You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोहन भागवतांचं ज्ञानवापीबद्दल विधान, 'प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहाता' #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविधं वृत्तपत्रं आणि साईटवर प्रसिद्ध झालेल्या 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. 'प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहाता' मोहन भागवतांचं ज्ञानवापीबद्दल विधान
ज्ञानवापीचा जो इतिहास आहे तो आपण बदलू शकत नाही. प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहावे? भांडण का वाढवायचे? ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.
ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
"ज्ञानवापीचा मुद्दा आहे. तो इतिहास आपण रचलेला नाही. ना आज स्वत:ला हिंदू म्हणवणाऱ्यांनी, ना आजच्या मुस्लिमांनी. ते त्यावेळी घडले. इस्लाम बाहेरून आला, आक्रमकांच्या हाती आला. हिंदू मुस्लिमांच्या विरोधात विचार करत नाही. आजच्या मुस्लिमांचे पूर्वजही हिंदूच होते.
"आता आपल्याला आंदोलन करण्याची गरज नाही. हिंदू कोणाच्या विरोधात नाही. मुस्लिमांनी विरुद्ध मानू नये, हिंदूंनीही मानू नये. असा काही मुद्दा असेल तर एकत्र बसून सहमतीने मार्ग काढा," असंही ते पुढे म्हणाले.
2. गेल्या 4 वर्षांपासून राहुल गांधी भेटले नाहीत : पृथ्वीराज चव्हाणांची नाराजी
काँग्रेस नेतृत्वात बदलाची मागणी करणाऱ्या आणि गांधी कुटुंबाला विरोध करणाऱ्या पक्षाच्या G-23 गटातील आणखी एका नेत्याने पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, ते गेल्या 4 वर्षांपासून राहुल गांधींना एकदाही भेटू शकले नाहीत. तसेच, उदयपूर येथे झालेल्या पक्षाच्या चिंतन शिबिरात आत्मपरीक्षण करण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ही बातमी लोकमतने दिली आहे.
त्यांनी सांगितले की, "मी जेव्हाही दिल्लीत राहतो तेव्हा माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना भेटतो. त्यांची तब्येत आता पूर्वीसारखी नसली तरी ते नेहमी बोलायला-भेटायला तयार असतात. जेव्हा मी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितली, तेव्हा त्याही मला भेटल्या. पण जवळपास 4 वर्षे झाली, या काळात मी राहुल गांधींना भेटू शकलो नाही."
3. निर्बंध नको असतील तर मास्क वापरा - मुख्यमंत्री
राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत असून, दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. पुढील 15 दिवस महत्त्वाचे असून शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी मास्कचा वापर करावा, स्वयंशिस्त पाळावी, लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना उद्देशून केले.
रुग्णसंख्या वाढल्यास प्रसंगी कठोर निर्णय घेण्याचा इशाराही ठाकरे यांनी दिला.
ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी तातडीने करोना नियंत्रण कृती गटाशी चर्चा केली.
कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. कोरोना कालावधीत उभारण्यात आलेली तात्पुरती रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
4. काश्मिरात स्थलांतरित कामगारांवर गोळीबार, एकाचा मृत्यू
काश्मीरमध्ये हिंदू व्यक्तींवर पुन्हा कट्टरतावाद्यांनी हल्ले केले. 2 जूनला सकाळी मुळच्या राजस्थानमधल्या असलेल्या एका बँक मॅनेजरची हत्या झाली तर संध्याकाळी दोन बिगर काश्मिरी स्थलांतरित कामगारांवर हल्ला झाला.
यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
या हल्ल्यात बिहारचे रहिवासी असणाऱ्या दिलखुश यांचा मृत्यू झाला तर पंजाबचे रहिवासी असणाऱ्या गोरिया यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय.
5. हळदीवरचा जीएसटी माफ
अखेर हळदीला शेतीमाल म्हणून मान्यता मिळाल्याने हळद जीएसटीमुक्त झाली आहे. केंद्रीय आणि राज्य करनिर्धारक लवादाच्या सुनावणीमध्ये हळदीवरील लावलेला 5 टक्के कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाचे हळद व्यापाऱ्यांनी स्वागत करत, आनंद साजरा केला आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
पण हळदीवरच्या पुढील प्रक्रियांवर कर लागू राहील असंही लवादाने स्पष्ट केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)