अमोल मिटकरींची गोपिचंद पडळकरांवर टीका - 'माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही' : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही - अमोल मिटकरी

गेल्या काही दिवसांपासून विधान परिषद आमदार अमोल मिटकरी आणि गोपीचंद पडळकर यांच्यात तुफान टोलेबाजी सुरू आहे. अशातच मिटकरी यांनी पुन्हा पडळकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर आक्रमक टीका केल्याचं दिसून आलं.

"तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही," अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी पडळकर यांचं नाव न घेता निशाणा साधलाय.

यावेळी समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे, असं मिटकरी म्हणाले. सांगली येथे आयोजित एका व्याख्यानादरम्यान मिटकरी बोलत होते.

जेजुरीमध्ये अहिल्याबाई होळकर पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमावरून पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांच्याविरुद्ध आक्रमकपणे प्रतिक्रिया देत आहेत.

"आम्हाला ज्यांनी आमदार केलं आहे ते आमचे गुरुही काही कमी नाहीत. विरोधासाठी विरोध नाही करायचा. शांत बसायचं. पण टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम वाजवायचा," असं मिटकरी यावेळी म्हणाले

"तुम्हाला काय वाटतं, हे सोपं असतं. एखादं श्वान बैलाच्या मागे भूंकतं. बैल एकदा, दोनदा ऐकतो, तिसऱ्यांदा मात्र लाथ मारतो. बैलाने लाथ मारल्यानंतर कुत्रा मागेच जातो," असा शब्दांत त्यांनी टोला लगावला. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

2. पूर्वीच्या सरकारांनी इंधन निर्भरतेकडे लक्ष दिलं असतं, तर आज ही वेळ आली नसती - पंतप्रधान मोदी

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलच्या दरांनी सध्या शंभरचा टप्पा गाठला आहे. या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पूर्वीच्या सरकारांनी इंधन आयातीवरील निर्भरतेकडे लक्ष दिलं असतं, तर आज मध्यम वर्गाला अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला नसता, असं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं.

तामीळनाडूतील एन्नौर-थिरूवल्लूर-बंगळुरू-पुदूच्चेरी-नागापट्टणम-मदुरै-तुतीकोरिन या नॅच्युरल गॅस पाईपलाईनच्या रामनाथपूरम-थुथूकडी खंडाच्या उद्घाटनप्रसंगी नरेंद्र मोदी बोलत होते.

आपण आयातीवर एवढं अवलंबून असायला हवं का? कुणावरही टीका करण्याची माझी इच्छा नाही. पण या विषयाकडे आपण आधीच लक्ष दिलं असतं तर आपल्या मध्यम वर्गाला हे ओझं सहन करण्याची वेळ आली नसती, असं मोदी म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली आहे.

3. अदानी यांच्याकडून दिघी बंदराचं अधिग्रहण

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल एकोनॉमिक झोन (APSEZ) ने दिघी बंदराचं अधिग्रहण पूर्ण केलं आहे. 705 कोटी रुपयांमध्ये अदानी यांच्या कंपनीने हे अधिग्रहण केलं आहे.

दिघी पोर्टला जवाहरलाल नेहरू बंदराचा (JNPT) पर्याय म्हणून विकसित करण्यासाठी कंपनी याठिकाणी 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. JNPT बंदर भारताचं सर्वात मोठं बंदर आहे.

या बंदरावरील भार कमी करण्यासाठी दिघी बंदराचा उपयोग केला जाऊ शकतो. अदानी यांची कंपनी दिघी बंदरावरील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणार आहे. याठिकाणी ड्राय, कंटेनर आणि लिक्विड कार्गोसाठी सोयी-सुविधा करण्यात येणार आहे. ही बातमी फायनान्शियल एक्सप्रेसने दिलीय.

4. पूजाची आठवण मरू देणार नाही, तिचा पुतळा उभारू - लहू चव्हाण

"पूजा चव्हाण आज नसली तरी, तिची आठवण आम्ही मरू देणार नाही. दिवस मागे पडत आहेत. ती गेली तरी तिची आठवण आमच्या मनात असेल. त्यामुळे आम्ही तिचा पुतळा उभारणार आहोत," असं पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी म्हटलं आहे.

"पूजाची आठवण राहायला पाहिजे, अशीच आमच्या सर्व कुटुंबीयांची इच्छा आहे. याबाबत आम्ही ठरवलं आहे. काहीही प्रयत्न करून आम्ही तिचा पुतळा उभारणार आहोत. परिस्थिती वाईट असल्यामुळे काही अडचणी येत आहेत. पण बँकेने लोन मंजूर केले आहे. आमच्या सर्व कुटुंबाने ठरवलं आहे. आम्हाला तिची आठवण मरु द्यायची नाही. ती जरी गेली असली तरी ती आमच्या मनात असणार आहे, आम्ही पूजाचा पुतळा उभारणार आहोत," असंही लहू चव्हाण म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

5. पश्चिम बंगालचे मंत्री जाकीर हुसेन बॉम्ब हल्ल्यात जखमी

पश्चिम बंगालचे मंत्री जाकीर हुसेन आणि त्यांचे काही समर्थक हे बॉम्ब हल्ल्यात जखमी झाले आहेत. हुसेन हे मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निमतिता रेल्वे स्थानकावर आले असता बुधवारी रात्री त्यांच्यावर क्रूड बॉम्बचा हल्ला करण्यात आला.

हुसेन हे पश्चिम बंगालचे कामगार राज्यमंत्री आहेत. नुकतेच भाजपमध्ये गेलेल सुवेंदू अधिकारी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.

रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ते कोलकात्याला जाण्यासाठी निमतिता रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर रेल्वेची वाट पाहत उभे होते. यादरम्यान हा बॉम्बहल्ला करण्यात आला.

यामध्ये हुसेन यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना मुर्शिदाबाद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हल्लेखोराची माहिती अद्याप मिळालेली नसून याबाबतचा तपास सुरू आहे, अशी माहिती स्थानिक पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. ही बातमी द इंडियन एक्सप्रेसने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)