You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवनीत राणा: 'या' कारणामुळे राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होऊ शकतो? #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा,
1. 'या' कारणामुळे राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होऊ शकतो?
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार राणा दाम्पत्याला माध्यमांशी बोलण्यास मनाई केली होती. तरीही नवनीत राणा यांनी रविवारी (8 मे) लिलावती रुग्णालयातून डिस्जार्ज मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी नवनीत राणा यांनी न्यायालयाच्या अटीचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर आरोप केले. त्यांनी म्हटलं, "उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे. सांताक्रूझ लॉकअपमध्ये आम्हाला पाणीही दिलं नाही."
माध्यमांशी बोलल्याने राणा दाम्पत्याने न्यायालयाच्या अटींचं उल्लंघन केलं आहे, असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही म्हटलंय. यासंदर्भात आपण न्यायालयात जाणार असून राणांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार आहोत असंही प्रदीप घरत यांनी स्पष्ट केलं.
नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. आपण उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणुकीला उभे राहू असंही त्या म्हणाल्या. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.
"उद्धव ठाकरे यांनी आपलं सरकार आणलं आणि तुम्ही काय त्यांच्याविरोधात निवडणुकीला उभं राहण्याच्या गप्पा करता. मला वाटतं आदित्य ठाकरेही पाऊण लाख मतांनी निवडून आलेत." असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा आज (9 मे) दिल्लीला जाणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार असल्याचे समजते.
2. गुणरत्न सदावर्ते राजकारणात प्रवेश करणार?
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आघाडीवर असलेले वकील गुणरत्न सदावर्ते आता राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ते एसटी बँकेची निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.
सदावर्तेंनी याबद्दल बोलताना म्हटलं, "यापुढे कष्टकरी स्वत: त्यांच्यासाठी माणसं निवडतील. आतापर्यंत राजकीय बॉस कष्टकऱ्यांना 15 टक्के व्याज लागू करत होते. इतर राज्यांना मात्र 7 टक्के व्याज आहे. मग आम्हाला जास्त का? राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध नेते शरद पवार यांचं राजकीय स्थान असेल. पण आम्ही तरूण भारत आहोत.
आमची लढाई महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आहे. शरद पवार यांनी यादी जाहीर करावी की, सहकाराच्या माध्यमातून किती जणांना फायदा झाला.आम्ही भ्रष्टाचारासाठी तुरुंगात गेलो नव्हतो. आम्ही क्रांतिकारी आहोत. त्यामुळे भीती त्यांना असली पाहिजे आम्हाला नाही." असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
एसटीची राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी जवळपास पाच महिने आंदोलन केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते एसटी बँकेच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभं करणार आहेत. एसटी बँकेचे राज्यात 90 हजार मतदार आहेत.
टीव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.
3. 'नरेंद्र मोदी हिटलरप्रमाणे वागतात' - संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मोदींची तुलना त्यांनी हिटलरशी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, हिटलर खूप इव्हेंट्स करायचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा खूप सारे इव्हेंट्स करतात.
बीबीसी हिंदीने हे वृत्त दिलं आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटलं आहे की, नरेंद्र मोदी हिटलरचे अनुकरण करत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
"सोशल मीडियामध्ये पहा. ज्याप्रमाणे हिटलर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करायचा त्याप्रमाणे नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष मोठ्या संख्येने कार्यक्रम करतात," असंही ते म्हणाले.
केंद्र सरकारचे कामकाज पाहत इंग्रजांचं राज्य बरं होतं असं वाटतं असल्याचंही संजय राऊत यापूर्वी बोलले होते.
"देशात जे सुरू आहे त्याचे अनेक पैलू आहेत. आरोप आणि गुन्हे केवळ आमच्या विरोधात सिद्ध होतात. पण इतरांवर मात्र हे लागू होत नाही, हा संशोधनाचा विषय आहे." असंही राऊत म्हणाले.
4. 'शिरूरमध्ये कोण निवडून येणार हे नेते नाही जनता ठरवेल' - अमोल कोल्हे
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. शिरूर मतदारसंघातून खासदार म्हणून कोण निवडून येणार यावरून दोघांमध्ये वाद सुरू असल्याचं पहायला मिळतं.
शिरूर मतदारसंघातून कोण खासदार निवडून येणार हे नेते नाही मतदार ठरवतील असा टोला अमोल कोल्हे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. शिरूरमधून शिवसेनेचे शिवाजीराव अढळराव पाटील संसदेत जातील असं वक्चव्य संजय राऊत यांनी केलं होतं.
ते म्हणाले होते, काहीही झालं तरी शिरूर लोकसभा मतदारसंघातून पुढचे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील असतील. त्यांच्यामागे शिवसेना आणि उद्धव ठाकरे आहेत. यावर अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
"कोण निवडून येणार हे नेता नाही मायबाप जनता ठरवेल. शिवाजी आढळराव पाटील माजी खासदार म्हणून अन्य मतदारसंघातून निवडून येऊ शकतात किंवा राज्यसभेचे खासदरही म्हणून संसदेत येऊ शकतात. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अशी वक्तव्य करावी लागतात." असं अमोल कोल्हे म्हणाले.
5. 'इडली अम्मा'ला मातृदिनी आनंद महिद्रांची खास भेट
तमिळनाडूमध्ये लोकांना अवघ्या 1 रुपयात इडली खाऊ घालणाऱ्या आजींना आता स्वत:चे घर मिळाले आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मातृदिनानिमित्त या आजींना नवीन घर दिलं आहे.
इडली अम्माला त्यांचं हक्काचं घर दिलं असल्याची माहिती आनंद महिंद्रा यांनी दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "आमच्या टीमचे अभिनंदन केले पाहिजे की त्यांनी वेळेत घराचे बांधकाम पूर्ण केले. मातृदिनाला इडली अम्मा यांना ही भेट दिली. पालन,पोषण, काळजी आणि नि:स्वार्थीपणआ या आईच्या गुणांचे त्या मूर्त स्वरुप आहेत. त्यांच्या कार्याला पाठिंबा देण्याचे भाग्य लाभले. तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा."
कोईंबतूर जिल्ह्यात राहणाऱ्या एम कमलाथल या आजी 'इडली अम्मा' या नावाने प्रसिद्ध आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्या स्थलांतरित कामगार आणि इतरांसाठी एक रुपयात इडली विकत आहेत.
लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)