You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे : द्रौपदी मुर्मूंना शिवसेनेच्या पाठिंब्याचे 'हे' आहेत 3 अर्थ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतिपदासाठी भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला.
शिवसेनेतील आदिवासी समाजातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आग्रह असल्यानं आपण असा पाठिंबा जाहीर करत असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं असलं, तरी गेल्या काही दिवसातील राजकारण पाहता याचे वेगवेगळे अर्थ निघतात.
आपण या अर्थांचा आढावा या वृत्तलेखातून घेणार आहोत. तत्पूर्वी, उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंब्याची घोषणा करताना नेमकं काय म्हटलं, हे आपण जाणून घेऊ.
उद्धव ठाकरे पाठिंब्याची घोषणा करताना म्हणाले की, "गेल्या चार-पाच दिवस माझ्या शिवसेनेतल्या, विशेषत: आदिवासी समाजात काम करणाऱ्या शिवसैनिकांनी विनंती केली. एकलव्य संस्थेचे शिवाजीराव ढवले, विधानपरिषदेतील आमदार आमशा पाडवी, पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला गावित, तसंच एनटी-एसटी समाजातील कार्यकर्त्यांनी विनंती केली की, आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याची संधी मिळतेय, तर आपण पाठिंबा दिला तर आम्हाला आनंद होईल. या गोष्टींचा, विनंतीचा मान ठेवून शिवसेना राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे."
मात्र, हे पाठिंब्याची घोषणा इतक्या सहजपणे झाली का, तर गेल्या काही दिवसातलं राजकारण पाहता ते तसं दिसून येत नाही.
1. शिवसेना खासदारांचा दबावासमोर उद्धव ठाकरे झुकले?
राष्ट्रपतिपदासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर करण्याच्या आधीच शिवसेनेच्या काही खासदारांनी जाहीर भूमिका व्यक्त केली होती की, शिवसेनेनं मुर्मूंना पाठिंबा द्यावा.
शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, आदिवासी समाजातील व्यक्ती राष्ट्रपती होत असल्यास शिवसेनेनं द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा द्यायला हवा आणि उद्धव ठाकरे तसा विचार करतील याची खात्री आहे.
दुसरीकडे, शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळेंनी तर उद्धव ठाकरेंना पत्र लिहून, द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्याची मागणी केली. हे पत्र सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. त्यानंतरच खऱ्या अर्थानं खासदारांचा उद्धव ठाकरेंवर दबाव आहे का, अशा चर्चांना सुरुवात झाली.
त्यानंतर शिवसेनेच्या खासदारांनी शिवसेना भवनात बैठक झाली. या बैठकीतही द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्यासाठी खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे मागणी केल्याचे वृत्त समोर आले.
आज (12 जुलै) उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन द्रौपदी मुर्मूंना पाठिंब्याची घोषणा केली. त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, "आज मी स्वत:हून बोलतोय, कारण काही बातम्या विचित्रपणे जनतेसमोर गेल्या. स्पष्ट शब्दात सांगतो की, काल खासदारांच्या बैठकीत दबाव आणला नाही. हा निर्णय आपला आहे, आपण द्याल तो आदेश, असं सगळ्यांनी सांगितलं."
2. महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडेल?
द्रौपदी मुर्मू या भाजपप्रणित एनडीएच्या राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार आहेत, तर विरोधकांकडून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे उमेदवार आहेत.
शिवसेना सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या महाविकास आघाडीत असल्यानं यशवंत सिन्हांच्या सोबत राहील, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, द्रौपदी मुर्मूंना शिवसेनेनं पाठिंबा दिलाय.
शिवसेनेच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. याची सुरुवात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिक्रियेनंतर झालीच आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, "राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत."
"शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार?
"शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे."
"शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही," असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.
आता बाळासाहेब थोरातांनंतर शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
3. शिंदे गटासोबत चर्चेची दार उघडली?
एकनाथ शिंदे यांच्यासोबत 39 आमदारांनी शिवसेनेतून बंड केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत राहिलेल्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू केल्या. त्यानंतर हळूहळू बंडखोरांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली.
दुसरीकडे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे सातत्यानं बंडखोर आमदारांवर जहरी टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंनीही अनेकदा बंडखोर आमदारांवर टीका केली.
मात्र, नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी एकनाथ शिंदेसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचं आवाहन केलं.
एकनाथ शिंदे गटाशी उद्धव ठाकरे हे संपर्क करतील का, किंवा कसा संवाद साधतील, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात असतानाच, भाजपप्रणित एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाशी चर्चेची दारं उघडली आहेत का, असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
द्रौपर्दीमुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला.
त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे.
त्यांनीशिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणातउडी घेतली.
त्या 2000 आणि 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या.
तत्पूर्वी1997 मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून 1997 त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या.
नंतर त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली.
त्यानंतर त्या मत्स्य विभागाच्या मंत्री होत्या. 2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल होत्या.
त्या राष्ट्रपती झाल्या तर आदिवासी समुदायाला एक मोठं स्थान देशाच्या राजकारणाला मिळेल. तसंच ते नरेंद्र मोदींची प्रतिमेला उजाळा देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे करण्यात आलं आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांकडून शरद पवार, फारुख अब्दुल्ला यांचं नाव समोर आलं होतं. मात्र दोघांनीही त्याला नकार दिला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)