नंबी नारायणन: इस्रोच्या या नामवंत शास्त्रज्ञावर जेव्हा रॉकेट तंत्रज्ञान पाकिस्तानला विकल्याचा आरोप झाला होता…

    • Author, सौतिक विस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

कल्पना करा! एका नाट्यमय घटनेनं तुमचं आयुष्य बदलू शकतं. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या एका नामवंत शास्त्रज्ञाच्या बाबतीत हे खरंच घडलं आहे. 25 वर्षांपूर्वी त्यांच्या राहत्या घरी पोलीस आले. आणि…

तो क्षण

25 वर्षांपूर्वी हिवाळ्यातल्या एका दुपारी त्रिवेंद्रमच्या एका चिंचोळ्या गल्लीतल्या त्यांच्या राहत्या घरी तीन पोलीस शिपाई आले. पोलीस त्यांच्याशी सौजन्याने वागत होते. पोलिसांनी नारायणन यांना सांगितलं की, उपमहानिरिक्षकांना त्यांच्याशी बोलायचं होतं.

'मला अटक झालीय का?' त्यांनी पोलिसांना विचारलं.

तो दिवस होता 30 नोव्हेंबर 1994. 53 वर्षीय नंबी नारायणन तेव्हा भारतीय अंतराळ संस्था अर्थात, इस्रोच्या क्रायोजेनिक रॉकेट इंजिन विभागाचे प्रमुख होते. रशियाकडून त्यासाठीचं तंत्रज्ञान मिळवणं ही त्यांची जबाबदारी होती.

नारायणन निमूटपणे पोलिसांच्या मागून त्यांच्या गाडीपर्यंत गेले. मी पुढे बसायचंय की मागे, त्यांनी पोलिसांना विचारलं. कारण, साधारणपणे गुन्हेगाराला मागच्या बाजूला बसवण्यात येतं.

पण, यावेळी पोलिसांनी त्यांना पुढे बसायला सांगितलं. ते बसल्यावर जीप तिथून निघाली. आणि थेट पोलीस ठाण्यात पोहोचली.

पोलीस ठाण्यात उपमहानिरीक्षक अजून आलेले नव्हते. त्यामुळे एका बाकड्यावर नारायणन यांना बसवण्यात आलं. जाता येता प्रत्येक पोलीस शिपाई त्यांच्याकडे विचित्र नजरेनं बघत होता. 'त्यांची नजर अशी होती, जसं की ते एका गुन्हेगाराकडे बघत आहेत,' नारायणन यांनी बीबीसीशी तेव्हाचा अनुभव सांगितला.

त्यानंतर नारायणन तिथंच बाकड्यावर वाट बघत बसले. पण, तो अधिकारी आलाच नाही. रात्री ते तिथंच बाकड्यावर झोपी गेले. सकाळी उठल्यावर त्यांना अधिकृतपणे कळवण्यात आलं की, त्यांना अटक झाली आहे.

बाहेर काही पत्रकार जमले होते. काही काही तासातच वर्तमानपत्रांमध्ये मजकूर झळकला - नारायणन यांनी देशाशी गद्दारी केलीय. मालदीवच्या दोन महिलांच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकून त्यांनी रॉकेट तंत्रज्ञान पाकिस्तानला विकल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

या दिवसानंतर त्यांचं आयुष्यच बदललं.

त्यापूर्वी

एका मध्यमवर्गीय कुटुंबात पाच मुलींनंतर नंबी नारायणन यांचा जन्म झाला. त्यांचे वडील उद्योजक होते. आणि नारळाचा गर विकण्याचा त्यांचा उद्योग होता. आई पूर्ण वेळ गृहिणी होती.

नंबी विद्यार्थी दशेत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे. आणि वर्गात कायम पहिले यायचे. पुढे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी एका साखर कारखान्यात काम सुरू केलं. पण, त्यानंतर भारतीय अंतराळ संस्थेत त्यांनी नोकरी पत्करली. 'मला कायमच विमान आणि उडणाऱ्या गोष्टींबद्दल कुतूहल होतं,' हे सांगताना आताही नारायणन यांचे डोळे चमकतात.

इस्रोमध्ये भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे अर्ध्वयू आणि महत्त्वाचे संशोधक विक्रम साराभाई, सतिश धवन आणि अब्दुल कलाम यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. यापैकी विक्रम साराभाई हे संस्थेचे संस्थापक आणि पहिले प्रमुख. तर सतीष धवन त्यांच्या मागून प्रमुख झालेले. आणि अब्दुल कलाम संस्थेचे अकरावे प्रमुख.

