अमोल मिटकरी- राज्यपाल हे भाजपाचे एजंट अन् RSS चे पूर्णवेळ कार्यकर्ते

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आढावा.

1. राज्यपाल हे भाजपाचे एजंट अन् RSS चे पूर्णवेळ कार्यकर्ते- अमोल मिटकरी

"महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे भारतीय जनता पार्टीचे एजंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. त्यांनी राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून काळी टोपी घालून पूर्णवेळ संघाचं कार्य केलं," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच महाराष्ट्र आणि मराठी माणसाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर विविध क्षेत्रातून त्यांच्यावर टीका करण्यात आली.

भाजपानंदेखील त्यांचं समर्थन केलं नाही. राजकीय दबावानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी माफीही मागितली.

मोदींमुळे भारतीयांना परदेशात मान मिळाला, या राज्यपालांच्या वक्तव्यावरही अमोल मिटकरींनी टीका केली.

"सध्याचे राज्यपाल नेहमीच वादग्रस्त विधानं करून नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, ते राजकीय पद नाही. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याने आतापर्यंत 21 राज्यपालांचा कार्यकाळ पाहिला आहे. पण भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची सूत्रं हाती घेतल्यापासून त्यांनी भाजपचे एजंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम केलं.

"त्यांच्या डोक्यावर अजूनही काळी टोपी कायम आहे. त्यांनी बहुजन समाजाच्या आराध्य दैवतांवर वारंवार अश्लील टिप्पणी करून स्वत: प्रकाश झोतात राहण्याचं काम केलं," अशीही टीका मिटकरी यांनी केली.

लोकसत्तानं ही बातमी दिलीये.

2. 'दोघांनी दिल्ली वाऱ्या करायच्या आणि बाकीच्यांनी वाट पहायची'

सचिवांना अधिकार देऊन दोघे `टिकोजीराव` दिल्ली वाऱ्या करीत आहेत. हा कसला कारभार? या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने `निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा` मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते.

राज्यात गेल्या 35 दिवसांपासून दोघेच जण कारभार करत असल्याकडे लक्ष वेधत अजित पवार यांनी म्हटलं, की "मंत्रिमंडळ स्थापन करण्यात का विलंब होत आहे? तेच समजत नाही. फुटलेल्या आमदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता येत नसावी, अशी शंका मनात येते. दोघांनी पदे घ्यायची. दिल्ली वाऱ्या करायच्या आणि बाकीच्यांनी वाट पहायची. हा कसला कारभार?"

अजित पवार यांनी म्हटलं, "सर्व विभागाच्या मंत्र्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या संबंधित सचिवांकडे सोपवल्याबाबतचा आदेश मुख्यमंत्र्यांनी चार ऑगस्टला काढला. त्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, हे काय चालले आहे? मंत्रालयाचे नाव सचिवालय करा."

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

3. शिंदे गटातील आमदार निलंबनाला पात्र- पृथ्वीराज चव्हाण

शिंदे गटाला विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही. ही घटनेतील तरतूद आहे. कुणीही साधी घटना वाचली, तरी त्यांना कळेल. दोन तृतीयांश सदस्यांनी कुठल्यातरी पक्षामध्ये विलीन झाले पाहिजे. पण, महाराष्ट्रात असं काही घडलेलं नाही, असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

टीव्ही9 मराठीनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याचं विरोधकांकडून वारंवार सांगितलं जात आहे.

याबद्दलच बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की, दहाव्या परिशिष्टाप्रमाणे पक्षांतर बंदी कायद्याची तरतूद घटनेत आहे. त्याचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळं शिंदे गटातील सर्व आमदार निलंबनाला पात्र आहेत.

4. महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांविरोधात एफआयआर

देशातील बेरोजगारी आणि महागाईविरोधात काँग्रेसने शुक्रवारी (5 ऑगस्ट) आंदोलन केलं होतं. दिल्लीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधीसह पक्षाचे अनेक नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. काँग्रेसच्या नेत्यांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला होता. मात्र हा मोर्चा रोखत पोलिसांनी या नेत्यांना ताब्यातही घेतलं होतं.

आता याच प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी (6 ऑगस्ट) काँग्रेस नेत्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे आणि त्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखणे असे आरोप काँग्रेस नेत्यांवर लावण्यात आल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटलं आहे.

5. सहिष्णू असणं म्हणजे द्वेषपूर्ण वक्तव्यंही खपवून घेणं नाही- जस्टिस चंद्रचूड

सहिष्णू असणं म्हणजे एखाद्या व्यक्तीने केलेली द्वेषपूर्ण वक्तव्यंही खपवून घेणं असा अर्थ होत नसल्याचं मत जस्टिस डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केलं आहे.

गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसोबत जस्टिस चंद्रचूड यांनी शनिवारी (6 ऑगस्ट) संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार वागण्याचाही सल्ला दिला.

सोशल मीडियाच्या मर्यादित 'अटेन्शन स्पॅन'च्या काळात आपलं काम हेच दीर्घकाळ परिणाम करणारं ठरतं. त्यामुळे आपण दैनंदिन आयुष्यातल्या लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींचा फारसा विचार केला नाही पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं.

"व्होल्टेअरनं म्हटलं होतं की, तुम्ही जे म्हणत आहात त्याच्याशी मी सहमत नसेन. पण तुमच्या मत मांडण्याच्या अधिकाराचं मी मरेपर्यंत रक्षणच करेन. आपण हीच शिकवण स्वतःमध्ये बिंबवली पाहिजे," असं चंद्रचूड यांनी या विद्यार्थ्यांना सांगितलं.

एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)