You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रेयसीनं धोका दिला म्हणून बिल्डिंगला लावली आग, 7 जणांनी गमावले प्राण
- Author, शुरैह नियाझी
- Role, बीबीसी हिंदीसाठी, भोपाळहून
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
मध्यप्रदेशच्या इंदूरमधील स्वर्णबाग कॉलनीत आग लावल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यानं एक दावा केला आहे.
एक मुलगी आपल्याला प्रेमात मूर्ख बनवत होती, यामुळे असं पाऊल उचल्याचं त्यानं म्हटलं आहे.
या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला होता आणि 9 जण जखमी झाले होते.
इंदूर पोलिसांनी आरोपी शुभमला शनिवारी (7 मे) रात्री अटक केली होती. त्याला पकडलं तेव्हा तो जखमी अवस्थेत होता.
पोलिसांच्या मते, स्वत:ला अटकेपासून वाचवण्याच्या प्रयत्नात आरोपी जखमी झाला आहे. त्यानं कथितरित्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
अटकेदरम्यान, एका तरुणीनं आरोपीच्या कानाखली लगावली. 'हे पाऊल का उचललं? आणि यातून तुला काय मिळालं?' असं ती विचारत होती.
पोलिस आरोपीला स्टेशनमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडली. ही मुलगी तिची बहीण आहे, जिच्यावर तो प्रेम करत होता, असं सांगितलं जात आहे.
शहर हादरलं
या घटनेमुळे शहर हादरलं आहे. कारण या प्रकरणात अशा लोकांचा जीव गेला आहे, ज्यांचा याच्याशी काहीएक संबंध नव्हता. पोलिसांनी आरोपी शुभम दीक्षितच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आयुक्त हरिनारायण चारी यांनी सांगितलं, "पोलिसांना पहिल्यांदा वाटलं की, हे शॉर्ट सर्किटमुळे झालं आहे. पण सीसीटीव्ही फुजेटमध्ये एक व्यक्ती आग लावताना दिसून आली त्यानंतर मग त्या दिशेनं चौकशी सुरू करण्यात आली.
"त्यानंतर लक्षात आलं की, संबंधित व्यक्ती त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका मुलीशी लग्न करू इच्छित होता. पण तिचं लग्न दुसरीकडे होत असल्यामुळे त्यानं हे पाऊल उचललं."
शुक्रवारी (6 मे) रात्री झालेली ही घटना इन्साफ पटेल यांच्या बिल्डिंगमध्ये झाली होती.
या दोघांमध्ये याआधीही भांडण झालं होतं. पैशांच्या बाबतीतही दोघांमध्ये वाद होते. पण, आग इतकी वाढेल आणि एवढ्या लोकांचा मृत्यू होईल, असा त्यानं विचार केला नव्हता. त्याला फक्त मुलीची गाडी जाळायची होती, असंही पोलिस सांगतात.
'मुलीला अद्दल घडवण्यासाठी लावली आग'
शुभम झाशीचा रहिवासी आहे. गेल्या वर्षभरापासून तो इंदूरमध्ये राहत आहे. तो एका खासगी कंपनीत कामाला होता. गेल्या वर्षभरात त्यानं अनेक ठिकाणी काम केलं. सहा महिने तो त्याच बिल्डिंगमध्ये राहिला. त्यानंतर त्याचा मुलीशी वाद झाला आणि मग त्यानं ती बिल्डिंग सोडली.
झाशीमधील त्याच्या कुटुंबीयाशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण कुणी उपलब्ध होऊ शकलं नाही. मीडियानं प्रश्न विचारल्यानंतर शुभम इतकंच म्हणाला, "एका मुलीला अद्दल घडवण्यासाठी मी हे काम केलं आहे."
पोलीस स्टेशनचे प्रभारी तहझीब काझी यांनी म्हटलं, "हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिस शुभमचा शोध घेत होते. त्याचा मोबाईलही सुरूच होता. यादरम्यान तो लोकांशी संपर्क साधत होता, बोलत होता. त्याच्या लोकेशनवर पोहचून पोलिसांनी त्याला अटक केली."
पोलिसांच्या मते, "या घटनेनंतर तो कुठं काय चाललं याची सगळी माहिती घेत होता. सीसीटीव्ही फुटेजनुसार, तो रात्रीच्या 3 वाजेपर्यंत त्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये उपस्थित होता. त्यानं तिथल्या स्कूटीमधून पेट्रोल काढलं, बिल्डिंगला आग लावली आणि मग तिथून निघून गेला."
मोदींनीही व्यक्त केला शोक
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी शोक व्यक्त केला होता. तसंच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदतीची घोषणा केली होती.
दोषींच्या विरोधात कठोर कारवाईचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पोलिस याप्रकरणी बिल्डिंगच्या मालकाविरोधात कारवाई करणार होती. कारण त्यांनी आगीपासून बचावासाठी काही व्यवस्था केलेली नव्हती. पण नंतर संपूर्ण प्रकरणानं वेगळं वळण घेतलं.
शहरातील विजय नगर पोलिसांनी शुभम दीक्षितच्या विरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. त्यानंतर त्याची वैदयकीय तपासणी केली.
या घटनेत ईश्वर सिंह सिसोदिया, त्यांची पत्नी नीतू सिसोदिया, आशिष, गौरव, आकांक्षा, देवेंद्र आणि समीर यांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. आग इतकी वेगानं पसरत होती की जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही. बिल्डिंगकडे जाणारा रस्ता पूर्णपणे आगेच्या कल्लोळात धुमसत होता.
"रात्री आम्हाला आगीमुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे जाग आली. आग इतकी वेगानं पसरत होती की आमचा श्वास थांबायला लागला होता. काहीतरी प्रयत्न करून त्यांनी स्वत:ला वाचवलं," असं जखमी सांगतात.
हे पाहिलं का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)