You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीचे निमंत्रण ब्राह्मण महासंघाने नाकारले, #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीचे निमंत्रण ब्राह्मण महासंघाने नाकारले
राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण संस्थांना भेटायला बोलावले आहे. मात्र, केतकी चितळे प्रकरण, अमोल मिटकरी यांच्या विधानामुळे वाद पेटला आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघाने शरद पवार यांच्या भेटीचे निमंत्रण नाकारलं आहे.
या बैठकीला आमचा कोणताही पदाधिकारी जाणार नाही, अशी भूमिकाच महासंघाने घेतली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
शनिवारी 21 मे रोजी सायंकाळी शरद पवार यांनी ब्राह्मण संस्थांना भेटायला बोलावलं आहे. गेल्या 40 वर्षात पवार यांनी पहिल्यांदाच असं चर्चेला बोलावलं आहे. ज्यांच्या मध्यस्थीने निरोप आले आहेत त्यांच म्हणणं असं आहे की, तुम्ही सर्वांनी येऊन तुमच्या नाराजीच कारण सांगावं, असा दावा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केला आहे.
"पवारांना पूर्ण कल्पना आहे की, आपली नाराजी का आहे. समर्थ रामदास, कोंडदेव, गडकरी पुतळे, पुणेरी पगडी,संभाजी ब्रिगेड,श्रीमंत कोकाटे,बाबासाहेब पुरंदरे हे जुने विषय जरा बाजूला ठेवू .पण अगदी परवाच्या प्रकरण नंतर त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांना शब्द माघार घ्यायला सांगायचं होतं.
"पण उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी शाहू महाराज आणि ज्योतिष यांची गोष्ट सांगितली, त्याच व्यासपीठावर त्यांच्याच उपस्थितीत भुजबळ यांनी पुरोहित हे धंदा करतात (व्यवसाय नाही ) हा शब्द वापरत पुन्हा टिंगल केली, आणि आरक्षणाचं चुकीचं उदाहरणं दिले," असंही दवे म्हणाले.
2. महाराष्ट्राला पूर्वमोसमी पावसाचा तडाखा
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर आता राज्याला वरुणराजाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. जून महिन्यात 5 ते 7 तारखेपर्यंत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या आगमनाची वर्दी देणारा पूर्वमोसमी पाऊस राज्यात बरसायला सुरुवात झाली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये सध्या वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. यामुळे शेतीमाल आणि आंब्याचे नुकसान होताना दिसत आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.
पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर आणि नगरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे पंढरपूर, अहमदनगर, वाशिम, सांगलीत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. पंढरपूर परिसरात वादळी वारे आणि पावसाने द्राक्षं, बेदाणे शेड उद्ध्वस्त झालं आहे. तर अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे.
3..'आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येला या'
शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसेला शिवसेनेसोबत येण्याची ऑफर दिली. तसेच यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावर सल्लाही दिला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
यावेळी दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे, केतकी चितळे या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं.
त्यांनी म्हटलं, "अयोध्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हक्क आणि अधिकार आहे. भूमिका स्पष्ट नसलेले नेते स्वतःला हिंदू जननायक संबोधतात पण ते करुन दाखवू शकत नाहीत. राज ठाकरे ना खुलं आवाहन दिलं की, तुम्हाला भीती वाटत असेल तर आताही आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येला जा, जेणेकरुन तुमचा अयोध्या दौरा सक्सेस होईल.
"भाजपाचा स्लोगन घेवून तुम्ही अयोध्येला जात होतात. त्यामुळे आज नाही उद्या जाणार, उद्या नाही परवा जाणार आता तर जाणारच नाही."
4. मुंबईत 24 ते 27 मेदरम्यान पाणीकपात
मुंबईत 24 ते 27 मेदरम्यान चार तासांसाठी पाच टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. या काळात पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथे 100 किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या परिरक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. 24 ते 27 मेदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत हे काम चालणार आहे. याच वेळेत पाच टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे.
ए, बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस आणि टी विभागात ही पाणीकपात असणार आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 'एन' आणि 'एस' विभागातील पूर्वेकडील भाग, संपूर्ण टी, एम पूर्व आणि एम पश्चिम विभाग, एल विभागातील पूर्वेकडील भाग, बी, ई, एफ उत्तर, एफ दक्षिण आणि ए विभागाच्या पाणीपुरवठय़ामध्ये पाच टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर या विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाणी जपून वापरावे. पाणीकपातीपूर्वी एक दिवस आधी पाण्याचा आवश्यक तो साठा करून ठेवावा, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.
5. जेट एअरवेज पुन्हा उड्डाण घेणार
जेट एअरवेज कंपनीची विमानं आता पुन्हा उड्डाण घेणार आहेत. हवाई वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीएने (DGCA) परवानगी दिल्याने आता ही विमानसेवा पुन्हा सुरु होत आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.
नरेश गोयल-स्थापित जेट एअरवेजनं पहिलं व्यावसायिक उड्डाण 5 मे 1993 रोजी केलं होतं. पण, कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे 18 एप्रिल 2019 रोजी कंपनीनं अखेरचं व्यावसायिक उड्डाण केलं होतं.
आता तीन वर्षांनंतर पुन्हा ही विमानसेवा उड्डाण घेण्यास सज्ज आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)