You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरेंच्या मनसे कार्यकर्त्यांना 3 सूचना
मशिदींवरील भोंग्यांच्याविरोधात आंदोलन पुकारल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आता नवीन आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी 'महाराष्ट्र सैनिकांना' त्यासाठी एक पत्र लिहिलं आहे.
'हा विषय आता आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहचायला हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.' असं आपल्या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भोंग्यांच्या विषयाला मनसेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे पत्रात काय म्हणाले...
"माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वत: द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे की हे पत्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही," असं आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना केलं आहे.
हे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर मनसेकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत एक पत्र पोहचवण्यात आलं आहे. दोन पानांचं हे पत्र असून अधिकाधिक लोकांपर्यंत हे पत्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोहचवावं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
या पत्रात म्हटलंय, मनसेच्या आंदोलनानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार मशिदींवरील भोंग्याचा आवाज कमी झालेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 92 टक्के मशिदींमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर परिणाम दिसून आला. जिथे जिथे नियमांचं पालन होत नाही तिथे जनतेनं भोंग्याविषयी स्वाक्षरी मोहीम घ्यावी अशी सूचना राज ठाकरे यांनी केली आहे.
या पत्रात राज ठाकरे यांनी एकूण तीन सूचना केल्या आहेत.
राज ठाकरे यांनी पत्रात केलेली दुसरी सूचना म्हणजे, 'लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरी असतानाही 100 क्रमांक डायल करून तुम्ही पोलिसांना माहिती देऊ शकता. ट्विटरवरही पोलिसांना टॅग करून माहिती देऊ शकता. कोणत्याही प्रकारे पोलिसांकडे तक्रार केल्यास स्वत: कडे त्याची नोंद ठेवण्यास विसरू नका.'
तिसरी सूचना देताना ते म्हणतात, 'सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा जो महाराष्ट्र सैनिक आहे त्याचं नाव आणि नंबर तुम्ही सेव्ह करा आणि कोणत्याही संकटाच्यावेळी माझा हा महाराष्ट्र सैनिक तुमच्यासाठी धावून येईल.'
आपल्या पत्राच्या शेवटी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा यामुद्यावरून इशारा दिला आहे. ते म्हणतात, 'एकदाचा या विषयाचा तुकडा पाडूनच टाकूया!'
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)