You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवनीत राणा अटक प्रकरणी संसदीय समितीचं महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना समन्स
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अटकेप्रकरणी संसदेच्या विशेषाधिकार आणि आचारसंहिता समितीने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना समन्स बजावलं आहे.
मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांच्यासोबतच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे आणि भायखळ्यातील महिला कारागृहाचे अधीक्षक यशवंत फड यांनाही समन्स बजावण्यात आलं आहे.
या अधिकाऱ्यांना 15 जून रोजी तोंडी पुराव्यांसह संसदीय समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
प्रकरण काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा आग्रह धरल्याप्रकरणी नवनीत राणा यांना तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
तुरुंगात पोलिसांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार नवनीत राणा लोकसभेच्या हक्कभंग समितीकडे दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेत समितीनं राज्यातील अधिकाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या तक्रारीत पोलीस स्टेशनमध्ये अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला होता. त्याला मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीटद्वारे उत्तर दिले होते.
संजय पांडे यांनी रवी राणा आणि नवनीत राणा खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पित असतानाचा व्हीडिओ ट्वीट केला होता.
खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी केली असून त्यामध्ये वस्तुस्थिती नाही. तरीसुद्धा लोकसभा अध्यक्षांनी माहिती मागवली आहे तर ती माहिती राज्य सरकार देईल, अशी भूमिका याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली होती.
राणांवर राजद्रोहाचा गुन्हा का?
भारतीय दंड संहितेचं कलम 124-अ म्हणजे राजद्रोह. मुंबई पोलिसांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक केली होती.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या कारवाईविषयी म्हणाले होते, "राणा दाम्पत्याने ज्याप्रकारची वक्तव्यं केली त्यावर कारवाई करण्यात आली आहे. हनुमान चालीसाच्या मुद्यावर नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला यात काही चुकीचं नाही. राणा दाम्पत्याने धमकी देण्याचा प्रयत्न केला."
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची 4 कारणं सांगितली आहेत.
- सरकारी व्यवस्था कोलमडून पडावी यासाठी प्रयत्न आणि सरकारला आव्हान दिलं तर हे कलम लागू होतं.
- नवनीत राणा आणि रवी राणा यांनी नोटीस देऊनही त्यांनी अट्टाहास सोडला नाही.
- हे घर मुख्यमंत्र्यांचं आहे, पक्षाच्या प्रमुखाचं आहे. तुम्ही तिथे गेलात तर कायद्याचा प्रश्न निर्माण होईल याची तुम्हाला कल्पना होती, तरीही तुम्ही तिथे गेला. याचा अर्थ तुमचा हेतू प्रामाणिक नाही. तुम्हाला सरकारला कोंडीत पकडायचं आहे.
- मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरता येत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)