एकनाथ शिंदे गटातील आमदार म्हणतात, 'सोमय्यांनी उद्धवसाहेबांबद्दल जपून बोलावं, अन्यथा...' #5मोठ्याबातम्या

संजय गायकवाड

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, फडणवीस आणि शिंदेंसोबत संजय गायकवाड
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. शिंदे गटातील आमदार म्हणतात, 'सोमय्यांनी उद्धवसाहेबांबद्दल जपून बोलावं, अन्यथा...'

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवायला सुरुवात केलीय.

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर केलेल्या ट्वीटमध्ये सोमय्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख 'माफिया' असा केला. यावरून शिंदे गटातील आमदार नाराज झाले आहेत.

आधी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकरांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता बुलडाण्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाडांनीही नाराजी व्यक्त केलीय. झी 24 तासनं ही बातमी दिलीय.

संजय गायकवाड म्हणाले की, " बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये. ते खपवून घेणार नाही. अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही."

आधी दीपक केसरकर आणि आता संजय गायकवाडांच्या या टीकेनंतर शिंदे गटातील नाराजी दिवसागणिक समोर येताना दिसतेय.

2. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर शिवसेना संपेल हे पवारांना माहित होतं - महाजन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शिवसेना संपवायची होती, असा आरोप भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.

"शरद पवारांना माहित होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले की शिवसेना संपेल आणि त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री केलं," असं गिरीश महाजन म्हणाले.

शरद पवार

फोटो स्रोत, Twitter

"आज शिवसेनेवर वाईट दिवस आलेत, आमच्यासोबत शिवसेना राहिली असती, मान-सन्मानाने राहिली असती. पुढच्या वेळी 60-70 आमदार निवडून आले असते. आम्ही निवडून आणले असते. महाविकास आघाडीसोबत जाणं ही राजकीय आत्महत्या आहे," असंही गिरीश महाजन म्हणाले.

3. पुढचे पाच महिने वीज महागणार

कोळशाच्या दरवाढीचा आणि उन्हाळ्यातील महाग विजेचा वाढीव खरेदीखर्च समायोजन आकारातून वसूल करण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगानं मंजुरी दिलीय. त्यामुळे जुलै ते नोव्हेंबर असे चार माहिने वीजग्राहकांना दरवाढीचा भार सोसावा लागणार आहे.

या महिन्यापासून महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांवर 65 पैसे ते 2.35 रुपये प्रति युनिट, अदानीच्या ग्राहकांवर सरासरी 92 पैसे प्रति युनिट, तर टाटाच्या वीज ग्राहकांवर 1.05 रुपये प्रति युनिट असा बोजा पडणार आहे.

चालू महिन्यापासूनच म्हणजे जुलै महिन्यापासूनच ही दरवाढ पुढील चार महिन्यासाठी लागू करण्यात आलीय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

4. पाच वर्षांनंतर देशातून पेट्रोल हद्दपार होईल - नितीन गडकरी

गेल्या अनेक महिन्यांपासून देशात महागाई वाढली आहे. इंधनाचे दर आभाळाला भिडले आहेत. या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

पुढील पाच वर्षांनंतर देशातून पेट्रोल हद्दपार होईल, असं गडकरी म्हणाले. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

नितीन गडकरी

फोटो स्रोत, Twitter

"पेट्रोलऐवजी वाहनं हायड्रोजन, फ्लेक्स इंधन, इथेनॉलवर चालतील," असं गडकरींनी म्हटलं. ते अकोल्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 36 व्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते.

"विदर्भात बायोडिझेलचं उत्पादन होतं. त्याचा वापर वाहनांमध्ये केला जाईल. ग्रीन हायड्रोजन, इथेनॉलचा वापर स्कूटर, कारमध्ये करण्यात येईल. विहिरीतील पाण्याचा वापर करून हायड्रोजन तयार करता येऊ शकतो. त्याची किंमत प्रतिकिलो 70 रुपये असेल. त्यामुळे पुढील 5 वर्षांनंतर देशातून पेट्रोल हद्दपार होईल," असं भाकीत गडकरींनी वर्तवलं.

5. टेलिकॉम क्षेत्रात अदानी ग्रुपच्या एन्ट्रीची चर्चा

उद्योगपती गौतम अदानी यांचा उद्योगसमूह आता टेलिकॉम क्षेत्रातही पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. इकोनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिलीय.

गौतम अदानींनी टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवल्यास त्यांची थेट स्पर्धा उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ आणि सुनील भारती मित्तल यांच्या एअरटेलसोबत असेल.

जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन या तीन खासगी कंपन्या सध्या टेलिकॉम क्षेत्रात आपला दबदबा राखून आहेत. यात अदानी उतरल्यास टेलिकॉम क्षेत्रात ती मोठी घटना असेलच, मात्र कंपन्यांमधील स्पर्धाही कैकपटीने वाढण्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी व्यक्त करतायेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)