सातत्याने नजर ठेवून आहेत."
एसएसबी तसेच महाराजगंज आणि कुशीनगर जिल्हा प्रशासन मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी नेपाळमधील संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
कुशीनगरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सिद्धार्थ वर्मा यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "कुशीनगरमध्ये 3 मृतदेह सापडले आहेत. त्यामध्ये 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तिन्ही मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे."
नेपाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर आणि पुरानंतर गंडक नदीचा प्रवाह वेगवान झाला आहे. येत्या काळात आणखी मृतदेह भारताच्या दिशेने वाहून येऊ शकतात, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























