You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वेळेआधीच केरळमध्ये पोहोचलेला मान्सून आता रखडला, महाराष्ट्रात कधी येणार? #5मोठ्याबातम्या
आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-
1. वेळेआधीच केरळमध्ये पोहोचलेला मान्सून आता रखडला, महाराष्ट्रात कधी येणार?
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या बंगालच्या उपसागरातील शाखेने पुढे वाटचाल करत मंगळवारी (7 जून) तामिळनाडूच्या काही भागातही प्रगती केली आहे. मात्र केरळात वेळेआधी दाखल झाल्यानंतर वेगाने गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारणाऱ्या मान्सूनची वाटचाल थांबलेली आहे. महाराष्ट्रातील मॉन्सूनच्या आगमनासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
यंदा नियमित सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधीच (29 मे) केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं. त्यानंतर दोनच दिवसांत 31 मे रोजी मान्सूनने संपूर्ण केरळ राज्य व्यापून कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली.
कारवार, चिकमंगळूरू, बेंगलुरू, धर्मापुरीपर्यंतच्या भागात मान्सूनने वाटचाल केली आहे. त्यानंतर मात्र अरबी समुद्रावरून मान्सूनने वाटचाल केलेली नाही.
वाटचालीस पोषक हवामान नसल्याने महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचं अॅग्रोवनने आपल्या बातमीत म्हटलं आहे.
2. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाच्या अर्जाला ईडीचा विरोध
कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असं स्पष्ट करत ईडीनं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाच्या परवानगी अर्जाला विरोध केला आहे.
लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 62 नुसार हा एक औपचारिक अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या दोन्ही आमदारांना ही परवानगी देण्यात येऊ नये, असं ईडीनं कोर्टात दाखल केलेल्या आपल्या उत्तरात स्पष्ट केलं आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात केला आहे.
त्याची दखल घेत न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दोन्ही अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्दश दिले होते. मंगळवारी (7 जून) ईडीनं आपलं उत्तर कोर्टात सादर केलं. बुधवारी (8 जून) न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर यावर सुनावणी होणार आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
10 जूनला महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे.
3. बंगालमध्ये दीदींनी जसं भाजपला गाडलं, ती वेळ आता महाराष्ट्रात आलीय- उद्धव ठाकरे
'राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होते. तशी आपली परंपरा होती. पण भाजपमुळे राज्यात राज्यसभेची निवडणूक लागली आहे. कोणी कितीही प्रयत्न केले, तरी महाविकास आघाडी भक्कम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील,' असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
बंगालमध्ये ममता दीदींनी भाजपला जसं गाडलं, आता तीच वेळ महाराष्ट्रात आलीय, असं उद्धव ठाकरे मविआच्या आमदारांना संबोधित करताना म्हणाले.
'भाजपकडून षडयंत्र रचलं जात आहे. त्या षडयंत्राला बळी पडू नका. या परिस्थितीत आपण पाय रोवून उभं राहायला हवं. राज्यसभेसाठी शेवटची निवडणूक कधी झाली होती, हे आपल्याला आठवावं लागतं. कारण राज्यसभा निवडणूक बिनविरोध करायची आपली परंपरा आहे. पण भाजपमुळे ही परंपरा मोडीत निघाल्याचं दु:ख वाटतं,' असंही उद्धव यांनी म्हटलं.
महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
4. एखाद्या मजल्यावर रुग्ण सापडल्यास सर्वांची कोरोना चाचणी होणार; ठाणे पालिका आयुक्तांचा आदेश
एखाद्या मजल्यावर कोरोना रुग्ण सापडल्यास त्या मजल्यावरील सर्व रहिवाशांच्या चाचण्या करण्याचे आदेश ठाण्याचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. यानंतर आरोग्य विभागाने मंगळवारी (7 जून) सकाळपासूनच प्रक्रियेला सुरूवात केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण माजिवडा- मानपाडा क्षेत्रात सापडत आहेत. म्हणजेच, घोडबंदर भागातील उच्च मध्यमवर्गीय तसेच उच्चभ्रू वसाहतीमध्ये अधिकाधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चाचण्या वाढविण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिल्याचं लोकसत्तानं आपल्या बातमीत म्हटलं आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (6 जून) सायंकाळी डॉ. शर्मा यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या सूचना दिल्या होत्या. या बैठकीत उपायुक्तांसह स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
5. राहुल गांधींच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत चूक, ताफ्यातील गाड्या चुकल्या रस्ता
काँग्रेस नेते राहुल गांधी हे हत्या झालेला गायक सिद्धू मुसेवाला याच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी पंजाबमध्ये गेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत चूक झाल्याचं आढळून आलं आहे.
राहुल गांधी यांच्या सुरक्षेत तैनात असलेला वाहनांचा ताफा हा 20-25 मिनिटं पटियाळाच्या गल्लीबोळातून फिरत होता आणि दुसरीकडे राहुल गांधी कोणत्याही सुरक्षेविना मुसेवालाच्या घरी पोहोचले.
चंदीगड विमानतळावरून मानसा इथं जाण्यासाठी पंजाब प्रदेश काँग्रेसचे प्रमुख राजा वडिंग यांनी राहुल गांधींना आपल्यासोबत गाडीत बसवलं. त्यांच्यासोबत प्रतापसिंह बाजवा हेदेखील होते. त्याचवेळी त्यांच्या ड्रायव्हरने वेगळा रस्ता निवडून गाडी बायपासवरून थेट संगरूर मानसा रोडवरून नेली.
मात्र राहुल गांधी यांच्या तैनातीत असलेल्या ताफ्याला हा बदल कळला नाही आणि त्यांच्या दोन गाड्या चुकून बायपासवरून पटियाळात गेल्या.
लोकमतनं ही बातमी दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)