दुष्काळामुळे नदी आटली आणि 100 वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेला 226 वर्षं जुना पूल बाहेर आला

कोरड्या आणि उष्ण हवामानामुळे हा पूल यापूर्वी 2025 मध्ये पाण्याच्या वर दिसला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरड्या आणि उष्ण हवामानामुळे हा पूल यापूर्वी 2025 मध्ये पाण्याच्या वर दिसला होता.
    • Author, डॅनिएल हर्बर्ट
    • Role, बीबीसी वेल्स
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

सुमारे 100 वर्षांपूर्वी पाण्याखाली गायब झालेला 226 वर्षं जुना ऐतिहासिक दगडी पूल पुन्हा एकदा दिसू लागला आहे. पाण्याची पातळी प्रचंड घटल्यामुळे गेल्या अवघ्या 2 वर्षांत चक्क दुसऱ्यांदा हा पूल पाण्याच्या वर डोकावताना दिसला आहे.

हा ऐतिहासिक पूल 1800 च्या सुमारास बांधला गेला असावा असं मानलं जातं . तो 1911 पासून 'मर्थिर टिडफिल'च्या 'ल्वीन-ऑन' जलाशयाच्या तळाशी विसावला होता.

पण 1976 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामुळे हा पूल अचानक वर आला होता आणि त्यानंतर थेट 2025 मध्ये तो पुन्हा दिसला.

ब्रिटनमध्ये यंदाचा जुलै महिना हा गेल्या 190 वर्षांतील सर्वात कोरडा ठरला. या जुलै महिन्यात पाण्याचा तळ आटताच दोन कमानींची ही ऐतिहासिक रचना पुन्हा एकदा सर्वांच्या नजरेस पडली आहे.

'नॅचरल रिसोर्सेस वेल्स' (NRW) नुसार, यंदा जुलै महिन्यात वेल्समध्ये सरासरीच्या अवघा 8% इतकाच पाऊस पडला आहे. यामुळे देशातील बहुतांश नद्या कोरड्याठाक पडल्या असून पाण्याच्या पातळीने नीचांक गाठला आहे.

या भीषण दुष्काळामुळे अनेक दडलेले ऐतिहासिक आणि पुरातत्वीय अवशेष पुन्हा एकदा समोर आले आहेत. यामध्ये कॉनवेमधील डेगन्वी गोल्फ कोर्सच्या खाली असलेले पहिल्या महायुद्धातील सैनिकांच्या सरावाचे खंदक स्पष्ट दिसू लागले आहेत.

'रॉयल कमिशन ऑन द एन्शंट अँड हिस्टॉरिक मॉन्युमेंट्स ऑफ वेल्स' (RCAHMW) नुसार, जून महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे प्रागैतिहासिक काळातील लांबलचक दफनभूमी, जुने किल्ले आणि थेट प्राचीन रोमन काळातील इमारतींचे अवशेष जमिनीवर आले आहेत.

दुष्काळामुळे पाण्याची पातळी घटली; मर्थिर टिडफिलच्या 'ल्विन-ऑन' जलाशयातील जुना दगडी पूल 2 वर्षांत सलग दुसऱ्यांदा पाण्याबाहेर.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दुष्काळामुळे पाण्याची पातळी घटली; मर्थिर टिडफिलच्या 'ल्विन-ऑन' जलाशयातील जुना दगडी पूल 2 वर्षांत सलग दुसऱ्यांदा पाण्याबाहेर.

RCAHMW च्या माहितीनुसार, यांपैकी अनेक प्राचीन खुणा जमिनीवरून नव्हे तर केवळ आकाशातूनच पिकांमध्ये आणि गवतावर उमटलेल्या विशिष्ट आकारांच्या रुपात ओळखता येतात. तर काही अवशेष तब्बल 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच नजरेस पडले आहेत.

पोविसमधील वेल्शपूल येथे सुमारे 5,000 वर्षांपूर्वीच्या नवपाषाण युगातील एका आयताकृती थडग्याच्या खुणा पिकांवर स्पष्ट दिसल्या आहेत. दुसरीकडे कॉनवेमधील 'केरहुन' रोमन किल्ल्याखाली गाडल्या गेलेल्या प्राचीन रोमन इमारतींविषयी पुरातत्वशास्त्रज्ञांच्या हाती नवी आणि महत्त्वाची माहिती लागली आहे.

