विधान परिषद निवडणूक: मलिक, देशमुखांना मतदानाची परवानगी नाही हे भेदाभेदीचे राजकारण- सामनातून टीका #5मोठ्या बातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1.मलिक देशमुखांना मतदानाची परवानगी नाही हे भेदाभेदीचे राजकारण

"पंतप्रधान नरेंद्र मोदी संत तुकारामांच्या देहू गावी अवतरले आणि म्हणाले भेदाभेदी नको. पण भेदाभेदीचे टोक त्यांच्याच काळात गाठले आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाची परवानगी नाही. हे भेदाभेदीचे राजकारण. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या आजारी आमदारांना नाजूक स्थितीत मतदानासाठी उचलून आणलं जातं. हे दोन्ही आमदार कर्करोगाशी झुंजत आहेत. व्हेंटिलेटरवर त्यांचा श्वास आहे असे म्हणतात. पण राजकीय स्वार्थ असला की माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर आणि व्हीलचेअरवर मतांसाठी आणले जाते. विजयाची किंवा चमत्काराची खात्री नसताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? पण राजकीय फायद्यासाठी भाजप कोणत्याही अमानुष थरापर्यंत घसरू शकतो. याचेच नाव चमत्कार". 'सामनाच्या अग्रलेखात' भाजपच्या निवडणूक डावपेचांवर टीका करण्यात आली आहे.

"राज्यसभेची निवडणूक सरळ मार्गाने किंवा नियमांचे पालन करून जिंकलेली नाही हे सगळेच जाणतात. अर्थात सध्या राजकारणातील मैदानात सगळेच माफ आहे. मोदीयुगात जे सुरू आहे ते राजकारण नसून दुष्टकारण आहे. राज्यसभेची तसंच विधान परिषदेची निवडणूक टाळता आली असती. भाजपला विधान परिषदेत किमान 20 मतांची गरज आहे. तरीही आम्हीच चमत्कार करणार असा त्यांचा धोशा सुरू आहे. केंद्रीय सत्ता, तपासयंत्रणा आणि न्यायव्यवस्थेचे दोरखंड असल्यामुळे सर्व दाबदबाव वापरून जादा उमेदवार उभा करायचा आणि जिंकायचे असा खेळ सुरू आहे".

"अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क नाकारला. हे संविधानाच्या कोणत्या कलमात बसतं? या दोघांवरील आरोप सिद्ध व्हायचे आहेत. प्रत्यक्ष खटला सुरू झालेला नाही. कोणत्याही न्यायालयाने त्यांना गुन्हेगार ठरवलेलं नाही. त्यांची आमदारकी शाबूत असताना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. देशमुख, मलिक विधान भवनातून भूमिगत होतील किंवा पळून जातील अशी भीती ईडीला वाटत असेल. हा मूर्खपणाच आहे".

2. आसामला पुराचा फटका; 70 जण मृत्यूमुखी

अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. 30 जिल्ह्यांतील तब्बल 37 लाख नागरिकांना महापुराचा फटका बसला आहे. दरड कोसळून व पुरामुळे तब्बल 70 जण मृत्युमुखी पडले आहेत तर अनेकजण बेपत्ता आहेत.

नागरिकांची तारांबळ उडाली असून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, कचरा, दारंग, धेमाजी, भुबरी, कार्बी, कोकराजसह अनेक जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना फोन करून पूरस्थितीची माहिती घेतली. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले आहे.

3. कोकण रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा राष्ट्रार्पण सोहळा आज, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे होणार आहे. या रेल्वे मार्गावरील रत्नागिरी, मडगाव आणि उडपी या तीन स्थानकांवर दुपारी २.४५ वाजता हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

'भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण मिशन - शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल' या योजनेअंतर्गत लोकांना पर्यावरणपूरक, हरित आणि स्वच्छ वाहतुकीचे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी देशातील संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये कोकण रेल्वेच्या ७४१ किलोमीटर लांबीच्या मार्गाचा समावेश आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील मार्ग ३८२ किलोमीटर, गोवा १६३ किमी, तर कर्नाटकातील मार्ग २९४ किलोमीटर आहे.

या विद्युतीकरण योजनेची पायाभरणी नोव्हेंबर २०१५ मध्ये झाली आणि यंदाच्या मार्च महिन्यात ती पूर्ण झाली. योजनेचा एकूण खर्च १ हजार २८७ कोटी रुपये आहे.

4.करुणा शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

विवाहित तरुणीला जातीवाचक शिवीगाळ तसेच पतीला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. करुणा शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी आरोप केले होते. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

२३ वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती विरोधात कौटुंबिक हिंसाचार, अनैसर्गिक अत्याचार, मारहाण, धमकावणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात करूणा शर्मा सहआरोपी आहेत.

तक्रारदार तरुणी येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर भागात राहायला आहे. तरुणीच्या पतीला घटस्फोट पाहिजे होता. करूणा शर्मा यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगत तो तिच्यावर दबाब टाकत होता. पती आणि करुणा शर्माने घटस्फोट देण्यासाठी दबाब टाकल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

शर्मा यांनी हॉकीस्स्टिकने मारहाण करण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच पतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तरुणीने फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

5.भारत-दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी20 मालिका बरोबरीत; पाचवी लढत पावसामुळे रद्द

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका जिंकता आली नाही. 9 जूनपासून सुरू झालेली पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली आहे. या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना पावसामुळे वाया गेला आणि त्यामुळे मालिका बरोबरीत सुटली. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्यांदा भारत T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यासाठी आला होता. याआधी आफ्रिका संघाने भारतचा दोनदा टी-20 मालिकासाठी दौरा केला होता. ज्यामध्ये एक मालिका दक्षिण आफ्रिकेने जिंकली होती, तर एक मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली होती.

भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारतीय संघ आता आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना झाला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)