You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे : अयोध्या दौरा होऊ नये यासाठी सापळा रचण्यात आला असं का म्हणाले?
"ज्या दिवशी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली. त्यादिवशीच अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. पण त्यानंतर काही दिवसांतच मला अयोध्येला येऊ देणार नाही, असं तिकडे सुरु झालं. पण एक वेळ अशी आली की माझ्या लक्षात आलं की हा एक सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकता कामा नये. कारण या सगळ्याची रसद पुरवण्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली."
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (22 मे) आपल्या पुण्यातील भाषणात वरील वक्तव्य केलं.
गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केल्यानंतर तिथले स्थानिक भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी त्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर तेथील विरोध वाढतच गेल्याचं महिनाभरात दिसून आलं. अखेर, वैद्यकीय कारण देत राज ठाकरे यांनी आपला आगामी अयोध्या दौरा स्थगित केला आहे.
पण, अयोध्या दौऱ्याला जाऊ शकत नसल्याचं दुःख राज यांच्या मनात आहे, हे त्यांच्या आजच्या पुण्यातील भाषणामधून दिसून आलं. आपला अयोध्या दौरा होऊ नये, यासाठी सापळा रचण्यात आला असा गंभीर आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे. पण राज यांनी वरील आरोप करताना कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेतलं नाही, हे विशेष.
पण, राज यांच्या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज यांचा रोख नेमका कुणाकडे होता, याविषयी विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
आपल्या पुण्यातील आजच्या भाषणात राज ठाकरे म्हणाले, "ज्या दिवशी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली. त्यादिवशीच अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. ही तारीख जाहीर केली. त्यानंतर काही दिवसांतच मला अयोध्येला येऊ देणार नाही, असं तिकडे सुरु झालं. हे प्रकरण वाढत असल्याचं मी पाहत होतो.
"मला मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातूनही याबाबत माहिती मिळत होती. पण एक वेळ अशी आली की माझ्या लक्षात आलं की हा एक सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकता कामा नये. कारण या सगळ्याची रसद पुरवण्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली. हा विषय पुन्हा बाहेर काढा, असे त्यांचे प्रयत्न होते."
"ज्यांना-ज्यांना माझी अयोध्या वारी खुपत होती, असे अनेक जण होते. त्या सगळ्यांनी एकत्रितपणे हा आराखडा आखला होता. पण तिथं हट्टाने जायचं असं मी ठरवलं असतं आणि तिथे जर काही झालं असतं तर आपली त्यांच्या पोरं अंगावर गेली असती. पण त्यानंतर त्यांच्यावर केसेस लावल्या गेल्या असत्या."
"एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, हे शक्य आहे का? या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. त्यापैकी काही गोष्टी मला तुम्हाला सांगता पण येणार नाहीत. पण महाराष्ट्रातील माझी ताकद हकनाक सापडली असती. ती मला तिथे सापडू द्यायची नाही. मी टीका सहन करायला तयार आहे. पण पोरांना अडकू देणार नाही."
"राज ठाकरेंनी माफी मागावी म्हणणाऱ्यांना 12-15 वर्षांनी आता जाग आली का? त्यावेळी कुठे होती ही सगळी माणसं? माफी मागितली तरच राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवायला देऊ, यातून चुकीचे पायंडे पडत आहेत, हे लक्षात ठेवा.
विषय माफी मागण्याचाच आहे, तर गुजरातमध्ये एका बलात्कारानंतर 12-14 हजार युपीवाल्यांना हुसकावण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार," असा सवाल राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान केला.
अयोध्या - द ट्रॅपचा रचयिता भाजपच - सचिन सावंत
राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात गंभीर आरोप केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
"राज ठाकरे यांनी भाषणात सांगितलेल्या 'अयोध्या द ट्रॅप' चित्रपटाच्या गंभीर कहाणीचा रचेता दुसरं तिसरं कोणी नसून भाजपा आहे," असं मत सचिन सावंत यांनी व्यक्त केलं.
"उत्तर प्रदेशमध्ये महाविकास आघाडी सरकार नसून योगी आदित्यनाथ यांचे भाजपाचे सरकार आहे. तिथे भाजपाचाच खासदार विरोध करत आहे. तेव्हा तिथे रसद पुरवण्याचा प्रयत्न कोणी केला असेल, तर तो भाजपाचाच असू शकतो असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे," असं सावंत म्हणाले.
शंका निर्माण करणारं वक्तव्य
सापळा रचला आणि महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली, हे राज ठाकरेंचं वक्तव्य शंका निर्माण करणारं आहे, असं विश्लेषण ज्येष्ठ राजकीय विश्लेषण हेमंत देसाई यांनी केलं.
ते म्हणतात, "राज ठाकरेंचं वक्तव्य शिवसेनेलाही लागू होऊ शकतं. तसंच भाजपलाही लागू होऊ शकतं. राज ठाकरेंना शिवसेनेकडे अंगुली निर्देश करायचा होता. पण लागली तर गोळी भाजपलाही लागू शकते."
"राज ठाकरे यांनी पक्षाचं नाव घेतलं नसल्याने दोन्ही बाजूंनी या वक्तव्याचा विचार केला जाऊ शकतो," असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनाही वाटतं.
