You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंनी मनसेला साद घातली तर बघू- शर्मिला ठाकरे #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. उद्धव ठाकरेंनी मनसेला साद घातली तर बघू- शर्मिला ठाकरे
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं की, "उद्धव ठाकरेंनी मनसेला साद घातली तर येऊ देत, मग बघू." पुण्यात पत्रकारांनी शर्मिला यांना असा प्रश्न विचारला.
शर्मिला ठाकरे यांच्या उत्तरावर सांगोला दौऱ्यावर असलेल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले, "अशाप्रकारे कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. असा काही निर्णय घ्यायचा असेल तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेण्यास सक्षम आहेत." 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
मनसे-शिवसेना एकत्र येणार यावर थेट नकारात्मक भाष्य करण्यास दोन्हीकडून टाळण्यात आलं आहे. राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेला नव्याने उभं करण्याचं आव्हान आहे. शिंदे गट बाजूला झाल्यानंतर आणखी पडझड टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंना पराकाष्ठा करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत शिवसेना-मनसे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर ते शिवसेनेसाठी सोयीचं ठरू शकतं.
2. पाच वर्षात 12 हजार पादचाऱ्यांचा मृत्यू
बेशिस्त वाहतूक, असुरक्षित रस्ते आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे आदी कारणांमुळे राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांत प्राण गमावणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या भयावह आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात 12078 पादचाऱ्यांना अपघातांत जीव गमवावा लागला. यापैकी सर्वाधिक अपघात मुंबई आणि ठाण्यात झाले आहेत. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात ही बातमी दिली आहे.
रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे, बेशिस्त वाहनचालक, असुरक्षित रस्ते, पादचाऱ्यांचा निष्काळजीपणा ही यामागची कारणं आहेत.
गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक रस्ते अपघात मुंबई शहरात झाले असून त्यांत एक हजार पाच पादचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर ठाणे शहरात 420 पादचारी दगावले आहेत. रस्त्यांवरील अपघातांतील 100 मृतांमध्ये सरासरी 57 पादचारी असतात, असे आकडेवारीवरून निदर्शनास येते.
पदपथांवरील फेरीवाले, अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहात नाही. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी मोठ्या शहरांमध्ये स्कायवॉक आणि भुयारी मार्ग बांधण्यात आले, मात्र त्यांचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
3. हरिहरेश्वर बोट प्रकरणी घातपाताची शक्यता नाही- पोलीस
हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर शस्त्रसाठ्यासह आढळलेल्या 'लेडी हॅन' या विदेशी नौकेचा तपास पूर्ण झाला आहे. यात घातपाताचा कोणताही हेतू नसल्याचा निर्वाळा रायगड पोलिसांनी दिला आहे.
दोन महिन्यांपूर्वी ही बोट ओमानजवळच्या समुद्रातून इंजिन बंद पडल्याने भरकटली होती. त्यात एके-56 या मॉडेलच्या तीन रायफल आणि 247 काडतुसे सापडली होती. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने तटरक्षक दल, दहशतवाद विरोधी पथक, गुप्तचर विभाग, नौसेना, कस्टम, सागरी सुरक्षा पोलिस दल यांनी याचा कसून तपास केला. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
ही बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेची आहे. यावर तिचा पती कॅप्टन जॉन ग्रेटविच इतर साथीदारांसह होता. ते 26 जून रोजी मस्कतवरून युरोपच्या दिशेने निघाले होते, पण ओमानजवळ आल्यावर नौकेचे इंजिन बंद पडले. त्यामुळे नौकेवरील कर्मचाऱ्यांना जवळ असलेल्या कोरियन नौदलाच्या नौकेवर नेण्यात आले. समुद्रात भरती असल्याने ही नौका किनाऱ्यावर नेणे शक्य नव्हते. त्यामुळे ती दोन महिने समुद्रात भरकटत राहिली. 18 ऑगस्टला ती हरिहरेश्वरच्या किनाऱ्याजवळ आली.
4. युपीए व्यवहारांवर शुल्क लागू करण्याचा विचार नाही- केंद्र सरकार
युपीआय व्यवहारांवर शुल्क आकरण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. युपीआय सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या भांडवल गुंतवणुकीच्या परताव्याच्या अडचणीचं वेगळ्या मार्गाने निराकरण केलं जाईल, असं अर्थमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
युपीआयमुळे ग्राहकांना व्यवहार करणं सोपं झालं आहे, तसंच अर्थव्यवस्थेलाही हातभार लागला आहे. मागच्या वर्षीही सरकारने डिजीटल पेमेंटसाठी आर्थिक पाठिंबा दिला होता. यावर्षीही डिजीटल पेमेंटला चालना मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न असेल, असंही केंद्रीय अर्थमंत्रालयाने सांगितलं आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
देशभरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये युपीआय व्यवहार (UPI Payment) म्हणजेच डिजीटल पेमेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. मोदी सरकारनेही डिजीटल पेमेंटला चालना देणारीचं धोरणं अवलंबली आहेत, पण गेल्या काही दिवसांमध्ये युपीआय पेमेंटवर ग्राहकांना शुल्क द्यावं लागेल, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आरबीआयनेच याबाबतचे संकेत दिले होते, यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून दोन ट्वीट करण्यात आली आहेत.
5. फडणवीसांच्या आशीर्वादाने लोकसभेला विजय- नवनीत राणा
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत नव्हते पण त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत होते, त्यामुळं खासदार झाले असल्याचं वक्तव्य केलं आहे.
अपक्ष खासदार नवनीत राणांनी अमरावतीमधील दहिहंडी निमित्त आयोजित कार्यक्रमात 2019च्या लोकसभा निवडणुकीतील विषयाचं गुपित सांगितलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत नसल्यानं पराभव झाला. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
2019 ला देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत नसले तरी त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत असल्यानं लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
आमच्या विमानतळासाठी मंत्र्यांनी 75 कोटींचा निधी दिला त्याबद्दल आभार व्यक्त करत आहे. अमरावतीमधून विमानसेवा सुरु करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत करावी, असं आवाहन नवनीत राणा यांनी केलं. मेळघाटात टेक्सटाइल पार्क सुरू झालं पाहिजे, असं नवनती राणा म्हणाल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)