पुण्यात 'या' दर्ग्यांच्या जागी मंदिरं होती- मनसेचा दावा #5मोठ्याबातम्या

छोटा शेख सल्ला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या मिरवणुकीत सहभागी झालेले हिंदू-मुस्लीम
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. पुण्यातली दोन मंदिरं पाडून दर्गे उभे राहिले- मनसे

आधी बाबरी आणि सध्या भारतात सुरू असलेलं ज्ञानवापी प्रकरण आता महाराष्ट्रात तेही पुण्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातील दोन दर्ग्यांच्या जागा पूर्वाश्रमीच्या मंदिरांच्या आहेत असा दावा करुन त्यासाठी लढा उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. एबीपी माझाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

पुण्यामध्ये नारायणेश्वर आणि पुण्येश्वर अशी दोन मंदिरं होती ती पाडून तेथे दर्गे उभे राहिले असा याबाबत दावा करण्यात आला आहे. मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे म्हणाले, पुण्येश्वराला पण तेवढाच मोठा इतिहास आहे.

"अल्लाउद्दीन खिलजीचा एक सरदार बडा अरब, पुण्यावर चाल करुन आला त्यावेळी त्यानं हे भगवान शंकराचं मंदिर उध्वस्त केलं. एक मंदिर नाही तर दोन मंदिरं उध्वस्त केली. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही मंदिरं उध्वस्त केली.

"तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही दोन्ही मंदिरं कुठं आहेत. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडील बाजूला कुंभार वेसजवळ आहे. जिथं आज छोटा शेख दर्गा आहे. या सगळ्या मंदिरांच्या वर मशिदी निर्माण झाल्या आहेत," असा दावा अजय शिंदे यांनी केला आहे.

2. कधी एअरपोर्टवर भेटले तर हिसका दाखवेन- बृजभूषण सिंह

राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा 'तूर्तास' स्थगित केला असला तरी भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी आपली तलवार अजून पूर्ण म्यान केलेली नाही. गेली आठ वर्षं मी राज ठाकरे यांना शोधतोय, ते कधी विमानतळावर भेटले तर दाखवेन हिसका असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

बृजभूषण सिंह म्हणाले, "राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयंविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल, मारहाणीबद्दल माफी मागत नाहीत तोपर्यंत अयोध्येत पाय ठेवू देणार नाही. आम्ही रामाचे वंशज आहोत, त्यांनी रामाच्या वंशजांचा अपमान केला आहे."

ही बातमी दैनिक सकाळने प्रसिद्ध केली आहे. राज ठाकरे उत्तर भारतात कोणत्याही राज्यात गेले तरी त्यांना विरोध करण्यात येईल असेही बृजभूषण यांनी सांगितले.

3. संजय राऊत यांनी एकट्याने महाराष्ट्रात फिरून दाखवावं- नितेश राणे

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. 'संजय राऊत यांनी अयोध्या सोडा महाराष्ट्रात एकट्याने फिरुन दाखवावं,' असं आव्हान त्यांनी दिलं आहे. संजय राऊत शिवसेनेच्या कोट्यातून खासदार झालेत की शिवसेनेच्या असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

नितेश राणे, भाजप, शिवसेना, संतोष परब, सिंधुदुर्ग

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, नितेश राणे

दिवा विभागात भाजपाचे कार्यालय सुरू केल्यावर ते बोलत होते. ते म्हणाले, "केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. मात्र राज्यातील सत्ताधाऱ्यांना एक टक्का लाज उरली आहे वाटतं, त्यामुळे त्यांनी काहीतरी देखावा केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही राज्य सरकारकडे इंधनावरील कर कमी करण्याची मागणी करत होतो. मात्र नंतर आम्हाला समजलं आर्थिक बजेटचा उद्धव ठाकरे यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त बॅगा आणणे आणि बॅगा पोहोचवणे एवढंच येतं," असा टोला राणे यांनी लगावला आहे.

4. आम आदमी पक्षाच्या आमदाराला पत्नी, मुलासह कारावास

आम आदमी पक्षाच्या एका आमदाराला, त्याच्या पत्नीला आणि मुलाला तीन वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पतियाळा (ग्रामीण) मतदारसंघाचे हे आमदार असून त्यांचं नाव बलबीर सिंह असं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

2011 साली त्यांच्यासह काही आरोपींवर एका नातेवाईकाला मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. कोर्टाने आरोपींना प्रत्येकी 16 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि 50 रुपयांवर जामीनही दिला आहे. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

5. दिल्लीच्या नायब राज्यपालपदी विनयकुमार सक्सेना

दिल्लीच्या नायब राज्यपालपदी विनयकुमार सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल बैजल यांनी राजीनामा दिल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. विनयकुमार सक्सेना यांनी आजवर अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ते सध्या खादी ग्रामोद्योम मंडळाचे अध्यक्ष होते.

विनयकुमार सक्सेना

फोटो स्रोत, TWITTER

फोटो कॅप्शन, विनयकुमार सक्सेना

गुजरातमध्ये बंदर व्यवस्थापनाची तसेच हनी मिशन, कुम्हार सशक्तीकरण योजना, चामडीवस्तू तयार करणाऱ्या कामगारांचे सक्षमीकरण अशा अनेक योजनांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. ते कानपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत.

ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)