संजय राऊतांच्या वक्तव्याचा आधार
हेमंत देसाई यांनी या वक्तव्याला संजय राऊत यांच्या वक्तव्याचा आधार असल्याचं सांगितलं. त्यांच्या मते, "संजय राऊत यांनी थेट विधान केलं होतं की ब्रिजभूषण सिंह चांगले नेते आहेत. माझी त्यांच्याशी जुनी ओळख आहे, त्यांना मदत करू, असं म्हणत त्यांनी सातत्याने सिंह यांचं कौतुक केलं."
ते सांगतात, "खरं सांगायचं तर राज ठाकरे अजून तरी भाजपच्या विरुद्ध काहीही बोलताना दिसत नाहीत. उलट ते भाजपचीच भूमिका पुढे घेऊन जाताना दिसत आहेत. अशा स्थितीत त्यांचा निर्देश शिवसेनेकडे नक्कीच असू शकतो."
याबाबत अभय देशपांडे म्हणतात, "राज ठाकरे यांचं वक्तव्य शिवसेनेशी जोडून पाहिल्यास मुळात त्यांच्या पक्षाची म्हणावी तितकी ताकद उत्तर प्रदेशात नाही. तिथं त्यांच्या उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त होतं."
"अशी स्थितीतही राज ठाकरेंनी शिवसेनेकडे बोट दाखवलेलं असल्यास या आरोपांमुळे शिवसेनेला आनंदच होणार आहे," असं देशपांडेंना वाटतं.
भाजपवरची नाराजीही दिसली
अयोध्या दौऱ्याला राज ठाकरे यांना जाऊ नये, असा सापळा रचण्यात आल्याचा आरोप करताना राज ठाकरेंनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी यासंदर्भात त्यांची भाजपवरची नाराजीही दिसली, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.
अभय देशपांडे सांगतात, "या प्रकरणात राज ठाकरे यांची नाराजी भाजपवर जास्त असल्याचं या वक्तव्यातून दिसून येतं. कारण ब्रिजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत. शिवाय, तिथे भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ते विरोध करत असताना महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना शांत करणं गरजेचं होतं. पण महाराष्ट्रातील कोणत्याच भाजप नेत्याने त्यासाठी प्रयत्न केले नाहीत."
"रामाच्या दर्शनाला कुणीही येत असल्यास अडवू नये, असं सर्वसाधारण वक्तव्य करून भाजप नेत्यांनी या मुद्द्यापासून स्वतःला दूर केलं. हे सगळं सुरू असताना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी मध्यस्थी करून राज ठाकरेंच्या दौऱ्याचा मार्ग मोकळा करावा, अशी त्यांची अपेक्षा होती. पण तसं न घडल्याने राज नाराज झाले, हे या प्रकरणातून दिसून येत आहे," असंही देशपांडे यांनी सांगितलं.
"ब्रिजभूषण सिंह यांच्या भूमिकेशी भाजपचा संबंध नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, असं भाजपने सांगण्याचा प्रयत्न केला. प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याविषयी सातत्याने वक्तव्ये केली. आम्ही राज यांच्या भूमिकेच्या मागे आहोत, असं ते सांगत होते. पण ब्रिजभूषण यांच्यावर पक्षशिस्तीसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. एखादा नेता जर इतकी महत्त्वाची भूमिका घेत असेल तर ती वैयक्तिक कशी काय असू शकते. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष मानला जातो. त्यामुळे योगी किंवा भाजपने त्यांना शांत का केलं नाही, हा प्रश्न उपस्थित होतो", असं हेमंत देसाई यांनी सांगितलं.
भाजप उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात स्थानिक व्होट बँक डोळ्यांसमोर ठेवूनच राजकारण करत आहे. याकडेही राज ठाकरेंचा रोख असू शकतो, अशी शक्यता हेमंत देसाई आणि अभय देशपांडे या दोन्ही तज्ज्ञांनी व्यक्त केली.
'राज यांच्या येण्याने शिवसेना-राष्ट्रवादीच अडचणीत'
या प्रकरणावर भाजपची भूमिका जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशी संवाद साधला.
राज ठाकरेंच्या येण्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आला असून त्यांना रोखण्यासाठी तेच अशा प्रकारची कृत्ये करू शकतात, असं केशव उपाध्ये म्हणाले.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविषयी भूमिका स्पष्ट करताना उपाध्ये म्हणाले, "जे रामाला मानतात, अशा जगभरातील प्रत्येकाला अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे. त्याला भाजपने विरोध करण्याचं काहीच कारण नाही. पण राज यांच्या येण्यामुळे महाराष्ट्रात कुणाची अडचण होत आहे, हे आपण सर्व जण पाहत आहोत. राज यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केली. त्यामुळे ज्यांची अडचण झाली, तेच असं काही कृत्य करू शकतात."
"असं असेल तर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भाजपने कारवाई का केली नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना केशव उपाध्ये म्हणाले, "ब्रिजभूषण सिंह यांच्याविषयी महाराष्ट्र भाजपने स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या टीकेचा रोख कुणाकडे आहे, आहे आपण सर्व जाणतो," असं केशव उपाध्ये म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)