कॉनवेच्या देगनवी भागातील एका गोल्फ कोर्सवर पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांच्या सरावासाठी खोदलेल्या खंदकांच्या खुणा वाळलेल्या गवतातून स्पष्ट दिसल्या आहेत.

फोटो स्रोत, RCAHMW

फोटो कॅप्शन, कॉनवेच्या देगनवी भागातील एका गोल्फ कोर्सवर पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांच्या सरावासाठी खोदलेल्या खंदकांच्या खुणा वाळलेल्या गवतातून स्पष्ट दिसल्या आहेत.

या अभूतपूर्व कोरड्या हवामानामुळे कार्मार्थनशायरमधील लँडिलो येथील नॅशनल ट्रस्ट सिम्रूच्या 'दिनेफूर' परिसरात पूर्वी असलेल्या निसन हट्सची (अर्धगोलाकार पत्र्यांच्या शेडची) बाह्यरेखाही जमिनीवर ठळकपणे नजरेस पडल्या आहेत.

'नॅशनल ट्रस्ट सिमरू'च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तात्पुरत्या निवाऱ्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि युद्धानंतरच्या दिवसांत अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. सुरुवातीला या जागेचा वापर लष्करी रुग्णालय म्हणून आणि नंतर युद्धकैद्यांच्या छावणीसाठी करण्यात आला होता.

युद्ध संपल्यानंतर घरांची मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी या पत्र्याच्या झोपड्यांचे रूपांतर स्थानिक बेघर कुटुंबांसाठी तात्पुरत्या घरांमध्ये करण्यात आले. याच कारणामुळे या वसाहतीला स्थानिक पातळीवर 'टिन टाऊन' म्हणजेच पत्र्यांचे शहर असे नाव पडले होते.

भीषण दुष्काळामुळे वेल्समधील लँडिलो येथे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जुन्या निसन हट्सच्या खुणा जमिनीवर पुन्हा स्पष्ट दिसू लागल्या आहेत.

फोटो स्रोत, RCAHMW

फोटो कॅप्शन, भीषण दुष्काळामुळे वेल्समधील लँडिलो येथे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जुन्या निसन हट्सच्या खुणा जमिनीवर पुन्हा स्पष्ट दिसू लागल्या आहेत.

दुष्काळ जाहीर झाला असला तरी सध्या घरे आणि उद्योगांच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यावर लगेचच संकट आलेले नाही. कारण वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे तिथल्या जल कंपन्यांचे म्हणणे आहे.

मात्र 'नॅचरल रिसोर्सेस वेल्स' (NRW) नुसार, वेल्समधील भूजल पातळीत मोठी घट झाली असून काही ठिकाणी ती अपेक्षेपेक्षा जास्त खाली गेली आहे.

एनआरडब्ल्यूच्या माहितीनुसार दुष्काळामुळे 'पर्यावरणावर होत असलेल्या व्यापक दुष्परिणामांचा' आढावा त्यांची पथके घेत आहेत. शिवाय 'वेल्समधील निसर्ग आणि पर्यावरणाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.'

दुष्काळामुळे पाण्याची पातळी घटली; मर्थिर टिडफिलच्या 'ल्विन-ऑन' जलाशयातील जुना दगडी पूल 2 वर्षांत सलग दुसऱ्यांदा पाण्याबाहेर.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दुष्काळामुळे पाण्याची पातळी घटली; मर्थिर टिडफिलच्या 'ल्विन-ऑन' जलाशयातील जुना दगडी पूल 2 वर्षांत सलग दुसऱ्यांदा पाण्याबाहेर.

एनआरडब्ल्यूच्या (NRW) रियान थॉमस यांनी सांगितले की, या कोरड्या हवामानाचे गंभीर दुष्परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत. त्यांची पथके हवामानाचा अंदाज आणि नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

एप्रिल 1976 मधील तीव्र दुष्काळामुळे वेल्समध्ये पाणी कपात लागू करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एप्रिल 1976 मधील तीव्र दुष्काळामुळे वेल्समध्ये पाणी कपात लागू करण्यात आली होती.

त्या म्हणाल्या, "हवामानाच्या अंदाजानुसार येणाऱ्या काळात चांगल्या पावसाची कोणतीही दाट शक्यता दिसत नसून उर्वरित उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच पाण्याचा अत्यंत जपून वापर करणे नेहमीपेक्षा आज अधिक गरजेचे झाले आहे."

"कारण आज आपण वाया घालवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्या नद्या आणि वन्यजीवांना या अत्यंत गरजेच्या वेळी कमी पडणारे पाणी आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)