गुजरातचे सिंह आता समुद्र किनाऱ्यावर का येत आहेत?

    • Author, रॉक्सी गागडेकर छारा,
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

गुजरात राज्याच्या किनारी भागात आता 100 हून अधिक सिंह आहेत. सिंहांचा नैसर्गिक अधिवास कमी होत चालला असल्याचं हे निदर्शक आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

गुजरातमधील गीर अभयारण्य हे आशियातल्या सिंहाचं एकमेव नैसर्गिक अधिवास आहे.

गुजरात वन विभागाच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये इथं जवळपास 400 सिंह होते. उर्वरित राज्यात जवळपास 275 सिंह आहेत, त्यापैकी 104 सिंह हे गुजरात किनारपट्टीच्या 300 किलोमीटर परिसरात वास्तव्यास आहेत.

सिंहांचा नैसर्गिक अधिवास कमी होत चालल्यामुळे अशाप्रकारे सिंह असामान्यपणे हालचाल करत आहेत, असं निसर्ग संवर्धकांचं म्हणणं आहे.

"सर्वसाधारणपणे सिंहांना किनारपट्टीच्या अधिवासाशी जुळवून घेणं अवघड जातं, पण जमिनीच्या कमतरतेमुळे त्यांच्याकडे पर्याय नसतो," असं वन्यजीव अभ्यासक डॉ. निशिथ धारिया म्हणतात.

एकेकाळी संपूर्ण गुजरातमध्ये सिंह पसरले होते, पण शिकार आणि दुष्काळ या प्रमुख कारणांमुळे 20 व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांची संख्या केवळ काही डझनवर आली.

तेव्हापासून करण्यात आलेल्या संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे सिंहांची संख्या ही गीर अभयारण्यात वाढण्यास मदत झाली आहे. असं असलं तरी, प्रादेशिक प्राण्यांसाठी गीर अभयारण्य खूपच लहान झाल्याचं अनेक तज्ज्ञ वर्षानुवर्षं सांगत आहेत.

प्रांतांतील संघर्षामुळे सिंह 1990 च्या दशकात किनारपट्टीच्या प्रदेशात यायला लागले, असं वनाधिकारी सांगतात.

"सिंहाला साधारणपणे 100 चौरस मीटर क्षेत्राची आवश्यकता असते आणि यामध्ये तीन-चार सिंहीणींचाही समावेश असतो. ते तिथं त्यांच्या छाव्यासह राहतात. जसजसा छावा मोठा व्हायला लागतो, तो एकतर जुन्या सिंहाकडून तो प्रदेश ताब्यात घेतो किंवा नवीन प्रदेश शोधतो," असं गुजरातचे उच्च वनाधिकारी श्यामल टिकादार सांगतात.

सिंह किनारी भागात पोहोचतात कारण ते हिरण नदीच्या मार्गातून येतात. ही नदी गीर अभयारण्यातून जाते आणि सोमनाथ जिल्ह्यात अरबी समुद्राला मिळते.

उदय शाह यांचे वेरावळ जिल्ह्यात समुद्राजवळ फार्महाऊस आहे. ते गीर अभयारण्यापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांना आता समुद्रकिनाऱ्यावर नियमितपणे सिंह पाहण्याची सवय झाली आहे.

"सिंह पाहिल्यावर आम्ही सुरुवातीला घाबरलो होतो, पण आता ते आम्हाला त्रास देत नाहीत," असं ते सांगतात.

वेरावळ परिक्षेत्राचे वनाधिकारी एच.डी गलचर सांगतात, "गेल्या काही वर्षांपासून समुद्रकिनाऱ्याजवळ जवळपास सात सिंहांचा कळप राहत आहे. किनारपट्टीच्या प्रदेशात सिंहांच्या संख्येत वाढ झाल्याचं लक्षात आल्यानंतर इथं वनविभागानं झाडे (deciduous gum arabic trees) लावायला सुरुवात केली."

वेरावळ किनारपट्टीसमोर झाडी असलेला एक पट्टा आहे. इथे हा सिंहांचा कळप राहतो. हा परिसर काहीसा गीरच्या जंगलाशी मिळताजुळता असल्याने त्यांनी इथे आसरा घेतलाय.

काहीवेळा हे सिंह किनारपट्टी आसपासच्या आरक्षित जंगलात रानडुकरं आणि निलगायीची शिकार करतात.

पण, जेव्हा त्यांना शिकार मिळत नाही, तेव्हा मात्र ते जवळच्या गावात जाऊन शेळ्या आणि गायींची शिकार करतात.

सोमनाथ जिल्ह्यातील हिरण नदीजवळ आंब्याचे शेत असलेले नाथा परमार सांगतात की, सिंहांनी गेल्या काही वर्षांत त्यांच्या 10 वासरांना मारलं आहे.

ते आणि इतर गावकरी यामुळे सुरुवातीला संतप्त झाले होते. पण नंतर यातून अनपेक्षित फायदा झाल्याचा त्यांच्या लक्षात आलं.

"पूर्वी आम्हाला रानडुक्कर आणि नीलगायींच्या कळपांचा सामना करावा लागत होता. कारण ते आमच्या सर्व पिकांचे नुकसान करत होते. आता हे प्रमाण जवळजवळ थांबलं आहे," परमार सांगतात.

ते आणि इतर शेतकरी आता सिंहांसोबत सावधपणे आणि आदराने जगायला शिकत आहेत. सिंहांनी आतापर्यंत या भागातील कोणत्याही माणसावर हल्ला केला नाही, यासाठी हे असं वर्तन मदत करत आहे.

"जेव्हा आपण सिंहांच्या क्षेत्रात जातो, तेव्हा आपण एकतर जागेवरच थांबावं, त्यांच्यासाठी रस्ता करून द्यावा किंवा मग त्यांना त्रास न देता आपला मार्ग बदलावा," असं परमार पुढे सांगतात.

झिनाभाई हे वनविभागासाठी नियमितपणे किनारी भागात सिंहांचा मागोवा घेत असतात. ते सांगतात की, गीर अभयारण्यातील आसपासच्या प्रदेशातील माणसांप्रमाणेच या प्रदेशातील लोकही सिंहांशी जुळवून घेण्यासाठी त्यांची जीवनशैली बदलत आहेत.

"कधीकधी सिंह शिकार करण्यासाठी जवळच्या जंगलात किंवा निवासी भागात जातात. पण, नंतर ते विश्रांतीसाठी इथं परत येतात. त्यांनी या अधिवासाशी जुळवून घेतलं आहे," झिनाभाई पुढे सांगतात.

गुजरातमधील सिंहांनी परिस्थितीनुसार अधिवासातील बदलांशी जुळवून घेतलं आहे, असं वन्यजीव तज्ज्ञ राजन जोशी सांगतात.

सिंहांनी गीरमध्ये माणसांच्या जवळ आणि मोकळ्या मैदानात राहण्याची सवय करून घेतली होती. आता हेच प्रमाण राज्यात इतरत्र हळूहळू वाढत आहे, असं जोशी सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)