देवेंद्र फडणवीस : 'याला म्हणतात उंटाच्या तोंडात जिरे; राज्य सरकारच्या कर कपातीवर प्रतिक्रिया', #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. याला म्हणतात उंटाच्या तोंडात जिरे; फडणवीसांची प्रतिक्रिया

केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात केली. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. यात फडणवीसांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

हा निर्णय म्हणजे सामान्य माणसाची क्रूर थट्टा असल्याचा आरोप करत त्यांनी किमान 10 टक्के भार घेण्याची मागणी केली. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "इंधन दर कपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला आहे. असं असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के आहे. इंधन दर कपातीत राज्य सरकारने किमान 10 टक्के तरी भार घ्यायचा होता. पण नाही! याला म्हणतात 'उंटाच्या तोंडात जिरे'!"

"अन्य राज्य सरकारे 7 ते 10 रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने 1.5 आणि 2 रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते," असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

राज्य शासनाने 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे आहे.

2. नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्रात येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांसह आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते.

पंतप्रधान मोदी यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून 14 जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.

आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू येथे येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनांक 14 जून रोजी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत."

3. महाराष्ट्रात 11 दिवसांत उष्माघाताचे 6 बळी

गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा फारच तापला. बहुतांश शहरात 40 च्या वर तर काही भागात 45 ते 46 अंशांपर्यंत तापमान गेले. पण उन्हासोबत वाऱ्याचा वेग अपेक्षित वाढलेला नसल्याने 10 मेपर्यंत राज्यात उष्माघाताने बळीची एकही अधिकृत नोंद नव्हती.

मात्र त्यानंतर 11 ते 21 मेदरम्यान मात्र राज्यात सहा उष्माघाताने मृत्यूची नोंद झाली. दिव्य मराठीनं ही बातमी दिलीय.

10 मे 2022 पर्यंत राज्यात 25 उष्माघात संशयितांचा मृत्यू झाला होता. त्यात जळगाव 4, नागपूर 11, जालना 2, अकोला 3, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, परभणीमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. या 25 पैकी 6 मृत्यू हे उष्माघाताचे बळी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितलं. जालना, उस्मानाबाद, अकोला, जळगावचे प्रत्येकी 1 तर नागपूरच्या 2 जणांचा त्यात समावेश आहे.

4. कोकण आणि विदर्भात दोन दिवस पावसाचा इशारा

मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी रात्री तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली असतानाच, आता पुढील 48 तासांत कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 23 ते 26 मे दरम्यान कोकण आणि गोव्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.

5. 'राहुल बाबा, इटालियन चष्मा काढा, तरच विकास दिसेल'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली आहे. सकाळनं ही बातमी दिलीय.

अमित शहा म्हणाले, "काँग्रेस नेते विचारतात की 8 वर्षांत काय झालं? हे लोक डोळे मिटून बसले नाहीत. राहुल बाबांनी आपला इटालियन चष्मा काढून पीएम मोदी आणि सीएम पेमा खांडू यांनी केलेली विकासकामं पाहावीत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)