वेगानं जाणारी रिक्षा पोलिसांनी अडवली आणि 27 प्रवासी खाली उतरले...

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

तुम्ही जर कधी शेअर रिक्षातून प्रवेश केला असेल तर 'जरा सरकून घ्या ना,' 'थोडं अॅडजस्ट करा,' असं एकदा तरी म्हटलं असेल.

पण हे अॅडजस्ट करायचं म्हणजे किती करायचं?

उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूरमध्ये जेव्हा पोलिसांनी एक ऑटो रिक्षा थांबवली, तेव्हा त्या वाहनात 'जरा सरकून' बसलेली माणसं पाहिल्यावर तेही चक्रावून गेले. 4, 5, 8, 10, 15... तब्बल 27 प्रवासी रिक्षातून उतरले.

एका रिक्षातून पुरूष आणि लहान मुलं मिळून रिक्षातून 27 जण उतरत असल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रिक्षातून प्रवासी उतरताना पोलिस त्यांची संख्या मोजत असल्याचं व्हीडिओमध्ये दिसतंय.

ऑटो रिक्षातून तीन जण आरामशीरपणे प्रवास करू शकतात. काही वेळा सीटच्या पुढे एक फळी लावलेली असते, जेणेकरून सहा प्रवासी बसू शकतील. पण या व्हायरल रिक्षात 27 जण बसले होते.

हा व्हीडिओ उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूरचा आहे.

माध्यमांमधील वृत्तानुसार, निर्धारित वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगानं हा रिक्षा जात असल्यामुळे पोलिसांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण ड्रायव्हरनं न थांबता रिक्षा तशीच पुढे नेली. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून ही रिक्षा थांबवली.

'रिक्षात दोन डझनपेक्षा अधिक प्रवासी पाहून पोलिसांना धक्काच बसला,' फतेहपूरच पोलिस अधीक्षक राजेश कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलं.

वेगमर्यादेचं उल्लंघन आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केल्याप्रकरणी संबंधित रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर हजारो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला आहे. ट्विटरवर अनेकांनी या व्हीडिओवर विनोदी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

काही जणांनी म्हटलं की, याची 'जागतिक विक्रम' म्हणून नोंद व्हायला हवी. काही जणांनी या निमित्तानं भारतातील अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेवर बोट ठेवलं आहे.

काही वर्षांपूर्वी, मेक्सिकोचे भारतातले राजदूत दिल्लीमध्ये कारऐवजी रिक्षाने फिरले होते. त्याच्या बातम्याही झाल्या होत्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)