You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुप्रिया सुळे : 'नरेंद्र मोदींनी एवढ्या संस्था विकल्या, पण आम्हाला विचारतात 60 वर्षांत काय केलं'
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. मोदींनी एवढ्या संस्था विकल्या, पण आम्हाला विचारतात 60 वर्षांत काय केलं - सुप्रिया सुळे
"नरेंद्र मोदी यांनी एवढ्या संस्था विकल्या, पण ते आम्हाला विचारतात की आम्ही 60 वर्षांत काय केलं, तेच विकून तर तुम्ही सरकार चालवत आहात," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
परभणीच्या सोनपेठमध्ये आयोजित बालविवाह प्रतिबंध जागृती अभियान महिला परिषद तथा कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.
"गरीबांना मोफत सिलेंडर देतो म्हणून इतरांची सबसिडी काढून घेतली. ना गरिबांना सिलेंडर दिले, ना इतरांना. महिलांना मोदींच्या धोरणामुळे पुन्हा चुलीकडे वळावं लागलं. यांचा फोटो असतो पेट्रोल पंपावर. मोदींना फक्त जाहिरातबाजी करता येते," असं सुळे म्हणाल्या. ही बातमी एबीपी माझाने दिली.
2. संभाजीराजेंचा गेम झाला, कुणी केला हे त्यांना चांगलंच माहितीये - शिवेंद्रराजे भोसले
"छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच माघार घ्यावी लागली. मला तर वाटतंय त्यांचा गेम झाला. त्यांचा गेम कुणी केला, हे संभाजीराजेंना चांगलंच माहिती आहे", असं वक्तव्य भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं.
छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता, असंही शिवेंद्रराजे म्हणाले.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी अखेर या लढाईतून माघार घेतल्याचे जाहीर केलं या प्रकरणावर शिवेंद्रराजे भोसले संभाजीराजे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
3. तुम्ही आमच्यामुळे मुख्यमंत्री झालात विसरू नका, महादेव जानकरांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
"मला मंत्री केल्याचं आपण सांगताय. पण आम्ही युतीत होतो म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात, हे विसरू नका," अशा शब्दात रासपचे नेते महादेव जानकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.
"देवेंद्र फडणवीस अनेक वेळा सभांमधून रासपला मंत्रिपद दिल्याचा उल्लेख करतात. मला त्यांना सांगायचंय, तुम्ही मंत्रिपद दिलं म्हणजे आमच्यावर काही उपकार केले नाहीत," असं ते म्हणाले.
ते म्हणाले, "आम्ही तुमच्यासोबत होतो. आमचा पक्ष भाजपसोबत युतीत होता. त्यामुळे तुम्ही युतीचे मुख्यमंत्री होता. यात आमचाही वाटा आहे," ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
4. पेट्रोल-डिझेल दरवाढीसाठी ठाकरे सरकारच जबाबदार - बबनराव लोणीकर
"पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसाठी राज्यातील महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे," अशी टीका भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
ते म्हणाले, "जनतेच्या हिताची कोणतीच योजना आणण्यात आणि अंमलात आणण्यात महाराष्ट्रातील आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे.
"पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्याचा गवगवा करून फसवणुकीचा नवा पायंडा पाडणारे ठाकरे सरकार कराद्वारे लूट करणारे देशातील पहिल्या क्रमांकाचं सरकार ठरलं."
"केंद्र सरकारचा इंधनावरील कर केवळ 19 रुपये असताना ठाकरे सरकार 30 रुपये कर आकारून जनतेचे खिसे ओरबडत आहे," असं लोणीकर म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.
5. प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला मिळणार सरकारी नोकरी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना सभागृहाला संबोधित केलं.
त्यांनी सरकारच्या मागील कार्यकाळातील कामगिरीचा परिचय करून दिला आणि भविष्यातील कृती आराखडा सांगितला. यावेळी प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली, ही बातमी सकाळने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)