You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आदित्य ठाकरेः 'पाठीत खंजीर खुपसला तरी आमचे दरवाजे अजूनही खुले' #मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा. -
1. पाठीत खंजीर खुपसला तरी आमचे दरवाजे अजूनही खुले - आदित्य ठाकरे
एकनाथ शिंदे सरकारमध्ये शिवसेनेच्या निष्ठावंतांना मंत्रिपद डावलण्यात आलं आहे. त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला तरी त्यांच्यासाठी आमचे दरवाजे अजूनही खुले आहेत, असं आवाहन शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे समर्थक आमदारांना केलं आहे.
बुधवारी (17 ऑगस्ट) राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. या निमित्ताने विधीमंडळाबाहेर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, "जे गद्दार त्यांच्या सोबत गेले त्यांचा गेम कसा केला हे सर्वांनाच दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळलं आहे. 2019 मध्ये आम्ही देशाला पर्याय दिला होता. दुर्दैवाने आमच्यातूनच काही विश्वासघात करणारे गद्दार बाहेर पडले, त्यांनी एका प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीत खंजीर खुपसला आहे."
"सगळं काही देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणं ही महाराष्ट्राची, देशाची संस्कृती नाही. हे घाणेरडं राजकारण असून आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तिथं जाऊन अडकलो आहोत, नजरकैदेत आहोत, असं ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी आमचे दरवाजे अजूनही खुले आहेत. ज्यांना तिथे राहायचं असेल त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे," असंही आदित्य ठाकरे म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली.
2. भाजपच्या संसदीय मंडळातून गडकरींना वगळलं, फडणवीसांचा समावेश
भारतीय जनता पक्षाने पक्षाच्या नव्या संसदीय मंडळाची घोषणा बुधवारी (17 ऑगस्ट) केली.
नव्या संसदीय मंडळातून केंद्रीय महामार्ग आणि रस्ते परिवहमंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आलं आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संसदीय मंडळात स्थान देण्यात आल्यामुळे त्यांची या निमित्ताने राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री झाली आहे.
नव्या यादीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही वगळण्यात आलं आहे.
तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना या मंडळात स्थान देण्यात आलं असून संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचंही मंडळात पुनरागमन झाले आहे.
फडणवीस यांच्याव्यतरिक्त निवडणूक समितीमध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथसिंह, जे. पी. नड्डा, बी. एस. येडियुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इकबालसिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भूपेंद्र यादव, ओम माथूर, बी. एल. संतोष, वनथी श्रीनिवास यांचा समावेश आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
3. जयंत पाटील यांनी एसटी चालवल्यावरून नवा वाद
माजी मंत्री जयंत पाटील यांचा एसटी चालवतानाचा एक व्हीडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.
पण याच व्हीडिओमुळे जयंत पाटील यांच्याबाबत नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररित्या सांगलीतील इस्लामपूर आगाराची बस चालवली, असं म्हणत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे.
यासंदर्भात भाजपने इस्लामपूर पोलिसात तक्रारही दिल्याची माहिती समोर आली आहे.
एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना जड वाहनचालक म्हणून आवश्यक असणारा परवाना बॅच बिल्ला नसताना जयंत पाटील यांनी जड वाहन बेकायदेशीररित्या चालवलं, असा आरोप भाजपच्या इस्लामपूर येथील पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
केवळ जयंत पाटील नव्हे तर आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनीही एसटी बस चालवल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
त्याबाबत भाजपकडून तक्रार दाखल झाली किंवा नाही याची माहिती मिळू शकली नाही. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
4. लोकांची दिशाभूल करू नका, दिल्ली उच्च न्यायालयाने रामदेव बाबांना फटकारलं
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोना बरा करण्याचा दावा करत कोरोनील औषधाची निर्मिती केली होती.
पण याच मुद्द्यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने रामदेव बाबा यांना फटकारलं आहे.
अॅलोपॅथी आणि कोविड-19 च्या उपचारांबाबत योगगुरू बाबा रामदेव यांनी जनतेची दिशाभूल करू नये. तुमचे अनुयायी, शिष्य आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार्या लोकांचे स्वागत आहे. मात्र अधिकृत काहीही कोणाचीही दिशाभूल करू नये, असं उच्च न्यायालयाने रामदेव बाबा यांना सुनावलं.
कोरोना काळात कोरोनीलच्या उद्घाटनप्रसंगी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे देखील होते. त्या काळात रामदेव बाबा यांनी ऍलोपॅथी उपचारांवर टीका केली होती. त्यानंतर वरील वाद समोर आला होता. ही बातमी ई-सकाळने दिली.
5. धर्मवीर हा केवळ व्यावसायिक सिनेमा - केदार दिघे
धर्मवीर हा केवळ व्यावसायिक सिनेमा आहे. आनंद दिघे हे फक्त 3-4 लोकांमध्ये कधीच राहिले नाहीत, असं वक्तव्य त्यांचे पुतणे केदार दिघे यांनी केलं आहे.
केदार दिघे यांनी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केलं.
"आनंद दिघे यांचे चाहते संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. अनेकांच्या आयुष्यात दिघेंमुळे आमुलाग्र बदल झाले आहेत. ते 3 तासांच्या सिनेमात बसू शकत नाही. त्यांच्या आयुष्यावर वेब सिरीज बनवावी लागेल," असं केदार दिघे यावेळी म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)