राज ठाकरे: 'बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली' - #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली - राज ठाकरे

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली. शिवसेना फुटीला दुसरं कोणतंच कारण नाही," असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केलं. झी 24 तासनं घेतलेल्या मुलाखतीवर आधारित लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

राज ठाकरे म्हणाले, "बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली. याला दुसरं कोणतंच कारण नाही. तुमची वागणूक, सगळ्या गोष्टी पैशात मोजायच्या, पैशात तोलायच्या. पक्षाकडे बघायचं नाही, लक्ष द्यायचं नाही. आजही सगळे लोक काय सांगत आहेत?"

"लोक म्हणतात आज जे सुरू आहे त्यात उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळत आहे. मला हे कळालं नाही. यात सहानुभूतीचा काय संबंध?" असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

"शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा होता आणि तो पक्ष बाळासाहेबांसोबत गेला. आताच्या शिवसेनेत बाळासाहेबांचा विचारही नाही. आजच्या पक्षप्रमुखांच्या अंगावर मराठी किंवा हिंदुत्वाच्या नावाने एक खटला तरी दाखल आहे का? त्या विषयावर मोर्चा काढला, आंदोलन केलं असं काहीच नाही. त्यांची इतकी भाषणं ऐकलीत तर बाळासाहेबांच्या तोंडातील दोन-चार वाक्य सोडली तर त्यांनी काय हिंदुत्व मांडलंय मला सांगावं," असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.

2) रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले? - चंद्रकांत खैरे

एका रिक्षावाल्याकडे एवढे कोट्यवधी रुपये कुठून आले? असा प्रश्न औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला. त्यांच्या टीकेचा निशाणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. टाईम्स नाऊ मराठीनं ही बातमी दिलीय.

खैरे पुढे म्हणाले की, "आमच्या सर्व कार्यकर्त्यांमागे ईडी लावता. मला एक आश्चर्य वाटतं 1988 च्या नंतर एक रिक्षावाला एवढे कोट्यवधी रुपये कसे जमा करु शकतो?"

युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांचा दौरा करत आहेत. या दौऱ्याअंतर्गत ते दोन दिवस औरंगाबादमध्ये होते. त्यावेळी त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या.

यातील एका सभेत बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, "आदित्यसाहेब, आपण आता ज्या मार्गाने आलात त्यावर किती लोक थांबले होते हे आपण पाहिलं असेल. ठाकरे बाहेर पडले की लगेच वलय निर्माण होतं."

3) सध्याचं राजकारण हे 100 टक्के सत्ताकारण - नितीन गडकरी

"सध्या राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? याबद्दल विचार केला पाहिजे," असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

गडकरी पुढे म्हणाले, "महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे कधी कधी आपण राजकारण कधी सोडतोय असं वाटायला लागलंय."

नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

"एखादा व्यक्ती जीवन किती जगला, यापेक्षा कसा जगला हे महत्त्वाचा आहे. माणसाच्या कर्तृत्वाचा निवडून येण्याशी काही संबंध नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येतात. राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही," असंही ते म्हणाले.

4) पंजाबमध्ये महिन्याला 300 यूनिट मोफत वीज

पंजाब महिन्याला 300 यूनिट मोफत वीज देण्याचं परिपत्रक पंजाब सरकारने जारी केले आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली.

पंजाब विधानसभा निवडणुकीवेळी आम आदमी पक्षानं 300 यूनिट मोफत विजेचं आश्वासन दिलं होतं.

यामध्ये एका बिलात 600 युनिट वीज मोफत देण्याची तरतूद आहे. पंजाबमध्ये दर दोन महिन्यांनी एकदा वीज बील येते. त्यानुसार एका बिलात 600 युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे.

मात्र, 600 पेक्षा जास्त यूनिट खर्च झाल्यास सर्व यूनिटची किंमत ग्राहकांना मोजावी लागणार आहे.

5) 2024 नंतरच्या राजकारणाची सूत्र आपल्याकडेच - रोहित पवार

येत्या काळातील राजकारणाची सूत्र ही आपल्याच हाती असतील, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार जुन्नर दौऱ्यावर होते तिथं जुन्नर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. सकाळ वृत्तपत्रानं ही माहिती दिली.

"राजकारणात येताना मी खूप पुढचा विचार करुन आलोय. पदासाठी नाही, मात्र या महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. मात्र, लांबचं राजकारण करत असताना सहकारी मित्रांना कधीच विसरणार नाही," असं म्हणत रोहित पवारांनी पुढची राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्र आपल्याच हाती येणार असल्याचं स्पष्ट संकेतच त्यांनी दिले.

"आम्ही कायम जमिनीवरच राहणार आहोत. जमिनीवर राहण्याची मागच्या पिढीचा शिकवण स्वीकारुन ती आत्मसात केली आहे. 2024 पर्यंत याच शिकवणीतून आम्ही चालणार आहोत. मात्र, 2024 नंतरचा काळ हा युवकांचा काळ आहे. युवकांचे दिवस आले की निर्णय सुद्धा आपण घेणार, यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच, पण निर्णय मात्र नवीन पिढीचे रहाणार आहेत," असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)