एकनाथ शिंदे यांच्या मूळ गावात शाळा, हॉस्पिटल नाही, पण 2 हेलिपॅड आहेत, #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Eknath shinde/facebook
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी आपल्या अस्तित्वासाठी लढताना दिसत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडखोरीचा झेंडा रोवणारे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जवळपास 37 आमदारांसह गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये आहेत. शिवसेनेचा एक गट एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असला तरी कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग त्यांच्यावर नाराज आहे. असे असतानाही साताऱ्यातील दरे या मूळ गावातील लोकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार स्थानिकांना आशा आहे की, आगामी काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारू शकतील.
एकनाथ शिंदे यांचे वडिलोपार्जित दरे हे गाव महाबळेश्वर पासून 70 किमी अंतरावर आहे. कोयना नदीच्या काठावर वसलेल्या या गावात फक्त 30 घरे आहेत. तरीही तिथल्या बहुतांश घरांना कुलूप आहे कारण येथे स्थलांतरित मजूर राहतात. गावात उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने येथील लोक मुंबई आणि पुण्यात काम करतात.
दरेचे सरपंच सांगतात, "हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. स्थानिक पातळीवर शिंदे कधीही कोणत्याही राजकीय घडामोडींमध्ये सहभागी झाले नाहीत. त्यांनी गावात काही विकासकामे नक्कीच सुरू केली आहेत. गावात ते जे निर्णय घेतात, गावकरी त्यांच्या सोबत उभे आहेत."
पण, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दरे गावामध्ये ना शाळा आहे ना कुठले हॉस्पिटल. शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांसाठी गावकऱ्यांना तापोळ्याला जाण्यासाठी 50 किमी रस्ता आणि बोटीने 10 किमी प्रवास करावा लागतो.
मात्र गावात दोन हेलिपॅड आहेत. शिंदे जेव्हाही गावात येतात, तेव्हा ते हेलिकॉप्टरनेच येतात. एका स्थानिक नागरिकाचा म्हणण्यानुसार इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिले आहे की, त्यांनी कोयना नदीच्या काठावर एक हेलिपॅड बांधले होते. यानंतर गावात त्यांच्या घरापासून काही अंतरावर हेलिपॅड बांधण्यात आले असून लवकरच ते वापरासाठी सज्ज होणार आहे.
2. बंडखोरांचा संबंध योगाशी नसून भोगाशी - सामनातून टीका
महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकवला, ही महाशक्ती आपल्या पाठीशी आहे या एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार सामनाच्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे.
"गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे. अशाच भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वत:ला महाशक्ती म्हणून मिरवत आहे. महाशक्तीच्या सहकार्याने गुवाहाटीमधील बाबा योगराज हे ठाकरे सरकार घालवण्यासाठी ध्यानसाधना करत आहे. एक मात्र नक्की, गुवाहाटीच्या योग शिबिरामुळे देशातला संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला आहे.

फोटो स्रोत, Social Media
"येनकेनप्रकारे सत्ता स्थापन करायचीच, माणसे फोडायची, विकत घ्यायची, आमदारांचा बाजार भरवायचा या प्रवृत्तीविरोधात देश एकवटत आहे. त्यातूनच नव्या लढ्याची तेजस्वी किरणं बाहेर पडतील. जग उगवत्या सूर्याला नमस्कार करते, पण गुवाहाटीच्या योग शिबिरात सर्वच बाबतीत अंधकार आहे.
"आसामातून अनेक दिव्य विचार सध्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहेत. हिंदुत्वापासून स्वाभिमानपर्यंत नव्याने साक्षात्कार होत आहेत. बरं, या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकवला म्हणजे काय केले? योग शिबिरातील मंडळींना पाकिस्तानबाबात जे ज्ञान मिळत आहे, त्यावर काय बोलावे? पाकिस्तानची जिरवली किंवा पाकिस्तानला धडा शिकवल्याचे कोणते नवे पुरावे गुवाहाटीच्या योग शिबिरात समोर आणले?" असा सवालही अग्रलेखात विचारण्यात आला आहे.
3. 30 जूनपर्यंत आधार - पॅन कार्डशी लिंक करा, अन्यथा...
आधार कार्डधारकांना 30 जूनपर्यंत त्यांचे कार्ड पॅन कार्डशी लिंक करावे लागणार आहे. तुम्ही आधार कार्ड पॅनशी लिंक केले नसेल, तर लगेच ते करा. अन्यथा तुम्हालाही 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल.
केंद्र सरकारने Pan Card ला आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. पण, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अनेक दंड जाहीर केले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
30 जून 2022 पर्यंत कागदपत्रे लिंक करण्यासाठी 500 रुपये आकारले जातील आणि त्यानंतर त्यात वाढ होऊन ते 1000 रुपये केले जातील. असे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे.
4. जेट एअरवेज पुन्हा उड्डाणासाठी सज्ज
कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे मागील तीन वर्षे बंद असणारी जेट एअरवेज कंपनीची विमानं आता पुन्हा उड्डाण घेणार आहेत. हवाई वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीएने परवानगी दिल्याने आता ही विमानसेवा पुन्हा सुरू होत आहे.
कंपनीनं जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू होण्यास सांगितलं आहे. शिवाय कंपनीनं भरतीही सुरु केली आहे. कंपनीनं केबिन क्रूच्या जुन्या कर्मचाऱ्यांना परत कामावर बोलावलं आहे. यांसंदर्भात ट्विट करून कंपनीने माहिती दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कंपनीनं दिवाळखोरीमुळे 2019 साली सेवा बंद केली होती. त्यानंतर आता तीन वर्षानंतर जेट एअरवेज उड्डाण घेण्यासाठी सज्ज झालं आहे. असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
5. यूजी नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी ट्विटरवर ट्रेंड
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 2022 या वर्षासाठी जुलै 2022 मध्ये अनेक मोठ्या स्पर्धा परीक्षांच्या तारखा निश्चित केल्यात. या परीक्षांमध्ये जेईई मेन 2022 सत्र परीक्षा 21 जुलै ते 3 जुलै दरम्यान होणार आहे.
त्याचबरोबर नवीनच सुरू झालेली राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा CUET 2022 ही परीक्षाही याच काळात होणार आहे. 17 जुलैला यूजी नीट 2022 परीक्षा असून त्यादरम्यानच सीयूईटी परीक्षा देखील घेण्यात येणार आहे.
या तारखेच्या आसपास अनेक महत्त्वाच्या परीक्षा आहेत, त्यामुळे त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांना यूजी नीट 2022 परीक्षा पुढे ढकलून हवीये. यांसंदर्भांत विद्यार्थ्याकडून ट्विटर वर #postponeneetug2022 हॅशटॅग ट्रेंड चालवण्यात आला आहे.
नीट यूजी परीक्षा दरवर्षी घेतली जाते. या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, आयुष पदवी, बीएस्सी नर्सिंग, बीएस्सी लाइफ सायन्सेस आणि व्हेटर्नरी मेडिसीन या पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. यासंदर्भातले वृत्त टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिले आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