इस्रोमध्ये नारायणन यांनी चांगली प्रगती केली. आणि प्रिन्सटन विद्यापीठाची मानाची शिष्यवृत्तीही त्यांनी मिळवली. तिथे त्यांनी रॉकेट प्रोपल्शन प्रणालीचं अद्ययावत शिक्षण घेतलं. एका वर्षानंतर जेव्हा मायदेशी परतले तेव्हा इस्रोमध्ये काम त्यांनी पुढे सुरू केलं.

"मी इस्रोमध्ये कामाला सुरुवात केली तेव्हा संस्था अगदीच बाल्यावस्थेत होती. रॉकेट प्रणाली विकसित करण्याची योजनाही तेव्हा आखलेली नव्हती. आपण अमेरिका किंवा फ्रान्सकडून रॉकेट्स विकत घेण्याच्या प्रयत्नात होतो," नारायणन यांनी बीबीसीला सांगितलं.

पण, अखेर भारताने देशातच रॉकेट्स बनवण्याचा निर्णय घेतला. आणि या प्रकल्पाची धुरा इस्त्रोनं नारायणन यांच्यावर सोपवली.

ही जबाबदारी त्यांनी नोव्हेंबर 1994 पर्यंत निभावली. त्यानंतर मात्र त्यांचं आयुष्य बदललं.

नारायणन यांना अटक करण्यापूर्वी एक महिना आधी केरळ पोलिसांनी एका मॉलदीवच्या तरुणीला पकडलं होतं. मरियम रशिदा ही युवती व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतातच राहिली होती. काही आठवड्यांनंतर त्यांनी रशिदाची मैत्रीण फौजिया हसन हिला अटक केली. फौजिया बँक अधिकारी होती. आणि मालदिवची राजधानी मालेमधून रशिदाला भेटायला आली होती. त्यानंतर एक विचित्र कट उघड झाला.

पोलिसांमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्तमानपत्रं रकानेच्या रकाने भरून याविषयी लिहित होती. त्यांच्या मते, या महिला हेर होत्या. भारतातील रॉकेट तंत्रज्ञान चोरून ते पाकिस्तानला विकण्याची मोहीम त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यासाठी हनीट्रॅप म्हणून या महिलांचा वापर झाला होता.

पोलिसांचा असा दावा होता की, आणखी काही शास्त्रज्ञांबरोबरच नारायणनही या मुलींच्या खोट्या प्रेम जाळ्यात अडकले होते.

तुम्हाला गुन्हा मान्य आहे का?

त्यांना अधिकृत अटक झाल्यानंतर पहिल्याच दिवसी कोर्टात हजर करण्यात आलं. तेव्हाचा अनुभव बीबीसीला सांगताना ते म्हणाले, "न्यायाधीश मला कोर्टात विचारत होते, तुम्हाला गुन्हा मान्य आहे का? मी म्हटलं, कसला गुन्हा?"

"यावर न्यायाधीश म्हणाले, गुन्हा हा की, तुम्ही तंत्रज्ञान हस्तांतरित केलं. यावर मी सांगितलं की, असं तंत्रज्ञान कागदांच्या देवाणघेवाणीने हस्तांतरित होत नाही." मला काय सुरू आहे कळतच नव्हतं, असं त्या दिवसाची आठवण काढताना नारायणन सांगतात.

शेवटी न्यायाधीशांनी त्यांना अकरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्या काळात सगळीकडे प्रसिद्ध झालेलं एक चित्र, जे सगळ्या वर्तमानपत्रांनी छापलं होतं, ज्यात हा शास्त्रज्ञ काळा शर्ट आणि करड्या रंगाची विजार घालून कोर्टातून बाहेर पडत होते. त्यांच्या अवती भोवती अर्थातच पोलीस होते.

"मी अजूनही धक्क्यात होतो. आणि काही समजण्या पलीकडे होतो. एके क्षणी तर मला वाटलं, ही चित्रपटाची कथा सुरू आहे आणि माझी भूमिका मध्यवर्ती आहे." नारायणन यांनी त्या प्रसंगाचं वर्णन आपल्या पुस्तकात केलं आहे.

