You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना दिलासा
राज्यात सत्तांतराचं नाट्य सुरू असतानाच मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेल्या उद्धव ठाकरेंना CBI कडून एक मोठा दिलासा मिळाला आहे.
उद्धव ठाकरेंचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना आरोपी बनवण्यात आलेल्या प्रकरणी सीबीआयनं सादर केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टानं मान्य केला आहे.
त्यामुळे या प्रकरणातील तपास थांबवण्यास सेशन्स कोर्टाने विशेष सीबीआय कोर्टानं केंद्रीय तपासयंत्रणेला हिरवा कंदील दाखवलाय.
चंद्रकांत पटेल यांच्याशी संबंधित पुष्पक बुलियनवरील आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपात हे प्रकरण समोर आलं होतं.
नोटबंदीच्या काळात बुलियन कंपनी आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यात झालेले काही व्यवहार चौकशीच्या रडारवर होते. तब्बल 84.6 कोटींच्या नोटा पुष्पक बुलियनच्या विविध खात्यात जमा करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर यातून सोनं खरेदी करून हा काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याच खात्यातील काही रक्कम श्रीधर पाटणकर यांच्या 'श्री साईबाबा गृहनिर्मिती' या कंपनीत वळवण्यात आल्याच्या नोंदी आहेत.
याच पैशातून कंपनीच्या मार्फत पाटणकर यांनी ठाण्यातील 'निलांबरी' सोसायटीत 11 सदनिका विकत घेतल्याचा आरोप करत सीबीआयनं साडे सहा कोटींची ही मालमत्ता जप्त केली होती.
याप्रकरणी तपासाअंती आरोपींविरोधात कोणतेही पुरावे सापडत नसल्यानं हा तपास बंद करत असल्याचा अहवाल सीबीआयच्यावतीनं कोर्टात सादर करण्यात आला.
या रिपोर्टला ईडीने विरोध केला होता. आमचाही तपास याच दिशेनं सुरूय त्यामुळे हा रिपोर्ट स्वीकारल्यास आमच्या तपासावरही थेट परिणाम होईल असा दावा करण्यात आला.
मात्र मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ए. एस सय्यद यांनी हा दावा फेटाळून लावला.
यापूर्वी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये काही त्रुटी होत्या, त्यामुळे आम्ही तो अमान्य केला होता. मात्र आता आमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तपासयंत्रणेने दिली आहेत, त्यामुळे दोघांनी एकाच प्रकरणाचा तपास करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही असं निरिक्षण कोर्टानं नोंदवलं आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
6 मार्च 2017 रोजी PMLA कायद्याअंतर्गत पुष्पक ग्रुपविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला होता.
अंमलबजावणी संचलनालया (ED) ने श्रीधर माधव पाटणकरांवरील कारवाईबाबत पत्रक काढून माहिती दिली होता.
ईडीच्या माहितीनुसार, पुष्पक ग्रुपची 6.45 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील 11 रहिवासी फ्लॅट्सचा समावेश आहे.
निलांबरी प्रकल्प श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे असून, याचे मालक श्रीधर माधव पाटणकर हे आहेत.
कोण आहेत श्रीधर पाटणकर?
श्रीधर पाटणकर व्यवसायाने बिल्डर आहेत. मुंबई आणि ठाण्यात त्यांचं प्रामुख्याने काम असल्याची माहिती आहे. मुंबईत वांद्रे आणि डोंबिवलीमध्ये ते राहात असल्याची माहिती मिळतेय.
कॉर्पोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवरून मिळालेली माहिती
सामवेद रिअल इस्टेट एलपीपी या कंपनीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि श्रीधर पाटणकर यांचं नाव संचालक म्हणून आहे.
आशर प्रोजेक्ट डीएम एलपीपी या कंपनीमध्येही श्रीधर पाटणकर यांचं नाव संचालक म्हणून रजिस्टर आहे
तर ठाकोर लॅंड डिव्हेलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत श्रीधर पाटणकर 2015 पासून संचालक म्हणून कार्यरत आहेत
ईडीने प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलीजमध्ये दावा करण्यात आलाय की, श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची असून त्यांच्या ताब्यात आहे.
कॉर्पोरेट मंत्रालयाच्या वेबसाईटवर मिळालेल्या माहितीत श्रीधर पाटणकरांचं नाव श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांच्या यादीत दिसलं नाही.
श्रीधर पाटणकर यांच्यावर करण्यात आलेली कारवाई मनी लॉंडरिंगच्या एका प्रकरणात करण्यात आलीये. ईडीने पुष्पक बुलियन नावाच्या कंपनीवर मनी लॉंडरिंगचा गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी 21 कोटी रूपयांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली होती.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पुष्पक ग्रुपचे मालक महेश पटेल आणि चंद्रकांत पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांनी पैशांची अफरातफर करून तो पैसा नंदकुमार चतुर्वेदी यांच्या मदतीने इतर कंपन्यांमध्ये गुंतवला होता.
नंदकुमार चतुर्वेदी यांनी हा पैसा आपल्या कंपनीच्या मदतीने श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीत गुंतवल्याचा ईडीचा आरोप आहे.
श्रीधर पाटणकर यांचे शिवसेनेच्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण याबाबत कोणीच उघडपणे बोलण्यास तयार नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)