Monsoon Update: नागपुरात पुराच्या पाणीत गाडी वाहून गेली; तिघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील केळवद मध्ये सहा प्रवाशी असलेली स्कार्पियो कार नाल्यात वाहून गेली आहे. या सहा जणांपैकी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. तर तीन जणांचे मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. चालकाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.
केळवद पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या नांदा-छत्रापूर मार्गावर नाल्यावरुन पाणी वाहत होते. पुलावरून पाणी वाहत असतांनाही स्कॉर्पिओ चालकाने गाडी पुलावरुन काढण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने स्कार्पियो कार नाल्यात वाहून गेली.
या घटनेत आतापर्यंत एका मुलासह तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर उर्वरित तीन प्रवाशांचा कसून शोध घेण्यात येत आहे. मृत तिघेही मध्यप्रदेशातील मुलताईअंतर्गत येणाऱ्या दातूर येथील रहिवासी असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दातूर येथील सहाजण स्कार्पिओने नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नांदागोमुख येथे कार्यक्रमासाठी आले होते. मंगळवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास सर्वजण स्कॉर्पिओ परत जात होते.
नांदा छत्रापूर नाल्याला पूर आला होता. त्यानंतरही चालकाने या पुलावरुन स्कॉर्पिओ काढली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाहता पाहता स्कॉर्पिओ वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच केळवद पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी शोध घेतला असता एक मुलगा, महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. तिघांचीही ओळख पटलेली नाही. केळवद पोलीस अन्य प्रवाशांचा शोध घेत आहेत.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती ओढवल्याचं चित्र आहे. हवामान विभागाकडून सात जिल्ह्यात रेड अलर्ट तर 6 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, चंद्रपूर अशा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान
अमरावती विभागात वीज पडून गेल्या 30 दिवसांत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच मुसळधार पावसामुळे हजारो घरांची पडझड झाली असून पीकांचंही मोठं नुकसान झालं आहे.

फोटो स्रोत, PRAVEEN THACKERAY
नाशिकध्ये सप्तश्रृंगी गड येथे अतिवृष्टीमुळे पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि यात 7 भाविक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.
पालघरमध्ये जव्हार, मोखाडा या दुर्गम भागांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. जव्हार तालुक्यात वांगणी नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
शाळा बंद
नाशिकमध्ये अतिवृष्टीमुळे तूर्तास शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नाशिकमध्ये 11 जुलैपासून पहिली ते बारावीच्या शाळा बंद आहेत.

फोटो स्रोत, PRAVEEN THACKERAY
नाशिक आणि आसपासच्या परिसरातील धरणांचा साठा वाढला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर धरणाचा पाणीसाठा सध्या 66% आहे तर धरणातून 10075 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दारणा धरणात 70% पाणीसाठी असून1600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
इतर काही धरणांचाही पाणीसाठा पाहूया, ओझरखेड 97%, मुकणे 60%, भावली 74 %, वालदेवी 66%, वाघाड 96%, तर नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून 72717 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
मुंबईत सलग तीन दिवस पाऊस
मुंबई उपनगर आणि शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सायन, माटुंगा, अंधेरी, कुर्ला अशा ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे. तसंच पावसामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत आहे.
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रेल्वे सुरू आहेत मात्र पावसाचं पाणी आणि ट्रॅ्कवरील कचरा यामुळे रेल्वे उशिराने धावत आहेत.
मुंबईत आजपासून (12 जुलै) पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सलग तीन दिवस मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार आहे.
गडचिरोलीत पूरपरिस्थिती
विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (11 जुलै) गडचिरोलीत जाऊन या भागाची हवाई पाहणी केली.

या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह नागपुरात आलो असता, विभागीय आयुक्तांकडून पूर्व विदर्भातील स्थितीची माहिती घेतली, नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर गडचिरोलीकडे प्रयाण केले."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
उत्तर महाराष्ट्रातही पावसानं धुमाकूळ घातला आहे.
नाशिकमध्ये पुढील 4 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, नाशिकमधील एकूण सहा धरणांमधून 50 हजार क्युसेक्सनं जायकवाडीकडे विसर्ग सुरू आहे.
नाशिक शहरात संपूर्ण रामकुंड परिसर पाण्याखाली आहे, तर संपूर्ण जिल्ह्यात यंत्रणा सतर्क झाल्या असून 7 छोटे पूल पाण्याखाली तर 12 गावांचा संपर्क तुटला आहे.
पैनगंगा दुथडी भरून वाहतेय...
नांदेड, हिंगोली जिल्ह्यात सातत्याने बरसत असलेल्या पावसाने पैनगंगा नदी काठोकाठ भरून वाहतेय. त्यातूनच पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड इथे असलेल्या धबधब्याचे अक्राळविक्राळ स्वरूप यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच दिसतंय.
एरव्ही पावसाळ्यात एखाद्या दिवशीच धबधब्याचे असे दुर्मिळ दृश्य पहायला मिळत असते. कालपासून संततधार पावसाने सहस्त्रकुंड धबधबा आता अक्राळविक्राळ बनलाय.

नेमकं सुट्टीच्या दिवशी धबधब्याला नयनरम्य स्वरूप आल्याने पर्यटकांची इथे गर्दी होताना दिसतेय.
नंदुरबारमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस
नंदुरबार जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावत जोरदार सुरवात केली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथील आश्रमशाळेत नदीचे पाणी घुसले असून अनेक विद्यार्थ्यांना दोरीच्या साहाय्याने पाण्यातून काढत दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आहे.

नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथे जोरदार पावसामुळे देव नदी ओसंडून वाहत असून या नदीचे पाणी गावात आणि वडफडी या गावातील आश्रम शाळेत शिरले शाळा परिसर तसेच गाव परिसरातही नदीचे पाणी आल्याने सर्वत्र जलमय स्थिती पाहायला मिळत आहे.
आश्रम शाळा परिसरात जास्त प्रमाणात पाणी घुसल्याने तेथील विद्यार्थ्यांना तात्काळ दोरीच्या साहाय्याने पाण्यातून काढत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत हलवण्यात आले तर काही विद्यार्थी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर थांबले आहेत.
नंदुराबरमधील धाडगाव आणि अक्कलकुवा तालुका हे अति दुर्गम डोंगराळ भाग असून या भागात पावसाळ्यात पायाभूत सोयी सुविधांची कमतरता अधिक तीव्रपणे लक्षात येते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