पुढच्या काही महिन्यांत त्यांची प्रतिष्ठा आणि नावलौकिक धुळीला मिळाला. त्यांच्यावर भारताची राष्ट्रीय गुपितं फोडल्याचा आणि लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला. पौलीस चौकशीत त्यांना मारहाण झाली. आणि खाटेला बांधून राहावं लागलं. सलग तीस तास त्यांची चौकशी सुरू असताना त्यांना उभंच ठेवण्यात आलं, बसू दिलं गेलं नाही. भारतीय कोर्टात लाय डिटेक्टर चाचण्यांचे अहवाल गृहित धरले जात नाहीत. तरीही त्यांच्या अगणित लाय-डिटेक्टर चाचण्या घेण्यात आल्या.

काही दिवसांनी त्यांना कडक सुरक्षा असलेल्या तुरुंगात ठेवण्यात आलं. तिथं त्यांच्याबरोबर एक सीरियल कीलर होता, ज्याने लोकांना जबर मारहाण करून त्यांचा जीव घेतला होता. (या कैद्याने नारायणन यांना सांगितलं की, तो खटल्याविषयी नियमितपणे वाचत होता. आणि त्याला वाटायचं की, नारायणन निर्दोष आहेत.)

नारायणन पोलिसांना सांगत राहिले की, 'रॉकेट तंत्रज्ञान असं कागदावर लिहून हस्तांतरित होऊ शकत नाही. आणि त्यांना यात गोवण्यात आलं आहे.' भारताकडे पुरेसं रॉकेट तंत्रज्ञानही अजून नव्हतं, असं ते सांगत राहिले. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. पोलिसांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही.

शेवटी नारायणन यांना 50 दिवस कोठडीत घालवावे लागले. यातला एक महिना तर ते तुरुंगाच होते. जेव्हा जेव्हा त्यांना सुनावणीसाठी तुरुंगात नेलं जायचं तेव्हा बाहेर जमाव जमलेला असायचा. त्यांच्या घोषणा सुरू असायच्या, 'हा इसम हेर आहे, देशाचा गद्दार आहे.'

पण, नारायणन यांच्या अटकेनंतर एका महिन्यांत हा खटल्याची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित झाली. त्यांच्याकडे बाजू मांडताना नारायणन यांनी सांगितलं की, 'इस्रोमध्ये त्यांच्याकडे असलेली माहिती ही मुळातच गुप्त माहिती नव्हतीच.' त्यांची चौकशी करणाऱ्या एका अधिकाऱ्याने एकदा त्यांना सांगितलं, 'हा खटला इतका मोठा कसा झाला तेच कळत नाही. आम्ही तुमचे अनंत अपराधी आहोत.' कारण, नारायणन यांच्याविरोधात पुरावेच सापडले नाहीत.

शेवटी 19 जानेवारी 1995 ला त्यांना जामीन मिळाला. आणि मध्यरात्र होण्याच्या थोडं आधी ते आपल्या घरी परतले. वरच्या खोलीत ते आपल्या पत्नीपाशी गेले. त्या अंधाऱ्या खोलीत जमिनीवरच झोपल्या होत्या. दोनदा हाका मारल्यावर त्या उठल्या. "ती हळूच वळली. डोकं वर केलं आणि स्तब्धपणे माझ्याकडे बघत राहिली. माझ्या डोळ्यात बघत राहिली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव विचित्र होते. मी काहीतरी भयानक करतोय, असं ती माझ्याकडे बघत होती." नारायणन यांना तो दिवस लख्ख आठवतो.

'आणि त्यानंतर ती अशा आवाजात किंचाळली की, मी माणूस काय प्राण्याकडूनही असा आवाज कधी ऐकला नव्हता.'

अख्खं घर तिच्या रडण्याच्या आवाजाने कापलं. आणि नंतर ती एकदम गप्प झाली.

नवऱ्याला झालेली अटक आणि नंतर त्यांचं जवळ नसणं याचा खूप विपरित परिणाम मीनाक्षी अम्मल यांच्या मानसिक अवस्थेवर झाला होता.

दोघांच्या लग्नाला तीस वर्षं झाली होती. त्यांना दोन मुलं होती. पण, या पापभीरू, देवभोळ्या बाईने नवऱ्याला अटक झाल्यानंतर बाहेरच्या जगाशी संबंधच तोडला होता. त्या नैराश्याच्या गर्तेत गेल्या. आणि लोकांशी बोलणंही त्यांनी बंद केलं.

