You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदेः गोविंदांना आरक्षणाची घोषणा, निर्णयाविरुद्ध MPSC परीक्षार्थी आक्रमक #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा. -
1. गोविंदांना क्रीडा कोट्यातून आरक्षणाची घोषणा, निर्णयाविरुद्ध MPSC परिक्षार्थी आक्रमक
दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (18 ऑगस्ट) विधानसभेत केली आहे.
तसंच दहीहंडीत सहभाग नोंदवणाऱ्या गोविंदांना क्रीडा कोट्याच्या 5 टक्के आरक्षणाचा लाभही मिळेल, अशी घोषणा शिंदे यांनी केली.
पण याच घोषणेवरून वादंग सुरू होताना दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाविरुद्ध परीक्षार्थी संघटना आक्रमक होत असून त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे.
MPSC समन्वय समिती महाराष्ट्र राज्य या परीक्षार्थ्यांच्या संघटनेने यासंदर्भात एक ट्विट करून निर्णयाचा विरोध केला.
या ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, रविकांत वर्पे, आमदार रोहित पवार, काँग्रेस नेते सत्यजित तांबे, भाजप नेते केशव उपाध्ये, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जितेंद्र आव्हाड, सीएमओ आणि रामराजे शिंदे यांना टॅग करण्यात आले आहे.
समाज अधोगतीकडे नेण्याचे मूर्तिमंत उदाहरण. दहीहंडी मधील गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देऊन सरकारची आमच्याकडून काय अपेक्षा आहे? आम्हीसुद्धा लायब्ररी सोडून भगवे झेंडे घेत दहीहंड्या फोडत फिरायचे का, असा सवाल परीक्षार्थींनी राज्य सरकारला विचारला आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.
2. 'आदित्य ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावून निवडून येऊन दाखवावं'
खंजीर खुपसणं या शब्दाची व्याख्या आदित्य ठाकरे यांनी समजून घ्यावी. त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावून पुन्हा निवडून येऊन दाखवावं, अशा शब्दांत माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं आहे.
शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
त्या म्हणाल्या, "आदित्यजी, आपण आमदार झालात तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मते मागितली होती. त्यामुळे आपल्या आमदार होण्यामागे भाजपचीही मते आहेत. त्यामुळे राजीनामा द्यायचा असेल तर तुम्हीच द्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावून निवडून येऊन दाखवा."
"गेल्या अनेक दिवसांपासून पाठीत खंजीर खुपसणं, गद्दारी, विश्वासघात हे शब्द आम्ही आपल्या तोंडून ऐकत आहोत. खरंतर या शब्दांची व्याख्या समजून घेतली तर बरं होईल. आपण महाविकास आघाडी स्थापन करून सत्तेत आला आहात. त्यामुळे मतदारांच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला असेल तर तो आपण खुपसलाय. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन रामराज्य आणायचा प्रयत्न करत आहोत," असंही शीतल म्हात्रेंनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली.
3. राष्ट्रवादीच्या दहा बड्या भ्रष्ट नेत्यांची नावे केंद्रीय तपास यंत्रणांना देणार - रणजितसिंह निंबाळकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहा बड्या भ्रष्ट नेत्यांची प्रकारणे केंद्रीय तपास यंत्रणांना देणार असल्याची माहिती माढाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली आहे.
इतकंच नव्हे तर यापैकी पाच जणांची कागदपत्रे आपल्याकडे तयार असल्याचंही निंबाळकर म्हणाले आहेत.
टेंभुर्णी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सर्वात भ्रष्ट असल्याचा आरोप यावेळी निंबाळकर यांनी केला.
सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार याना क्लिनचिट देण्यात आल्याचा आभास निर्माण केला जात आहे. पण जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असल्याचं मत नाईक-निंबाळकर यांनी मांडलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.
4. शेतकऱ्यांना डिझेलवर सबसिडी देण्याची पटोले यांची मागणी
राज्य सरकारने शेतकऱ्यांना डिझेलवर सबसिडी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
विधिमंडळातील चर्चेत नाना पटोले गुरुवारी बोलत होते. महागाईने जनता त्रस्त असून डिझेलचे दर अजूनही जास्तच आहेत. हे शेतकऱ्यांना परवडणारं नसून राज्य सरकारने डिझेलवर सबसिडी देण्याचा विचार करावा, असं पटोले म्हणाले.
जीएसटीची व्याप्ती वाढवून केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूही त्याच्या कक्षेत आणत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर जास्तच आहेत, ते कमी करण्याबाबत विचार करावा, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. ही बातमी दिव्यमराठीने दिली.
5. राज्यांची धोरणं तुम्ही आम्हाला सांगू नका, तामिळनाडूच्या मंत्र्यांची भूमिका
केंद्र सरकारने मोफत धोरणासंबंधी घेतलेल्या भूमिकेवरुन तामिळनाडूचे अर्थमंत्री पी. सिगा राजन यांनी जोरदार टीका केली आहे.
इतर राज्यांनी काय करावं हे केंद्र सरकारने का ठरवावं, असा सवाल पी. सिगा राजन यांनी केंद्र सरकारला केला.
ते म्हणाले, "तुम्ही जे बोलत आहात त्यासाठी एकतर तुमच्याकडे घटनात्मक आधार असावा किंवा तुम्ही आमच्यापेक्षा चांगले आहात असे सांगणारे तज्ज्ञ असावेत. किंवा तुमच्याकडे कामगिरीचा आढावा असावा ज्यामध्ये अर्थव्यवस्था सुधारल्याची, कर्जाचा बोझा कमी झाल्याची, रोजगारनिर्मिती केल्याची माहिती असावी. त्यानंतर आम्ही तुमचं ऐकू. पण यापैकी काहीच खरं नसताना, आम्ही तुमचं मत का ऐकावं?"
शिवाय, केंद्र सरकारच्या तुलनेत तामिळनाडूने उत्तम काम केल्याचा दावाही थिगा राजन यांनी केला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)