केतकी चितळे - पोलिस यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-

1. पोलिस यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई - केतकी चितळे

'अनेक पोलिस ठाण्यांमध्ये तकारींच्या आधारे दाखल करून घेण्यात आलेले सर्व एफआयआर बेकायदा आहेत आणि माझ्यावर झालेली अटक कारवाईही बेकायदा आहे', असं अभिनेत्री केतकी चितळेनं म्हटलं आहे.

हा दावा करतानाच व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्याची विनंतीही केतकीने याचिकेद्वारे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयीची आक्षेपार्ह कविता सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल कळवा पोलिस ठाण्यासह राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यांत केतकीविरुद्ध एफआयआर दाखल झाले होते. गेल्या 23 दिवसांपासून अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिने आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

केतकीच्या या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी हायकोर्टाला मंगळवारी (7 जून) अर्जाद्वारे विनंती करणार असल्याची माहिती अॅड. घनश्याम उपाध्याय यांनी दिली. 14 मे रोजी कळवा पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर 15 मे रोजी केतकीला अटक झाली. ठाणे न्यायदंडाधिकारी कोर्टाने केतकीला 18 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.

'ज्या व्यक्तींनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या नावाचा कवितेत उल्लेख नाही. कथित आक्षेपार्ह कविता ही पवार नावाच्या व्यक्तीला उद्देशून आणि त्या व्यक्तीला दुखावणारी असल्याचे गृहित धरले तरी कोणत्याही पवार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केलेली नाही. मग पोलीस मला अटक कशी करू शकतात?' असा प्रश्न केतकीकडून उपस्थित करण्यात आला आहे.

'मी पोस्ट केलेल्या एकाच कवितेबद्दल राज्यभरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत एफआयआर दाखल करायला लावून आणि पोलीस यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे,' असा आरोपही केतकी चितळेनं केला आहे.

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीये.

2. आपल्याला कट्टर शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवायचं आहे- उद्धव ठाकरे

तुम्हाला कोणत्याही ऑफर आल्या, आमिषाला बळी पडू नका. धमक्या आल्या तरी भीक घालू नका. तुमच्या सगळ्यांवर माझं लक्ष आहे," असा इशारावजा संदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सेना आमदार आणि अपक्ष आमदार यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदारांशी संवाद साधला. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह सेनेचे आमदार आणि महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

'कुणाला घाबरायचं नाही. आपल्याला कट्टर शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवायचं आहे,' असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत म्हटलं.

टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिलीये.

3. भाजपाच्या धर्मांधतेमुळे भारताची जगात नाचक्की- राहुल गांधी

भारतीय जनता पार्टीच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या अवमानकारक टिप्पणीचे पडसाद जगभरात उमटत आहेत. कतार, कुवेत, इराण आणि सौदी अरेबिया या देशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. भाजपाची धार्मिक कट्टरता देशाला आतून कमकुवत करत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, "अंतर्गत विभाजनामुळे भारत बाहेरून कमकुवत होत आहे. भाजपाच्या धर्मांधतेमुळे केवळ आपसात दरी निर्माण झाली नाही, तर जागतिक स्तरावर भारताची नाचक्की झाली आहे."

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

4. अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 4000 किमीपर्यंत शत्रूवर मारा करण्याची क्षमता

भारताने अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेल्या अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर करण्यात आली.

अग्नी-4 क्षेपणास्त्र 4,000 किमीपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते.

संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ही चाचणी घेण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे.

अग्नी-4 ची यशस्वी चाचणी भारताच्या विश्वसनीय किमान प्रतिबंधच्या धोरणाची पुष्टी करते, असे निवेदनात म्हटले आहे. मंत्रालयाने सांगितले की, चाचणीने सर्व ऑपरेशनल पॅरामीटर्स तसेच सिस्टमची विश्वासार्हता सिद्ध केली.

अलीकडेच, भारतीय नौदलाने 'सीकिंग हेलिकॉप्टर'मधून पहिल्या स्वदेशी विकसित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती.

एबीपी माझानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

5. वाराणसी बॉम्बस्फोट प्रकरणातील वलीउल्लाहला फाशीची शिक्षा

सोळा वर्षं जुन्या वाराणसी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मोहम्मद वल्लीउल्ला याला गाझियाबाद न्यायालयाने सोमवारी (6 जून) एका प्रकरणात फाशी तर दुसऱ्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

बॉम्बस्फोट मालिकेतील दोन प्रकरणांमध्ये जिल्हा न्यायाधीशांनी शनिवारी (4 जून) दहशतवादी वल्लीउल्लाला दोषी ठरवले होतं, तर एका प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती.

या बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला होता, तर 26 जण जखमी आणि अपंग झाले होते. दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब ठेवून बॉम्बस्फोट घडवून आणल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचं 'सकाळ'नं आपल्या बातमीत म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)