नारायणन यांच्याबरोबर आणखी पाच जणांवर हेरगिरी, तंत्रज्ञान पाकिस्तानकडे हस्तांतरित केल्याचा आरोप झाला. इस्रोमधले त्यांचे एक सहकारी डी. ससिकुमारन, हनीट्रॅपचा संशय असलेल्या रशिदा आणि तिची मैत्रीण (या दोघींना नारायणन अटकेपूर्वी कधीही भेटले नव्हते.), रशियन अंतराळ संस्थेचा एक अधिकारी आणि एक कंत्राटदार.

महत्त्वाच्या तारखा

1994 - नारायणन यांना अटक आणि कोठडीत रवानगी, जानेवारी 1995मध्ये मिळाला जामीन

1996 - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे प्रकरण हस्तांतरित

1998 - केरळ सरकारचं अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं

2001 - केरळ सरकारने नुकसान भरपाई देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

2018 - बनावट खटला का उभा राहिला याची चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

1996मध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आपला 104 पानांचा तपास अहवाल सादर केला. यात त्यांनी पाचही आरोपींविरोधात पुरावे नसल्याचं स्पष्ट केलं.

त्यांच्या अहवालात म्हटलं होतं, "अंतराळ संस्थेतून कुठलाही गुप्त दस्तावेज चोरीला गेल्याचे किंवा त्याची प्रत बनवल्याचे पुरावे सापडले नाहीत. संस्थेअंतर्गत झालेल्या तपासातही एखादं डिझाईन गहाळ झाल्याचं किंवा पैशाची देवाण घेवाण झाल्याचं आढळलं नाही."

सुटका झाल्यानंतर नारायणन इस्रोमध्ये पुन्हा काम करायला लागले. पण, यावेळी ते प्रशासकीय विभागात रुजू झाले. त्यांचे भोग मात्र अजून भोगायचे होते. राज्य सरकारने हा खटला पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पण, 1998मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही हा खटला निकालात काढला.

नारायणन यांनी आपल्याला कारणाशिवाय बदनाम केल्याचा दावा केरळ सरकारवर ठोकला. त्यासाठी त्यांना नुकसान भरपाई म्हणून पन्नास लाख रुपये देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. केरळ सरकारने गेल्यावर्षी त्यांना अतिरिक्त तेरा लाख रुपये देऊ केले. कारण, त्यांना झालेली अटक आणि कोठडीत झालेला छळ बेकायदेशीर होता. त्याची ही भरपाई होती.

पण, ही कहाणी इथंच संपत नाही. कारण, 78 वर्षीय नंबी नारायणन यांना ती इथंच संपवायची नाही. 2018मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा बनावट खटला सुरू करण्यात केरळ सरकारची काय भूमिका होती याची चौकशी करण्याचे आदेश दिले. आता नारायणन या चौकशीच्या अहवालाची वाट बघत आहेत. 'मला कारणाशिवाय यात गोवणाऱ्या लोकांना शिक्षा होताना मला पाहायचंय. एक अध्याय संपला असला तरी दुसरा आता कुठे सुरू होतोय.' त्यांनी बीबीसीला सांगितलं.

नारायणन यांच्याविरोधात हा कट कुणी आणि कशासाठी रचला हे अजूनही गुलदस्त्यात आहे. यात खरंच कट होता की, नारायणन यांना वाटतं त्याप्रमाणे एखाद्या विरोधक देशाने आपल्या देशातील अंतराळ कार्यक्रमाला खीळ बसावी यासाठी केलेला प्रयत्न होता? भारताने तोपर्यंत व्यावसायिक उपग्रह निर्मिती क्षेत्रात आपले पाय रोवले होते. त्यामुळे व्यथित झालेल्या प्रतिस्पर्धी देशांनी तर ही चाल खेळली नाही ना? कारण, भारत कमी खर्चात उपग्रह निर्मिती करू शकत होता. भारतातील भ्रष्ट यंत्रणेनं या कटाला जन्म दिला होता ही शक्यताही नाकारता येत नाही.

'एका कटातून या सगळ्याचा जन्म झाला. पण, तो रचणारे वेगळे होते आणि त्यांचे हेतूही वेगळे होते. पण, त्याला बळी पडणारे लोक मात्र आम्ही ठरलो.' नारायणन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

'जे काही असेल, माझी कारकीर्द, प्रतिष्ठा, आनंद सगळं नाहीसं झालं. आणि यासाठी जबाबदार असलेले लोक अजूनही मोकळे फिरतायत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)