You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुप्रिया सुळे यांच्यावरील वक्त्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांची दिलगिरी, #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. चंद्रकांत पाटील यांची दिलगिरी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना लिहिलेल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून काढलेल्या उद्गगारांबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रात लिहिलं आहे, "आयुष्याची 45 वर्ष सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, helpers of the handicap, सावली, आई, संवेदना व वात्सल्यसारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या, जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या विधानसभेत 12 महिला आमदार आणि देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून 5 खासदार आहेत."
"मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे दु:ख नाही. माझ्या ओबीसी बंधूभगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माताभगिनींना अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो," असंही पाटील यांनी लिहिलं आहे.
"ओबीसी आरक्षण मिळत नसेल तर राजकारणात कशाला राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा," अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
"ओबीसी आरक्षण संदर्भात मध्य प्रदेशने दोन दिवसांत असं काय केलं माहीत नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे सांगितलं नाही," असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी वरील वक्तव्य केलं होतं.
2. गडकरी पंतप्रधान असते, तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता - बच्चू कडू
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
"गडकरी पंतप्रधान असते, तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता," असं वक्तव्य कडू यांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
बुलडाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना कडू म्हणाले, "गेल्या अनेक दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या किंमती आणि गॅसच्या किंमती सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढवत आहेत.
"महागाईने कहर केला आहे. मोदी पंतप्रधान झाले आणि मंदिर-मशीदचा प्रश्न मिटला. पण जर नितीन गडकरी पंतप्रधान असते, तर देशाच्या रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता. गडकरी हे चांगले व्यक्ती आहेत." ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
3. बंद पडलेले साखर कारखाने सुरू होणं शेतकऱ्यांच्या हिताचं - शरद पवार
बंद पडलेले साखर कारखाने सुरू होणं शेतकरी आणि कामगार यांच्या हिताचे आहे. यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे साखर कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
"मुंबईत सामुहिक रोजगार देणार्या जशा गिरण्या होत्या, तीच स्थिती साखर कारखानदारीची आहे. मात्र, गिरण्या बंद पडल्याने कामगारांचे हाल झाले. अनेकांचे रोजगार गेले. अशी स्थिती साखर कारखान्यांची व्हायला नको," असं पवार यांनी म्हटलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.
4. मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची केंद्रात बदली
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची केंद्रात बदली करण्यात आली आहे. त्यांना केंद्रात सचिवपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
चहल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अधिकारी मानले जातात. मुंबईतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी इक्बालसिंह चहल यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्याचंच बक्षीस म्हणूनच त्यांना प्रमोशन मिळाल्याचं बोललं जात आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
5. पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, दीपाली सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
अभिनेत्री आणि शिवसैनिक दीपाली सय्यद यांना पंतप्रधान मोदींवर टीका करणं चांगलंच महागात पडलं आहे. कारण यामुळं दीपाली सय्यद यांच्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्द वापरत टीका केली होती. त्यांचे ट्वीट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं होतं.
यानंतर ओशिवारा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)